भुयारी गटार योजनेच्या निकृष्ट कामाच्या विरोधात परळीत भाजपाचे आमरण उपोषण




 

खा. डाॅ. प्रितमताई मुंडे यांनी घेतली उपोषणकर्त्यांची भेट

खासदारांवर उपोषण करण्याची वेळ येईल अशी परिस्थिती आणू नका – पालिकेच्या भ्रष्ट कारभारावर केला हल्लाबोल!

परळी । दिनांक ३०।
भाजपा सरकारच्या काळात शहरासाठी मंजूर झालेल्या भुयारी गटार योजनेच्या कामाचा दर्जा अतिशय निकृष्ट असून त्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या आशीर्वादाने मोठया प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे, या कामाची सखोल चौकशी करावी या मागणीसाठी भाजपाने आज आमरण उपोषण केले. खा. डाॅ. प्रितमताई मुंडे यांनी दुपारी उपोषणस्थळी भेट देऊन पालिकेच्या कारभारावर ताशेरे ओढले. या योजनेची कामे नीट करा, जनतेच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, माझ्यावर उपोषणास बसण्याची वेळ येईल अशी परिस्थिती आणू नका अशा शब्दांत हल्लाबोल केला.

भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे हया सत्तेत असताना त्यांच्या काळात सरकारने शहरासाठी भुयारी गटार योजना मंजूर केली होती. ११० कोटी रुपये बजेट असलेल्या या योजनेच्या
नावांखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यातील पालिकेने शहरातील ठिक ठिकाणचे रस्ते फोडून त्यात गटाराचे पाईप टाकले, मात्र फोडलेल्या रस्त्यावर नवीन रस्ते केले नाहीत. ज्यामुळे नागरिकांना गेल्या अनेक महिन्यांपासून हाल अपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. हे रस्ते त्वरित करावेत व निकृष्ट कामाची चौकशी करावी या प्रमुख मागणीसाठी पंकजाताई मुंडे व डॉ खा प्रितमताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपाचे नगरसेवक प्रा पवन मुंडे यांनी भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह आज नगरपालिका कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले. भुयारी गटार योजनेच्या भ्रष्ट कारभारा बरोबरच गेल्या १० वर्षापासून रखडलेली वाढीव पाणीपुरवठा योजना त्वरित कार्यान्वित करावी, पंतप्रधान आवास योजनेतील अनुदान लवकरात लवकर वाटप करावे त्यात शौचालय अनुदान कपात बंद करणे व वाढत्या डेंगू, मलेरिया चिकनगुणिया या आजारांचा प्रभाव पाहता स्वच्छता विषयक उपाय योजना त्वरित कार्यान्वित कराव्यात अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या.

खा. प्रितमताईंची भेट अन् प्रशासन हलले 

खा. डाॅ. प्रितमताई मुंडे यांनी दुपारी उपोषणास भेट देऊन कार्यकर्त्यांशी विचारपूस केली व पालिकेच्या अनागोंदी कारभारावर निशाणा साधला. भूयारी गटार योजनेच्या कामामुळे जनतेचे जे हाल होत आहेत, ते सहन करण्या पलिकडचे आहेत. या कामावर सर्वांचे बारकाईने लक्ष आहे. पालिकेचा कारभार असाच चालू राहिला तर जनता माफ करणार नाही. कामाची गुणवत्ता सुधारा, खासदारांवर उपोषणास बसण्याची वेळ येईल अशी परिस्थिती आणू नका असे सांगत जनतेला न्याय दिल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही असे त्या म्हणाल्या. यावेळी पालिकेचे मुख्याधिकारी देखील याठिकाणी उपस्थित होते. खा. प्रितमताईंच्या आक्रमक भूमिकेनंतर मुख्याधिकाऱ्यांनी तातडीने कामाची चौकशी करून महिनाभरात काम करण्याचे लेखी उत्तर दिले व त्यानंतर नगरसेवक प्रा. पवन मुंडे व कार्यकर्त्यांनी उपोषण मागे घेतले.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा