दारुसाठी मित्रांनी मित्राचाच केला घात 




Home

दारुसाठी मित्रांनी मित्राचाच केला घात

मैत्रीचा खून : विटकरीने डोक्याचा चेंदामेंदा, कांचनवाडीतून मारेकरी मित्रांना अटक

Marathwada Patra Team

 

14 September 2021

 

 

 

बीड  : दारु आणण्यावरुन वाद झाल्याने दोन मित्रांनी तरुणाची निर्घुण हत्या केली. ही खळबळजनक घटना रविवारी रात्री दहाच्या सुमारास कांचनवाडी भागात घडली. महेश दिगंबर काकडे (18, रा. नक्षत्र पार्क, कांचनवाडी) असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेनंतर गुन्हे शाखा पोलिसांनी दोन्ही मारेकर्‍यांच्या पहाटे मुसक्या आवळल्या. विकास नंदू राटवाड आणि संदीप उर्फ गुज्जर दारासिंग मुळेकर (दोघेही रा. कांचनवाडी) अशी दोघांची नावे आहेत. दरम्यान, सातारा पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला.कांचनवाडी येथील महेश काकडे याने बारावीपर्यंतचे शिक्षण घेतलेले आहे. लॉकडाऊनच्या काळात तो एका हॉटेलात नोकरीला होता. त्याचे वडील एका कंपनीत कामाला आहेत. लॉकडाऊननंतर त्याने हॉटेलातील काम सोडले. त्यानंतर काही दिवसांपुर्वी तो गेवराई तांडा येथील एका कंपनीत कामाला लागला. 11 सप्टेंबर रोजी महेशचा पगार झाला होता. रविवारी सकाळी तो बाजारात जाऊन येतो, असे सांगत घराबाहेर पडला होता. त्यानंतर सायंकाळी त्याने वडिलांना सांगितले की, मी मित्रांसोबत सिल्लोडला जात आहे. त्यामुळे सोमवारी सकाळी घरी पोहोचेल. मात्र, तो पाच ते सहा मित्रांसोबत दारु पिण्यासाठी गेला. कांचनवाडीतील एका इमारतीमध्ये महेशने विकास व संदीप यांच्यासह काही मित्रांसोबत दारु रिचवली. दारु संपल्यानंतर आणखी पिण्यासाठी विकास व संदीप यांनी महेशकडे पैशांची मागणी केली. दारु घेण्यासाठी इमारतीतून खाली असलेल्या दारुच्या दुकानासमोर आले. त्यावेळी महेशने दोघांनाही तुम्ही जास्त पिता. त्यामुळे तुम्हीच दारु घ्या, असे म्हणाला. त्यावरुन तिघांमध्ये प्रचंड वाद झाला. विकास आणि संदीपने दारु घेण्यास नकार देत महेशला मारहाणीला सुरुवात केली. हा वाद विकोपाला गेल्यानंतर दोघांनी महेशचे विटकरीने डोके फोडत चेह-याचा चेंदामेंदा केला. तोपर्यंत उर्वरीत मित्रांनी तेथून पळ काढला होता. महेश रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पाहून दोघांची नशा उतरली. त्या दोघांनीही तेथून पळ काढला.
महेशच्या मोबाइलवरुन कुटुंबियांना माहिती : या घटनेनंतर परिसरातील गॅरेज चालक रवी हर्षे यांनी महेशच्या वडिलांशी संपर्क साधला. त्यानंतर महेशच्या कुटुंबियांनी तात्काळ धाव घेत त्याला घाटीत नेले. मात्र, डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषीत केले. दरम्यान, महेश ज्या हॉटेलात कामाला होता. त्याच हॉटेलातील एका मित्राने सिल्लोडला जाण्यासाठी हॉटेल मालकाकडून पाचशे रुपये घेतले होते. त्यानंतर पाच ते सहा मित्रांसोबत महेश दारु पिण्यासाठी गेला असावा, अशी माहिती त्याच्या वडिलांनी दिली.
गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या : कांचनवाडीत खून झाल्याची माहिती मिळताच गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दत्ता शेळके यांच्यासह पथकातील सहायक फौजदार नंदकुमार भंडारे, जमादार ओमप्रकाश बनकर, शिपाई धर्मराज गायकवाड, संजयसिंग राजपूत आणि किरण गावंडे यांनी विकास आणि संदीपला कांचनवाडीतून ताब्यात घेतले. याप्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांनी दिली असून, दोघांना अटक केली आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा