होय ! मी अधुनिक सावित्री !!
बीड । सोनाली शहाणे

स्त्री हि नैसर्गिक भावूक स्वभावाची असल्यामुळे कोणत्याही परिस्थितीचा प्रभाव तिच्यावर सर्वात आधी पडतो. श्रद्धा आणि अंधश्रद्धा या दोहोंमध्ये ती अडकलेली असते. आपल्या कुटुंबासाठी, पतीसाठी व्रतवैकल्ये करण्यास ती नेहमी तयार असते. आजच्या आधुनिक युगात देखील महिला कितीही उच्च पदावर गेली असेल, कितीही डीगर्‍या संपादित तिने केल्या असतील, पण आपल्या जोडीदाराच्या आयुष्यासाठी ती व्रत आवर्जून करते. समाजातील अनेक स्त्रिया आजही या व व्रतवैकल्याच्या विळख्यात अशा काही अडकल्या आहेत, कि जणू हा विळखा त्यांना संरक्षण कवचाप्रमाणे वाटतो. स्त्रिया जी काही व्रतवैकल्ये करतात त्यातील बरीचशी पतीसाठी केली जातात. त्यातीलच वट सावित्रीचे व्रत हे हाच पती सात जन्म मिळावा या उद्देशाने केले जाते. या वडाच्या झाडाखाली मृत झालेल्या सत्यवानाचे प्राण सावित्रीने यमाकडून परत मिळवले होते. त्या वडाच्या झाडाची पूजा करून त्याला दोरे गुंडाळले जातात. हे व्रत अतिशय श्रद्धेने केले जाते, स्त्री हि आपल्या नवर्‍यासाठी, मुलाबाळांसाठी आणि कुटुंबासाठी इतक्या विविध प्रकारची व्रते करते परंतु ती स्वतःसाठी किंवा इतर कोणी तिच्यासाठी एकही व्रत करत नाही. ही स्त्रीची शोकांतिकाच.
आधुनिक जगात जर पतीपत्नी सावित्री सत्यवानासारखे फिरायला गेले असता तिथे अचानक गाडी चालवतांना सुमसान रस्त्यावर झाडावर गाडी आदळली. नवर्‍याच्या डोक्याला जबर मार लागून रक्त वाहत आहे. नवरा बेशुध्द पडला. अडवळणी लोकेशनला नेटवर्क नाही. कोणाला फोन लागत नाही. आजुबाजूला कितीही आरडाओरडा करूनही कोणीही मदतीला येत नाही अशावेळी आम्ही आधुनिक सावित्री जर देवाला हात जोडून म्हणतोय माझ्या भक्तीचे फळ मला दे, मी 10 वर्ष झाले दरवर्षी वडाला न चुकता जाते. मासिक पाळी जर वटपोर्णिमेला असेल तर 15 दिवस आधीपासून पाळी लांबवण्याच्या गोळ्या घेवून माझ्या शरिरावर त्याचा दिर्घकालीन परिणाम सहन करून तुझी पुजा केली आहे. तेव्हा हीच वेळ आहे मला माझ्या भक्तीचे फळ दे असे म्हणत प्रार्थना करत बसलो तर काय होईल. आता हेच वाचून तुम्हाला ही हसू आलंं असेल ना, की जामाना कोणता ही काय बोलते. अशा वेळी जखमी नवर्‍याला बाजुच्या सिटवर बसवून स्वतः हातात स्टेंअरिंग घेवून नजीकच्या दवाख्यान्यात जी बायको नेवून दाखल करेल ती ठरेल आधुनिक सावित्री.
हे सगळं समजत असूनही गेली अनेक शतके आम्ही स्वतः सावित्रीपेक्षा कमी नाही हे सिध्द करण्यासाठी भर उन्हाळ्यात दिवस भर उपाशी राहून अनवानी पायांनी वडाला जाण्यासाठी तत्पर आहोत. तरीही समाज सुशिक्षीत झाला आणि फांद्या मोडून वडाची पुजा करण्यापेक्षा वडालाच जावून पुजा करा अन्यथा वृक्षहानी होईल इतकी बौध्दीक कुवत आम्ही प्रग्लभ केली. बर्‍याच जनींना हे सारं जाणवते देखील परंतु ते न केल्यास चार बायका नावे ठेवतील. घरातील सगळे नाराज होतील, रागावतील, ओरडतील, दुखावतील. काही घडले तर त्याचे खापर फोडतील. नास्तिक समजतील, हिला पतीविषयी काही वाटत नाही असे समजतील. म्हणजे बाईने पतिवरचे प्रेम हे सिद्ध करून दाखविणे आवश्यक आहे. पतीला मात्र तशी गरज नसते. त्यामुळे कदाचित मोडर्न विचारांच्या स्त्रियादेखील व्रतवैकल्याच्या बाबतीत आपले विचार बाजूला ठेवून व्रत करतात. तर काही स्त्रियांची आजही अशा व्रतांवर श्रद्धा आहे.
जर एखाद्या नवविवाहितेने सुरुवातीच्या एक-दोन वर्षात वटपौर्णिमेला वडाची पूजा करून सात जन्मी हाच पती मिळावा म्हणून अर्चना केली आणि तीन-चार वर्षानंतर जर त्याने तिला हुंड्यासाठी छळले आणि जाळले तर सात जन्मी त्याच्या हातून असेच अकाली जाळून घेणार का? वडाला दोरा गुंडाळूनही जर घटस्फोट होत असतील तर सात जन्म घटस्फोट घेण्याची तयारी आहे का? दारू पिऊन रोज मारहाण करणार्‍या नवर्‍याची बायको देखील कसा काय सात जन्मी तोच नवरा मांगते? अनेक वर्ष न नांद्णारी बायको माहेरी वटसावित्रीची पूजा करावयास का जाते? इथे एका जन्मात दोन-तीन बायका व तीन-चार नवरे करणार्‍याची काही कमी नाही. हिंदू धर्मातील स्त्रिया आपल्या पतीचे आयुष्य वाढावे व सातही जन्मात हाच पती मिळावा, म्हणून वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाला सूत गुंडाळतात, पण मला आश्चर्य वाटते की इतर धम्मातील स्त्रिया आपल्या पतीचे आयुष्य वाढावे म्हणून कुठल्याही प्रकारचे व्रत करीत नाही मग त्या स्त्रियांचे पतीचे आयुष्य कमी होते का? जर सात जन्म हाच पती मिळणार असेल तर मग पुढचे सहा जन्म कुंडली बघून, 36 गुण मिळवून लग्न करायची गरज काय? असेच समजायचे ना कि मागच्या जन्मात वटपौर्णिमा केली म्हणून हा आपला मागच्या जन्माचा पती आहे असे गृहीत धरून पंचांग वा कुंडली ना बघताच विवाह का करत नाही?
पुनर्जन्म नाही या विषयावर जगतगुरू तुकोबाराय म्हणतात की,
साखरेचा नव्हे ऊस ।
आम्हा कैसा गर्भवास ॥
बीज भाजुनी केली लाही ।
जन्म मरण आम्हासी नाही ॥
याचा अर्थ- साखरेपासून पुन्हा ऊस तयार होत नाही तर आमचा जन्म पुनर्जन्म कैसा? बिया भाजुनी लाही तयार होते. हि लाही आपण पेरू शकत नाही. तसेच एकदा माणूस मेला की सर्व संपते. पुन्हां पुनर्जन्म नाही असे संतश्रेष्ठ तुकोबाराय आपल्या अभंगात सांगतात.
मी तर म्हणेन, सत्यवान आणि सावित्रीच्या कथेने नावारूपास आलेल्या या व्रताचा फायदा म्हणजे धकाधकीच्या या जीवनात स्त्रीला एकत्ररित्या काही वेळ निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवायला मिळतोय. कामाच्या धावपळीमध्ये घरच्यांसाठी साधा वेळ देत येत नाही, अशावेळी या व्रताच्या निमित्ताने स्त्रीला शृंगार करून, आपल्या मैत्रिणींसमवेत वडाखाली वेळ घालवायला मिळतो.
पण असे करताना पर्यावरणाचा र्‍हास तर होत नाही ना? याची खबरदारी देखील आजच्या स्त्रीने घ्यायला हवी. सात जन्म हाच नवरा मिळेल कि नाही माहित नाही, पण त्यामुळे आज सात जन्म तोच नवरा मिळू दे अशी प्रार्थना करण्याऐवजी येणार्‍या सात पिढीला तरी पर्यावरण र्‍हासाचा त्रास होवू नये म्हणून एक वडाचे झाड दरवर्षी लावा आणि ते जोपासा. त्यामुळे पुढचे सात जन्माचे जाऊ द्या आपल्या पुढच्या पिढीला तो वडाचे झाडं कसे असते दिसायला हवे याची खबरदारी प्रत्येकाने घ्या.कोरोनाच्या काळात ऑक्सिजनचे महत्व कळले आहे, वड हा 24 तास ऑक्सिजन देणारा वृक्ष आहे, तर ह्या वर्षीपासून वटपौर्णिमेच्या दिवशी एक तरी वडाचे झाड लावू या आणि पर्यावरण आणि पर्यायाने मानवजातीचे संरक्षण करूया.

सोनाली शहाणे ,बीड.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा