उपमुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री यांच्या समोर कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांवर झालेल्या लाठीमाराचा जाहीर निषेध !




 

भेट घडवून आणणं बीडच्या आमदाराचं काम होतं- डॉ.योगेश  क्षीरसागर

बीड ।
कोविड काळामध्ये आरोग्य सेवा देणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम सेवेत कामावर सामावून घेण्याच्या मागणीसाठी शेकडो कंत्राटी आरोग्य कर्मचारी राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजित पवार यांची भेट घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले. या वेळी शेकडो महिलांसह अन्य कर्मचार्‍याची उपस्थिती होती.भेट घेण्यासाठी काही महिला आरोग्य कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर ठिय्या मांडला.त्यानंतर काही वेळातच उपमुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री बैठक संपवून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर निघाले तेव्हा काही कर्मचाऱ्यांनी भेटीचा हट्ट धरत ताफा अडवण्याचा प्रयत्न केला त्यावेळी या कर्मचाऱ्यांना हुसकावण्यासाठी बीड पोलिसांनी लाठीमार केला.त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर आरोग्य कर्मचाऱ्यांवर पोलिसांनी लाठीमार केल्याच्या घटनेवर
शिवसेनेचे युवा नेते डॉक्टर योगेश भैय्या क्षीरसागर यांनी तीव्र शब्दांत जाहीर निषेध केला आहे.

ज्यांनी कोरोनाच्या महामारीत स्वतःच्या जीवाची पर्वा न करता रात्रंदिवस रुग्णांच्या सेवेत काम केले अशा कोरूना योद्ध्यांच्या मागणीचे निवेदन घेण्यासाठी किंवा आरोग्य कर्मचाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी सुद्धा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे वेळ नव्हता. सेवेत कायम करावे व थकित वेतन देण्यात यावे या मागणीसाठी आरोग्य कर्मचारी हे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना निवेदन देण्यासाठी आले होते.निवेदन देण्यासाठी आलेले आरोग्य कर्मचारी फक्त दोन मिनिटांचा वेळ मागत होते. मात्र उपमुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्री यांच्याकडे आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत चर्चा करण्यासाठी दोन मिनिटे सुद्धा नव्हती. एकीकडे कोविड योद्धा म्हणून सन्मान करायचा आणि दुसरीकडे त्याच कोविड योद्ध्यांवर पोलिसांच्या मार्फत लाठीमार करायचा हे कितपत योग्य आहे. असा सवाल शिवसेना युवा नेते डॉ. योगेश भैय्या क्षीरसागर यांनी केला आहे.

लाठीमारच्या घटनेवर डॉ. योगेश भैय्या क्षीरसागर यांनी नाराजी व्यक्त करत स्वतः च्या मतदार संघात उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री आले आहेत तर त्यांना निवेदन देण्यासाठी आलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांची भेट घडवून आणणे स्थानिक आमदाराचे काम होते परंतु निष्क्रिय आमदाराला तेही जमले नाही.कोरोना काळात स्वतःच्या फंडातून कुठलीही मदत केली नाही,मतदार संघात गोरगरीब जनतेला वाऱ्यावर सोडले आशा लोकप्रतिनिधीना जनतेने ओळखावे

बीड जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी तातडीची बैठक घेतली.मात्र ज्यांच्या मदतीने कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करत आहे त्याच आरोग्य कर्मचाऱ्यांची भेट न घेता, त्यांच्या मागण्या ऐकून न घेता निघून गेले. उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री,जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच बीड जिल्ह्याचे आमदार हे सर्वजण डोळ्यांसमोर महिला आरोग्य कर्मचाऱ्यांवर लाठीचार्ज होताना पाहत होते मात्र याठिकाणी कोणीही गाडीतून उतरून आंदोलन कर्त्यांशी बोलायला आले नाही.याउलट पालकमंत्री मा. ना.धनंजय मुंडे यांनी गाडीतून खाली उतरून पोलिस प्रशासनाला महिला आरोग्य कर्मचाऱ्यांना बाजूला करण्याचे आदेश देत या घटनेकडे दुर्लक्ष करून निघून गेले. राज्यात तिसरी लाट येणार असल्याने जे कोविड योद्धे रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी स्वतः च्या जीवाची पर्वा न करता रात्रंदिवस रुग्णांच्या सेवेत असतात अशा आरोग्य कर्मचाऱ्यांवर झालेल्या लाठीमारचा तीव्र शब्दांत निषेध करत या घटनेची चौकशी करण्यात यावी अशी मागणी देखील शिवसेना युवा नेते डॉ. योगेश भैय्या क्षीरसागर यांनी दिलेल्या पत्रकातून केली आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा