खरा गांधीवादी शोधायचा कसा..?   





 

जयंत्या किंवा जन्मशताब्दी आदींवर माझा विश्‍वास नाही, हे सर्वप्रथम मला नमूद करू द्या. माझ्या मते आपल्या दैनंदिन व्यवहारात गांधीजींच्या जीवनमूल्यांचा अवलंब करणे म्हणजेच खर्‍या अर्थाने गांधीवादी असणे आणि त्यांचा उचित सन्मान करणे होय. जयंत्या किंवा जन्मदिवस साजरे करणे म्हणजे केवळ एक उपचार आहे. ज्या व्यक्तीची जयंती आपण साजरी करतो आहोत, त्याच्या जीवनातील काही अंश किंवा प्रभाव आपल्यावर आहे का, हा सर्वांत महत्त्वाचा प्रश्‍न आहे. तसे असेल तर त्या व्यक्तीची मूल्ये हा आपल्या जीवनाचा भाग बनून जातो. एखाद्या व्यक्तीबद्दल आदर व्यक्त करण्याचा मला हाच सर्वांत महत्त्वाचा मार्ग वाटतो. त्यामुळेच गांधी जयंती साजरी करणे आणि त्यासाठी भव्य दिव्य कार्यक्रमांचे आयोजन करणे यापेक्षा अधिक महत्त्वाचे आहे आपण आपल्या खासगी आणि सार्वजनिक जीवनात गांधीजींच्या जीवनचरित्रातील किती आदर्श घेतो?
समरसता ही भारताची अनेक शतकांची ओळख आहे. भारताची जगात ज्या स्वरूपात ओळख आहे आणि त्यामुळेच या देशाला सन्मान आहे, त्या समरस भारताची प्रतिमाच आता उद्ध्वस्त केली जात आहे; परंतु त्याच्याशी मला काहीही देणे-घेणे नाही. कारण जग माझ्याबद्दल काय विचार करते, त्याची फिकीर मी करता कामा नये; परंतु ज्यावेळी मी आरशासमोर उभा राहतो, तेव्हा माझे प्रतिबिंब पाहून मी आनंदी, समाधानी होतो की ते प्रतिबिंब पाहून मी हैराण होतो, याचा विचार मात्र मी करायलाच हवा. आपले बाह्यरूप आपण खूप सुंदर बनवू शकतो, सजवू शकतो; परंतु जो आरसा आपल्याला आपल्या आत्म्याचे दर्शन घडवितो, त्याला आपल्या बाह्य स्वरूपाशी काहीच कर्तव्य असत नाही. त्यामुळेच माझ्या चिंतेचा विषय असा आहे की, भले गांधीजींच्या नावावर भलेमोठे भव्य दिव्य कार्यक्रम होत असतील, रात्रंदिवस त्यांच्या नावाचा जप केला जात असेल, त्यांचे नाव असंख्य योजनांना दिले जात असेल, या सर्वांमधून गांधीजींचा सन्मान होणार नाही आणि हे पाहून आपल्याला कुणी गांधीवादीही म्हणणार नाही. जोपर्यंत गांधीजींची जीवननिष्ठा आणि मूल्ये आपण आपल्या दैनंदिन जीवनात जोपासत नाही, तोपर्यंत आपण गांधीवादी होऊ शकत नाही. गांधीजींचे उत्सवात रूपांतर केल्यानंतर ज्यावेळी आपल्याला देशाच्या आरशात आपला आत्मा दिसेल, त्याचे स्वरूप आपण स्वीकारू शकतो का, हा माझ्यासाठी चिंतेचा विषय आहे.
गांधीजींच्या नावाचा जप तर रात्रंदिवस सातत्याने होतच असतो; परंतु आपल्या जीवनात आणि विचारात गांधीजींना अजिबात स्थान दिले जात नाही. त्याचा प्रचंड गंभीर दुष्परिणाम होत आहे. गांधीजींच्या नावावर जे मोठमोठे कार्यक्रम करण्याची जी स्पर्धा लागलेली असते, ती वस्तुतः जनतेची दिशाभूल करण्यासाठी असते. लोकांना असे सांगण्याचा प्रयत्न केला जातो, की सरकार गांधीजींनी सांगितलेल्या मार्गावरूनच जात आहे. त्याच बळावर लोकांचा पाठिंबा मागितला जातो. जेव्हा लोक गैरसमजुतीतून एखाद्याला समर्थन देतात, तेव्हा ही मंडळी गर्वाने सांगतात की, लोकांनी आम्हाला निवडून दिले आहे. हा गांधीविचारांविरुद्धचा एक राजकीय कट आहे; परंतु मला असे वाटते, जे खरे आहे ते कधीच संपणार नाही. इतिहासात असे अनेक दाखले आहेत. सत्य काही काळापुरते झाकून ठेवता येऊ शकते; परंतु ते संपुष्टात आणता येत नाही. गांधीजींच्या विचारांचे अशा प्रकारे खोटे उदात्तीकरण करणे सोपे असते, तर जगातील गांधीजींचा प्रभाव संपुष्टात आला असता; परंतु असे झाले नाही. प्रत्येक क्षणाबरोबर गांधीजींचे महत्त्व आणि गरज पूर्वीपेक्षा वाढल्याचेच दिसून येते. जे लोक गांधीजींच्या पुतळ्याची पूजा करण्याच्या बहाण्याने आपले मनसुबे पूर्ण करू इच्छितात, त्यांना नकली भक्ती कायमस्वरूपी टिकत नाही, तिचा बुरखा लगेच फाटतो, हे कळत नसते. मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांच्या बाबतीत जे घडले किंवा घडते आहे, तसेच काहीसे गांधीजींच्या बाबतीत घडत आहे. जे लोक आपण रामाचे भक्त असल्याचे सांगण्याचा प्रयत्न करीत आहेत, त्यांना मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांचे विस्मरण झाले आहे. मर्यादा  पुरुषोत्तम असल्यामुळेच प्रभू रामचंद्रांना देवत्व प्राप्त झाले होते. काहीमंडळी मात्र रामाचे नाव घेऊन आपल्या राजकारणाला झळाळी देण्याचा प्रयत्न करीत आहेत. सध्याच्या काळातील राजकीय नेते ‘आयकॉनिक’ पूजेचा देखावा करतात; परंतु जे आपले आदर्श असल्याचे सांगतात त्यांच्या पावलावर पाऊल टाकून चालत मात्र नाहीत. कारण ते त्यांना बरेच कठीण वाटते आणि त्यांचा पिंडच वेगळा असतो हेही खरेच आहे. आजच्या काळातील राजकारण ‘आयकॉनिक’ पूजेच्या माध्यमातून आपले उद्दिष्ट साध्य करू इच्छिते. या प्रक्रियेत आपल्या आदर्शाच्या प्रतिमेवर अन्याय झाला तरी राजकारण्यांना ते चालते. बापूजींच्या बाबतीत नेमका हाच प्रयत्न सुरू आहे; परंतु नेत्यांनी गोंधळात टाकल्यानंतर दीर्घकाळ त्याच अवस्थेत राहील अशी जनता आता राहिलेली नाही. जनतेला भ्रमित करणे आता सोपे राहिलेले नाही. काही लोक निश्‍चितपणे भ्रमित होतात; परंतु त्याचे कारण असे की, ज्यांची गांधीजींशी तुलना करता यावी किंवा ज्यांना आजच्या काळातील गांधीजी मानता यावे, असे नेते त्यांना दिसत नाहीत.
एखाद्या महात्म्याबद्दल आपल्याला वाटणारे प्रेम खरेखुरे आहे, असे इतरांना वाटण्यासाठी त्या व्यक्तीवरील प्रेम खरे असावेच लागते. सध्या बापूंजींबद्दल जे प्रेम दिसते, जी भक्ती दिसते, ते तर एक कारस्थान आहे. बापूजींच्या नावावर आपला अजेंडा पुढे रेटण्याचे ते एक षडयंत्र आहे. एकप्रकारे बापूजींचा वापर केला जात आहे. या सार्‍याचा देशाला काहीही फायदा होणार नाही. मग त्यांची जयंती दरवर्षी कितीही गाजावाजा करून साजरी करा!
तुषार गांधी

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा