सावता परिषदेच्या वतीने निघणार ओबीसी आरक्षण यात्रा – आखाडे
बीड । स्थानिक स्वराज्य संस्थेमधील हक्काच्या आरक्षण बचावासाठी ओबीसी समाजामध्ये जनजागरण करून उठाव निर्माण करण्यासाठी सावता परिषदेच्या वतीने राज्याच्या विविध भागातून ३ टप्प्यामध्ये ओबीसी आरक्षण यात्रा काढण्यात येणार असल्याचे सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याण आखाडे यांनी जाहीर केले आहे.
आरक्षण विरोधातील सर्वोच्च न्यायालयामधील याचिकेमुळे नागपूर, अकोला, वाशिम, नंदुरबार व गोंदिया या जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समित्यामधील ओबीसी प्रवर्गासाठीचे आरक्षण रद्द झाल्याने ओबीसी समाजाला मिळणारे राजकीय आरक्षण धोक्यात आलेले आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत यामध्ये सध्या मिळत असल्याने राजकीय आरक्षण संपुष्टात आले तर ओबीसी समाजाची फार मोठी हानी होणार असल्याचे श्री.आखाडे यांनी म्हटले आहे. आरक्षणामुळे आता कुठे तरी ओबीसीतील जात घटकांचे प्रतिनिधित्व दिसू लागले होते परंतु यापुढे ओबीसींचे राजकीय अस्तित्वच उरणार नाही. म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थेतील अडचणीत आलेले आरक्षण पुर्ववत राहणे काळाची गरज आहे. यासाठी तमाम ओबीसी बांधवांनी एकत्रित येऊन आंदोलनामध्ये व्यापकता व तीव्रता आणणे गरजेचे आहे.केंद्रातील व राज्यातील सरकार तसेच सर्वच राजकीय पक्ष यांची ही जबाबदारी असून त्यांच्यावर दबाव आणला पाहिजे तरच हे शक्य असल्याचे ते म्हणाले.
यासाठी राज्यभरातील सकळ ओबीसी समाजाचे जनजागरण करून एकजुटीने उठाव करण्यासाठी ओबीसी आरक्षण यात्रा काढण्यात येणार असल्याचे सांगून स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरक्षण हा ओबीसीचा हक्क असून पुन्हा आरक्षण मिळविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही व स्वस्थ बसू देणार नाही असा इशारा कल्याण आखाडे यांनी दिला आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा