मराठा क्रांती मोर्चाचे शिष्टमंडळ तसेच रुग्णसेवेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे शिष्टमंडळ उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांना भेटले




बीड । कोविड-19 परिस्थिती व संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पूर्वतयारीचा आढावा तसेच बीड जिल्ह्यातील खरीप हंगामाचा आढावा घेण्यासाठी बीड जिल्हा दौऱ्यावर आलेल्या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी तसेच आरोग्यसेवेत कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयात भेटून निवेदन दिले.

जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी पुढाकार घेऊन या दोन्हीही शिष्टमंडळांची उपमुख्यमंत्री व आरोग्य मंत्री महोदयांशी भेट घडवून आणली.

मराठा आरक्षण प्रश्नी राज्य सरकारने न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी, 9 सप्टेंबर 2020 पूर्वी नोकरीत नेमणूक झालेल्याना तात्काळ नियुक्त्या द्याव्यात, सारथी संस्थेला भरीव निधी द्यावा, आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या कर्जाची मर्यादा वाढवून 25 लाख करावी, तसेच आरक्षण लागू होईपर्यंत समाजाला ओबीसी प्रमाणे सवलती द्याव्यात या प्रमुख मागण्यांचा समावेश या निवेदनात आहे.

मराठा समाजाने केलेल्या सर्वच मागण्या योग्य आहेत, आरक्षण मिळवून देण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करत असून राज्य सरकार यात कुठेही कमी पडणार नाही, असा शब्द अजितदादा पवार यांनी शिष्टमंडळाला दिला.

या शिष्टमंडळात अशोक हिंगे, गंगाधर काळकुटे, रमेश चव्हाण, सुनील सुरवसे, सचिन उबाळे, महेश धांडे, विजय लव्हाळे, विठ्ठल बहिर, संतोष जाधव, ऍड. शशिकांत सावंत, मळीराम यादव, शैलेश जाधव, राहुल टेकाळे, अशोक सुखवसे, जयमल्हार बागल, रवी शिंदे, प्रा. गोपाळ धांडे, संदीप उबाळे, भागवत मस्के, बालाजी पवार, श्रीकांत बागलाने, रोहन काळे आदींचा समावेश होता.

आरोग्य सेवेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांची भेट ।

कोरोनाच्या काळात आरोग्यसेवेत कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या परिचारिका वॉर्ड बॉय आदी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याबाबत मागणी देण्यासाठी आलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने देखील आपले निवेदन ना. पवार यांना भेटून दिले.

यावर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची आजच्याच बैठकीत चर्चा झाली असून, आरोग्य विभागातील वर्ग तीन व वर्ग चारची रिक्त पदे 100% भरणार असून, यात कोरोना काळात सेवा दिलेल्या कर्मचाऱ्यांचा प्राधान्याने विचार होईल, तसेच रुग्णसंख्या कमी झालेल्या जिल्ह्यांमध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावरून काढून न टाकता शक्य तितक्या कर्मचाऱ्यांचे समायोजन करून घ्यावे, त्यांच्या वेतनाचा भार हा राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) मार्फत करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी अंतिम टप्प्यात असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

कोरोनाच्या कठीण काळात आपला जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या रुग्णसेवेतील कर्मचाऱ्यांच्या योगदानाची राज्य सरकारला जाणीव असून, त्यांच्यावर कोणत्याच परिस्थितीत अन्याय होणार नसल्याचेही ना. टोपे यांनी स्पष्ट केले.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा