धसांच्या नेतृत्वात ‘मराठे एकसाथ’!




धसांच्या नेतृत्वात ‘मराठे एकसाथ’।
एक मराठा लाख मराठा’ च्या घोषणेने बीड पुन्हा दणाणले।
बीड ।
एक मराठा लाख मराठाची गगनभेदी गर्जना देत विधान परिषदेचे आमदार सुरेश धस यांनी मराठा आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सुरेश धसांनी मोर्चाची सुरुवात केली. तेथून ते माळीवेस – धोंडीपुरा-कारंजा मार्गे मोर्चा कलेक्टर कचेरीवर कुच करत होता. या वेळी मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे या घोषणांसह सरकार विरोधात प्रचंड प्रमाणात घोषणाबाजी केली जात होती. छत्रपती शिवाजी महाराज चौकात आल्यानंतर महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून हा मोर्चा थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर जावून धडकला. या वेळी मोर्चात गेवराईचे आमदार लक्ष्मण पवार यांनीही सहभाग नोंदवला.
राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा समाजाचे आरक्षण न्यायालयात टिकले नाही. आता राज्य सरकारने न्यायालयात मराठा समाजाची व्यवस्थीत बाजू मांडून मराठ्यांना लवकरात लवकर आरक्षण मिळवून द्यावं, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी विधान परिषदेचे आमदार सुरेश धस यांच्या नेतृत्वात आज सकाळी अकरा वाजता हा मोर्चा निघाला. एक मराठा लाख मराठाची गगनभेदी गर्जना देत धसांच्या नेतृत्वाखाली हजारो मराठे एकवटले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या मोर्चाची सुरुवात झाली. आ. सुरेश धस मोर्चाचे नेतृत्व करत असताना गेवराईचे आमदार लक्ष्मण पवार हेही मोर्चात सहभागी झाले. हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या मोर्चाकरांनी माळीवेस, धोंडीपुरा, कारंजा मार्गे कलेक्टर कचेरीकडे कुच करताना दिसून आले. या वेळी रस्त्यामध्ये अन्य समाजातील लोकांनीही मोर्चाला पाठिंबा दिला. काही ठिकाणी मुस्लिम समाजाकडून मोर्चेकर्‍यांवर पुष्पवृष्टी करण्यात आली. काही ठिकाणी मोर्चाचे नेतृत्व करणारे सुरेश धस यांचे पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले. हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी आल्यानंतर महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. तेथून मोर्चा थेट कलेक्टर कचेरीवर जावून धडकला. एक शिष्टमंडळ जिल्हाधिकार्‍यांना भेटलं अन् मागण्यांचं निवेदन दिलं. या वेळी मोर्चाचं रुपांतर जाहीरसभेत झालं. उपस्थित मोर्चेकरी मराठा आरक्षणासाठी सरकारविरोधात प्रचंड घोषणाबाजी करताना दिसून आले. या वेळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोरील व्यासपीठावर आ. लक्ष्मण पवार, माजी आ. आर. टी. देशमुख, माजी जि.प. अध्यक्षा सौ. गांधले, लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार संघटनेचे सुखदेव सानप, हेमंत जाधव, बी.बी. जाधव, गंगाधर काळकुटे, गणेश उगले, सुभाष सपकाळ, सचिन उबाळे, संदीप उबाळे, संभाजी सुरवे, अशोक तावरे, अभिजीत शेंडगे, भारत जगताप, प्रकाश कवठेकर, अमोल तरटे, माऊली जरांगे, युवराज मस्के यांच्यासह आदींची उपस्थित होती.

कोरोना यांच्या कार्यक्रमांना नाही फक्त अधिवेशनालाच -आ. धस
मोर्चाला उपस्थित सर्व बहाद्दरांना सलाम करतो म्हणत, लोकात राहिल्यावर लोक बाहेर निघतात, कुणालाही लोक घराबाहेर निघत नसतात. कोरोना काळात काम करणार्‍या सर्व कोरोना योद्ध्यांचे अभिनंदन करत आ. सुरेश धस यांनी मोर्चेकर्‍यांना संबोधित करताना कोरोना सगळीकडे आहे, फक्त कॉंग्रेस अध्यक्ष नाना पटोलेंच्या कार्यक्रमाला राष्ट्रवादीच्या, शिवसेनेच्या कार्यक्रमांना कोरोना नसतो. राष्ट्रवादीची परिसंवाद यात्रा सुरू आहे, कुठल्या परी सोबत त्यांचा संवाद आहे हे माहित नाही. तिथे कोरोना नाही, परंतु अधिवेशनाला कोरोना आहे. केवळ दोन दिवसांचं अधिवेशन किमान आठवडाभराचा तरी अधिवेशन असावा, असे म्हणत राज्यातील ठाकरे सरकार फक्त घोषणा करतं, असं म्हणून हे सरकार लोकांच्या पुढे जाऊ शकत नाही. सरकारचे आता पापण्या पडू लागल्या आहेत. अरे ज्या फडणवीसांची जात काढता त्याला साडेतीन टक्क्याचे म्हणता, त्याच फडणवीसांनी मराठयांना आरक्षण दिले. त्यांच्या पत्नीबद्दल अपशब्द काढता, महिलांबद्दल काय बोलता गड्यासारखं बोला, असं म्हणून सुरेश धसांनी गोपीनाथराव मुंडे हे माझे गुरू असल्याचे म्हटले. जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आपण स्वस्थ बसणार नाही, असंही ते म्हणाले. सुरेश धसांचं भाषण पुढे चालू होतं, वेळेअभावी ते आम्ही देऊ शकलो नाही.

काय आहेत मोर्चेकर्‍यांच्या मागण्या
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आवश्यक ती कारवाई करावी व मराठा समाजाला आरक्षण मिळून द्यावे.
बीड जिल्ह्यातील शेतकर्यांना उद्दिष्टाप्रमाणे १६०० कोटी रुपये पीककर्ज वाटप करावे.
ऊसतोडणी कामगारांना ७० टक्के भाववाढ मिळावी व त्यांच्या संरक्षणासाठी संघटीत कामगारांप्रमाणे त्यांच्यासाठी कायदा करण्यात यावा.
कोविड-१९ या साथ रोगाच्या लढ्यामध्ये सक्रीय कामगिरी बजावलेल्या कंत्राटी आरोग्य कर्मचार्यांना सेवेत कायम करण्यात यावे.
कोविड-१९ प्रादुर्भावामुळे मयत झालेल्या व्यक्तीच्या कुटूंबियांना अर्थसहाय्य करावे.
आष्टी, पाटोदा, अंबाजोगाई या तालुक्यांमधील मागील वर्षीच्या अतिवृष्टीग्रस्त शेतकर्यांना नुकसान भरपाई द्यावी.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा