मातीचा संसार




मंगलपुष्प

मातीचा संसार

 

ज्या मातीत जन्म घेतला त्याच मातीत अंती मिसळावे लागते या सत्याची निसर्ग कायम आम्हाला जाणीव करून देत असतो. एका कवींनी आपल्या गीतात म्हटल्या प्रमाणे
तुझा मातीचा संसार तुझे मातीचे घरदार
माती मातीवर लेवूनी करशी सुवर्णशृंगार
मातीवर अहंकार, किती जळणार जळणार
अरे मातीच्या माणसा कधी तुला हे कळणार?

ज्याने ज्याने अहंकार केला त्याचा अहंकार लयाला गेला आहे याची अनेक उदाहरणे इतिहासात आहेत.पण तरीही हे सत्य नजरेआड करून आम्ही पुन्हा आमच्याच मस्तीत जगत असतो, विध्वंसक कामे करताना,या धरणीमातेवर, या निसर्गावर अन्याय करताना आम्हाला काहीही वाटत नाही.आमच्या सुखासाठी आम्ही सृष्टीला विद्रूप करतो. नैसर्गिक साधनसंपत्तीचा दुरुपयोग करतो.निसर्गाच्या जीवावर जगतो पण अन्याय मात्र त्याच्यावरच करतो.जंगले ,वनराई तोडून आम्ही आमचं सुखासीन जग निर्माण केलं.पक्क्या रस्त्यांसाठी ,घरांसाठी ,डोंगरावरील माती ओरबाडून घेतली.खचलेले डोंगर,ढासळणारे बुरूज हे कोणाच्या करणीचे फळ आहे?जमिनीची धूप का झाली?मातीला घट्ट धरून ठेवणारे वृक्ष आम्ही तोडले.आज जी अपरिमित हानी होत आहे त्याचे मूळ माणूसच आहे.स्वतःच स्वतःचा विनाश याने ओढवून घेतला.विघटन न होणाऱ्या प्लास्टिक आणि थर्माकॉलचा कचरा
अती प्रमाणात जमा झाल्याने नद्या, खाड्या,समुद्र प्रदूषित झाले.आणि अमर्याद प्रमाणात साठलेला हा कचरा शेवटी पावसाळ्यात महापूर आणतो.म्हणजे इथेही कुटील कर्म माणसाचेच.
माझे माझे करून या माणसाने साऱ्या संसाराचे ओझे करून टाकले.ज्यात तो स्वतःच अडकून गेला आहे.शेवटी या विध्वंसक माणसाला धडा शिकवण्यासाठी निसर्गाला रौद्र रूप धारण करावे लागते.पण तरीही हा त्यातून शिकत नाहीच.जोपर्यंत माणूस पर्यावरणाची हानी करत राहील तोपर्यंत त्याला येणाऱ्या नैसर्गिक संकटाना सामोरे जावे लागणार.ज्याने जन्मापासून मृत्यूपर्यंत भक्कम साथ दिली त्या निसर्गाचे उपकार स्मरणात ठरवून नैसर्गिक साधन संपत्तीचे जतन केले तरच निसर्ग आनंदाने हसेल,सृष्टी फुलेल आणि समस्त मानवी जीवन समृद्ध होईल.अन्यथा या मातीवर अन्याय करणाऱ्या माणसाला निसर्ग तांडवरूप दाखवल्या शिवाय राहणार नाही.जिच्या कुशीत जन्म होतो आणि जी माती शेवटी कुशीत घेते त्या मातीला कायम जपले पाहिजे.
या गीताच्या ओळी किती सार्थ आहेत ना…

“माती सांगे कुंभाराला पायी मज तुडविशी
तुझाच आहे शेवट वेड्या माझ्या पायाशी..”
खरच मानवाने या मातीचे उपकार कायम स्मरणात ठेवायला हवेत.

प्रणाली म्हात्रे
–विक्रोळी मुंबई.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा