सेकंदात नेमकं काय घडलं!; अन् तिने रिक्षातून घेतली उडी





 

औरंगाबाद : शिकवणीसाठी निघालेल्या तरुणीने धावत्या रिक्षातून अचानक उडी घेतल्याने शनिवारी दिवसभर शहरात एकच खळबळ उडाली. ही घटना राज्यभरात गाजली. घडलेला प्रकार सीसी टिव्ही कॅमेरात कैद झाला. मात्र, अवघ्या वीस सेकंदात नेमकं काय घडलं. याचा तपास पोलीस यंत्रणा करत आहे. दरम्यान तरुणीने दिलेल्या तक्रारीवरुन त्या रिक्षा चालकाला पोलिसांनी अटक केली आहे. तसेच त्याच्याविरुध्द जिन्सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आनंद अंबादास पहुळकर (50, रा. गल्ली क्र. 24, इंदिरानगर, बायजीपुरा) असे संशयित रिक्षा चालकाचे नाव आहे.
कैलासनगर भागातील एक तरुणी शिकवणीसाठी शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास जालना रोडवरील मोंढा नाका परिसरातील पाकिजा रसवंतीसमोरुन रिक्षामध्ये बसली. त्यावेळी ती एकटीच रिक्षात होती. तिच्या म्हणण्यानुसार, रिक्षा निघाल्यानंतर चालकाचे तिला कुठे जायचे असे विचारले. तेव्हा तिने रामगिरी हॉटेलजवळ जायचे असल्याचे सांगितले. त्यावर त्याने रामगिरीच काय आपल्याला पुढे देखील जायचे आहे असे रिक्षा चालक पहुळकर म्हणाला. तेवढ्यात रिक्षा चालवत असताना मागे फिरुन त्याने हाताला स्पर्श केला.
त्यामुळे घाबरुन तरुणीने रसवंतीपासून अवघ्या शंभर मीटर अंतरावरच असलेल्या तनिष्क या दागिन्यांच्या शोरुमसमोरील रस्त्यावर रिक्षातून उडी घेतली. हा प्रकार घडताच रिक्षा चालक पहुळकर यांनी जागेवरच रिक्षा उभी केली. त्यानंतर तिचे रस्त्यावर पडलेले साहित्य पहुळकरने जमा करुन दिले. त्याचवेळी तरुणी जखमी अवस्थेतच तेथून पळू लागली. रिक्षा चालक पहुळकर  काहीवेळ तेथे थांबला. त्यानंतर तो देखील तेथून रिक्षा घेऊन निघून गेला. यानंतर एका बंद दुकानाच्या शटर बाहेर ही तरुणी जखमी अवस्थेत बसली. याप्रकारानंतर अँब्युलन्स हेल्प रायडर्स ग्रुपचे सदस्य निलेश सेवेकर यांनी तिला धीर देत तिचे मामा संतोष धोत्रे व भाऊ यांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी जिन्सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सीसी टिव्ही कॅमेरात प्रकार कैद : पाकिजा रसवंतीसमोरुन रिक्षात बसलेली तरुणी अवघ्या वीस सेकंदादरम्यान तनिष्क शोरुमपर्यंत पोहोचली. तेथे ती रिक्षातून नेमकी पडली की तिने उडी घेतली. हे चित्र सीसी टिव्हीत स्पष्ट दिसून येत नाही. रिक्षा चालकाच्या म्हणण्यानुसार ही तरुणी खाली पडली. तर दुसरीकडे रिक्षा चालकाच्या भितीने उडी घेतल्याचे तरुणीचे म्हणणे आहे. याशिवाय रिक्षा चालक पहुळकर रस्त्यावर पडलेले तिचे साहित्य आणि पैसे देत असल्याचे सीसी टिव्हीत दिसून येते.

गुन्हे शाखेसह जिन्सी पोलिसांची धाव : मोंढा नाका भागात रिक्षातून तरुणीने उडी घेतल्याची माहिती मिळताच गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव, जिन्सी पोलीस ठाण्याचे निरीक्षक व्यंकटेश केंद्रे, गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक दत्ता शेळके, सहायक फौजदार नंदकुमार भंडारे, जमादार ओमप्रकाश बनकर, धर्मराज गायकवाड यांनी धाव घेतली. सीसी टिव्ही फुटेज हस्तगत करत ते परिसरातील नागरिकांना दाखविण्यात आले. त्यावरुन पोलिसांनी रिक्षा चालक पहुळकरचा शोध घेतला. भानुदासनगरातील रिक्षा मालक ढाकणे यांना गाठत त्यांच्या मदतीने पहुळकरला ताब्यात घेतले.

रिक्षा चालक दारुच्या नशेत : पोलिसांनी ज्यावेळी रिक्षा चालक पहुळकर याला ताब्यात घेतले. त्यावेळी तो दारुच्या नशेत असल्याचे दिसून आले. मात्र, नेमका काय प्रकार घडला आहे. याची चौकशी पोलीस यंत्रणा करत आहे. सीसी टिव्हीत घटना कैद आहे. त्यामध्ये देखील तरुणी रिक्षातून पडली की तिने उडी घेतली. याचा देखील तपास करत आहोत.

-डॉ. निखील गुप्ता, पोलीस आयुक्त.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा