मानवतावादी व पर्यावरणवादी लोकसेवक – मधुकर तेलंग
“शुद्धबिजापोटी फळ रसाळ गोमटी”

सेवानिवृत्ती निमीत्त त्यांच्या कार्याचा परिचय

सौ. गंगाबाई बापुराव तेलंग व बापुराव शामराव तेलंग या उभयंताच्या पोटी संस्कारी संतती जन्माला आली. मा. बापुराव पाटील यांनी आंबुलगा ता.कंधार जि. नांदेड येथे इ.स. 1957 ला माणिक प्रभू शिक्षण संस्थेची व बोर्डींगची मुहूर्तमेढ रोवली त्यामुळे या परिसराचा शैक्षणिक उन्नतीचा मार्ग अधिक सुकर झाला. गंगाबाई व बापुराव पाटील तेलंग यांच्या पोटी दोन कन्यारत्न व चार सुपुत्रांचा जन्म झाला. थोरले चिरंजीव मा.जि.प.सदस्य मनोहर पाटील तेलंग शेती,शिक्षण व राजकारणात रमले, द्वितीय चिरंजीव डॉ.श्याम तेलंग यांनी वैद्यकीय सेवेचा वसा घेतला. विभागीय वन अधिकारी, म्हणुन वृक्षसेवा व त्यांच्या रक्षणाची धुरा तृतीय चिरंजीव मधुकर अशा तेलंग साहेबांनी सांभाळली. तर चतुर्थ चिरंजीव सुधाकर तेलंग आय ए एस. हे भारतीय प्रशासकीय सेवेत कार्यरत आहेत.
या परिवारातले आमचे स्नेही मधुकर बापराव तेलंग 31 जुलै 2021 रोजी प्रशासकीय प्रदिर्घ सेवेतून विभागीय अधिकारी म्हणून सेवानिवृत्त होत आहेत.साहेबांनी आपले प्राथमिक शिक्षण गावातल्या सरकारी शाळेत व माध्यमिक शिक्षण माणिक प्रभू विद्यालयात पूर्ण केले. उच्च माध्यमिक शिक्षणासाठी त्यांना गाव सोडावे लागले. पुढे त्यांनी परभणीच्या कृषी विद्यापीठातच उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतला. कृषी पदवीचा अभ्यासक्रम आत्मसात करत असतानाच स्पर्धा परिक्षेच्या तयारीला ते लागले. घरची परिस्थिती सर्वसाधारण असल्यामुळे त्यांना स्पर्धा परीक्षेच्या तयारीला मुकावे लागले. कुटूंबाला आर्थिक आधार देण्यासाठी डोंगरकडा साखर कारखान्यात कामाला भिडावे लागले. दिवसभर काम आणि रात्रीला आपल्या स्वप्नपूर्तीसाठी अभ्यास, अशी कसरत चालू असतानाच त्यांना सामाजिक वनीकरण विभागात सहाय्यक रोपवन अधिकारी पदावर नेमणूक झाली. दि.01 एप्रिल 1987 रोजी वन परिक्षेत्र अधिकारी या पदावर निवड इ गाली. मध्यवर्ती वनराजिक महाविद्यालय, चंद्रपूर येथे एक वर्षाचे प्रशिक्षण घेऊन व जुन्नर वन विभागात परिविक्षाधीन कालावधी यशस्वीपणे पूर्ण करून अहमदपूर येते ते रुजू झाले. तो दिवस तेलंग कुटुंबासाठी भाग्याचा होता. तसाच आंबुलगा या गावासाठीही भाग्याचा होता. गावकऱ्यांना प्रचंड आंनद झाली. जणू तो दिवस दिवाळीसारखा वाटला, हदगांव, हिंगोली, दरसरापूर, पुरंदर, अशा ठिकाणी कार्यरत असताना, साग तस्कर, चंदन तस्कर व वन्यजीव तस्करांचा बंदोबस्त केला, दुष्काळी भागात जलसंवर्धनाच्या कामाचा सपाटा त्यांनी लावला. अशा वेगवेगळ्या स्तरावर त्यांनी केलेल्या कामाची शासनाने दखल घेतली व साहेबांनी पदोन्नती मिळाली.
नांदेड येथे सहायक वनसंरक्षण पदावर विराजमान होताच वन्यप्राण्यांच्या हत्या संबंधीचे प्रलंबित गुन्हे निकालात काढले.सरकारी योजनांची आंमलबजावणी करत असताना त्यांनी आपली कल्पकता, प्रतिभा त्यात मिसळवली. एकाद्या मृतप्राय योजनेलाही सर्जनात्मक रूप दिल. वृक्षरापन करताना देशी झाडांना जास्तीचं प्राधान्य दिले. झाड आणि माणूस यांचे नाते त्यांनी आपल्या कार्यातून सिद्ध केले. जंगलझाडीत राहणाऱ्या आदिवासी समाज बांधवांची उपजीविका झाडावर अवलंबून आहे. देशी झाडे या लोकांना जगवतात त्यांच्या जीवनाला आधार देतात म्हणून अशा झाडांना त्यांनी प्रथम प्राधान्य दिले.वृक्षतोडीला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र शासनाची मोफत गॅस योजना, उज्ज्वला गॅस योजना आपल्या परिक्षेत्रात अत्यंत तळमळीने राबवल्या. जलसंवर्धन, वृक्ष संवर्धनाची कामे करताना लोकसहभाग महत्त्वाचा असतो. याची जाणीव त्यांना होती म्हणून जनजागृती केली. हदगांव वन परिक्षेत्रात येणाऱ्या 450 हेक्टर पडीक जमिनीवरती वृक्षरोपनाचा त्यांनी धडकाच लावला आजघडीला हा मूलूख वनराईने लदबदून गेला आहे. अर्धापूर येथे रोपवाटीका व मुखेड येथे वनपर्यटनस्थळाची निर्मिती त्यांनी केली. जेजूरी येथे राबवलेला जेजूरी पॅटर्न (उंच रोपांची लागवड) हा पॅटर्न तत्कालीन वनमंत्री कै. पतंगराव कदम यांना खूप आवडला. त्यांनी याची प्रत्यक्ष पाहणी करून, कामाची प्रशंसा केली. पुणे शहरालगत असणाऱ्या शासनाच्या 700 हेक्टर वनक्षेत्रावरती स्थानिक आमदार, नगरसेवक, बांधकाम व्यवसायिक,हॉटेल व्यवसायिक व कारखानदारांनी अवैधरित्या अतिक्रमण केले होते. यातले काही जन या जमिनीवर ऊस, केळी, डाळिंबाची शेती करत होते. तर काही जनांनी इमारती, कारखाने, व्यापारी प्रतिष्ठाने व फार्म हाऊस उभारले होते. आजघडीला या जमिनीचे सरकारी मूल्य 1500 कोटी रू. एवढे आहे. अखेर मुधकर तेलंग साहेबांना सहायक वनसंरक्षक पदावर नियुक्ती दिली व वनपरिक्षेत्र प्रशिक्षण केंद्रात विशेष प्रशिक्षण देऊन अतिक्रमण हटवण्याच्या मोहिमेवरती पाठवण्यात आले.
आपल्या अंगी असणारे उपजत कौशल्य, चतुराई आणि पुर्वनियोजनाच्या बळावर त्यांनी धडक कार्यवाही केली. त्यांनी आपल्या सोबत यंत्रसामुग्री व राखीव बलाचे जवान असा अभेद फौजफाटा नेला व तिथल्या अवैध साम्राज्याला सुरूंग लावला. त्यांनी या लोकांच्या विळाखात्यातून शासनाची वनजमीन मुक्त केली. अतिक्रम हटवण्याची ही मोहिम येथेच थांबली नाही, त्यानंतर त्यांना शासनाचा प्रतिनिधी म्हणन न्यायालयीन लढाई लढावी लागली. उच्च न्यायालयात 178 प्रकरणे व 18 प्रकरणे सर्वोच्च न्यायालयात गेली, या प्रकरणाचा निकाल सरकाराच्या बाजूने लागला,अतिक्रमणग्रस्त जमीन वनविभागाला परत मिळाली. विभागीय वन अधिकारी या पदावर पदोन्नती होताच, जपानी मियावाकी पद्धतीचा अवलंब करून त्यांनी उत्कृष्ट रोपवन तयार केले. आघाडीचा सिनेअभिनेता सयाजी शिंदे यांच्या सहकार्याने पालवणच्या देवराईला त्यांनी बळकटी दिली. आंबुलगा व त्या भोवती पंचक्रोषीत असणाऱ्या वाडी-तांडे-वस्तीवरल्या असंख्य तरुणांना व शेतकऱ्यांना शिक्षण, रोजगार, नोकरी, लग्न, आजारपणात सढळ हाताने त्यांनी तन-मन-धनाने मदत केली. आज तेलंग साहेबांची सेवापूर्ती होत आहे, विभागीय वन अधिकारी या पदावरून ते सेवानिवृत्त होत आहेत. भावी आयुष्याच्या वाटचालीत आधुनिक व तंत्रज्ञानात्मक शेती, समाजसेवा, पर्यावरण, गाव व परिसरातल्या शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, कृषी विषयक मार्गदर्शन करण्याचा संकल्प त्यांनी केला आहे.

-{पत्रकार दादासाहेब जोगदंड}

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा