बीड शहरातील बंद असलेले पथदिवे आता चालू होणार




अधीक्षक अभियंत्यांनी तीन – चार दिवसांत मीटर बसवून पथदिवे चालू करण्याचे दिले आश्वासन

बीड दि.०९

बीड । शहरातील पथदिव्यांचा विद्युत पुरवठा महावितरण कंपनीने थकबाकी न भरल्यामुळे मागील मार्च महिन्यापासून खंडित केला होता. तो विद्युत पुरवठा चालू करण्याची मागणी नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांच्या सूचनेवरून नगरसेवकांनी अधीक्षक अभियंता र.गो. कोलप यांना निवेदनाद्वारे केली.

बीड शहरातील जालना रोडवरील महावितरण कंपनीच्या कार्यालयात शहरातील बंद असलेले पथदिवे चालू करण्यासंदर्भात महावितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता र.गो. कोलप आणि नगरसेवकांमध्ये बैठक झाली. या बैठकीत बीड शहरातील पथदिव्यांचा विद्युत पुरवठा खंडित केल्यामुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाची जाणीव करून देत बंद असलेले पथदिवे सुरू करण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली. या मागणीचा विचार करून अधीक्षक अभियंता यांनी देखील सहकार्याची भूमिका घेतली व येत्या तीन चार दिवसांत बीड शहरातील बंद असलेले पथदिवे मीटर बसवून चालू करण्याचे आश्वासन दिले.

सध्या स्थितीत कोरोना महामारीमुळे व पावसाळा ऋतुमुळे शहरातील नागरिक अत्यंत अडचणीत आहेत.संपूर्ण शहरात पथदिवे बंद असल्याकारणाने काळोखाचे साम्राज्य पसरले आहे.यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
शहरातील वयस्कर नागरिक, महिला, लहान मुले यांची खूप मोठी गैरसोय होत आहे. महावितरण कार्यालयाच्या वतीने मीटर न बसवता सरासरी विद्युत देयकाची आकारणी करून नगर पालिका कार्यालयावर होणारा अन्याय थांबवावा.नगर परिषद कार्यालयाने मार्च महिन्यात ५० लक्ष रक्कमेचा भरणा केला होता व तसेच आज दिनांक ०९ जुलै २०२१ च्या पत्रकानुसार बीड नगर पालिका कार्यालय थकबाकीपोटी ५० लक्ष रुपये व चालू देयक भरणा करण्यास तयार आहे. तसेच महावितरण कंपनीच्या मार्फत प्रायोगिक तत्वावर शहरातील विविध ठिकाणी एकूण १७ मीटर बसविण्यात आले आहेत.या १७ मीटरचे रिडिंग नुसार देयक ४९५७५/- असून एका मीटर करिता सरासरी २९१६/- येते.यानुसार शहरातील इतर एकूण २४६ मीटर पॉईंट चे देयक आकारणी केली असता एकूण देयक ७,१७, ३३६/- प्रती महिना होते. कोरोना महामारीमुळे बीड नगर परिषद कार्यालयाची वसुली कमी आहे त्यामुळे बीड नगर पालिका वीज बिल थकबाकीपोटी ५० लक्ष आणि प्रती महिना रू.७,१७,३३६/- भरणा करण्यास तयार आहे. या विषयांचे निवेदन देऊन शहरातील मार्चपासून बंद असलेले पथदिवे तात्काळ वीज जोडणी करून सुरू करावे व नागरिकांवर होणारा अन्याय थांबवावा अशी विनंती केली. यावेळी अधीक्षक अभियंता र. गो. कोलप यांनी नगरसेवकांचे म्हणणे ऐकून घेत बंद असलेले पथदिवे मीटर बसवून येत्या तीन चार दिवसांत सुरू करण्यात येईल असे आश्वासन दिले.याप्रसंगी विद्युत सभापती किशोर पिंगळे, पाणी पुरवठा सभापती सय्यद इलियास, सभापती भास्कर जाधव,नगरसेवक शेख मोहम्मद शेख खालेद,गणेश वाघमारे, रविंद्र कदम, गणेश तांदळे, भैय्यासाहेब मोरे, रणजीत बनसोडे,प्रभाकर पोकळे,संतोष गायकवाड,उपस्थित होते.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा