हिम्मतराव बेदरे यांचे दुःखद निधन
बीड ।
सोनार समाजातील धडाडीचे कार्यकर्ते, श्री संत शिरोमणी नरहरी महाराज प्रतिष्ठानचे सदस्य तथा बीड सराफा असोसिएशनचे सचिव हिम्मतराव कांतराव बेदरे यांचे मंगळवार दि.२१ सप्टेंबर २०२१ रोजी पहाटे १ वाजून ५० मिनिटाने अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे. मृत्युसमयी त्यांचे वय ५१ वर्ष होते.
सोनार समाजासह इतर सर्वच समाजामध्ये सुख दुःखाच्या प्रसंगी धावून जात प्रत्येकाला मदत करणारे हिम्मतराव बेदरे यांचा अतूट आणि मोठा जनसंपर्क होता. प्रत्येकाला प्रिय असणारा हिम्मत नावाप्रमाणेच हिंमतवान होते. माजी आमदार सुनील धांडे यांचे जिव्हाळ्याचे मित्र म्हणून त्यांची संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये ओळख होती. कोणावर कोणतेही संकट आले, तर सर्वप्रथम धावून जाणारा सर्वांचा प्रिय मित्र म्हणून त्यांची संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये ख्याती होती. मात्र “जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला” या उक्तीप्रमाणे अल्पशा आजाराने त्यांना देवाज्ञा झाली. मंगळवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी माजी आमदार सुनील धांडे यांच्यासह त्यांच्या पत्नी ॲड. सौ. स्मिताताई धांडे, नितीन धांडे यांच्यासह संपूर्ण धांडे परिवार, ॲड. शेख शफीक भाऊ, सरफा असोसिएशन मधील सर्व पदाधिकारी आणि सदस्य यांच्यासह सोनार समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. एका धडाडीच्या आणि वाघाच्या काळीज असलेल्या कार्यकर्त्याला हुकल्याची खंत यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.
त्यांच्या पश्चात आई, पत्नी दोन मुले, एक मुलगी, पाच बहिणी, नातवंडे असा मोठा परिवार आहे. श्री संत शिरोमणी नरहरी महाराज त्यांच्या परिवाराला या मोठ्या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो अशी प्रार्थना सर्वांनीच केली असून बेदरे परिवाराच्या दुःखामध्ये दैनिक मराठवाडा साथी परिवार सहभागी आहे.
संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा