खडकीतील दारूबंदीसाठी ग्राम रक्षक दलासह महिलांनी सक्रिय रहावे -अँड.देशमुख
 

वडवणी । तालुक्यातील खडकी या गावात महात्मा गांधी जयंती, लाल बहादुर शास्त्री पुण्यतिथीचे औचित्य साधून आज एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. खडकी ग्राम पंचयात हद्दीत दारूबंदी करण्याचा निर्णय जनतेने घेतला असून ग्रामरक्षक दल याठिकाणी व्यवस्थित काम करेलच. मात्र या दला बरोबर दारू रोखण्यासाठी महिलांनी पुढे यावे, असे आवाहन ज्येष्ठ समाज सेवक अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचे विश्वस्त अँड. अजित एम. देशमुख यांनी केले आहे.

आज खडकी येथे दारूबंदी संदर्भात एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आला होती. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी उद्धव महाराज चोले हे होते. तर बैठकीला पोलीस स्टेशन वडवणीचे पोलीस निरीक्षक श्री. मिरकर, जन आंदोलनाचे संघटक गोवर्धन मस्के, बीट अंमलदार बारगजे, सरपंच सुधाकर करांडे, पोलीस पाटील वशिष्ठ अण्णा करांडे, बळीराम अण्णा चोले, भागवत चोले, अशोक करांडे, इंदरराव करांडे, श्रीराम महाराज चोले, पांडुरंग चोले, मस्के मॅडम, सानप मॅडम इत्यादी उपस्थित होते.

या बैठकीत बोलताना अँड. देशमुख पुढे म्हणाले की, दारूबंदीसाठी आज जमा झालेली जनता विशेषतः पुरुषांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्याच बरोबर महिला देखील मोठ्या संख्येने दारू बंदी च्या कामासाठी पुढे आल्या आहेत. याच महिला जर सक्रिय राहिल्या तर दारूबंदी होण्यासाठी वेळ लागणार नाही. त्यामुळे गावकऱ्यांनी एकजुटीने दारू रोखण्यासाठी कामात सातत्य ठेऊन दारू बंद करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. दारूबंदीसाठी संपूर्ण गाव एकत्र आले तर त्याचा चांगला परिणाम होतो. गावातील दारू रोखताना परिसरातून गावात दारू येते का ? याकडेही लक्ष ठेवणे गरजेचे असते. गावकऱ्यां सोबतच पोलिसांची भूमिका चांगली असेल तर त्याचा चांगला परिणाम होतो. त्यामुळे प्रशासन पातळीवर काही अडचणी येत असतील तर त्या आम्हाला सांगाव्यात, आम्ही देखील मदत करू, असेही अँड. देशमुख यांनी यावेळी बोलताना म्हटले.

ह.भ.प. उद्धव महाराज चोले यांनी अनेक उदाहरणे देत पोटतिडकीने आपली भावना व्यक्त केली. दारूमुळे होणारे नुकसान आणि लहान लहान मुलं दारू पीत असल्यामुळे समाजावर होत असलेले आघात यामुळे गाव चिंतित झाले असून दारू रोखण्यासाठी आता थांबू नये. कामात सातत्य ठेऊन सर्वच बेकायदेशीर कामे बंद करून गावाचा नावलौकिक पुन्हा वाढवावा, असे ते म्हणाले. तर वडवणीचे पोलीस निरीक्षक इंदरकर यांनीही कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा देत दारू विक्रेत्यांवर नियंत्रण ठेवणार असल्याचे सांगितले.

यावेळी व्यसन मुक्ती च्या सानप मॅडम, मस्के मॅडम यांनाही आपले मत व्यक्त केले. बीट अंमलदार बारगजे यांनी आपण दारू विक्रेत्यांवर करडी नजर ठेवणार असल्याचे सांगून त्यांना धाकात घेतले. सरपंच सुधाकर करांडे यांनी गावात माझ्या काळात आणखी एकदा हा प्रयत्न झाला. परंतु त्यात सातत्य राहिले नाही. आता मात्र दारू बंद करण्यासाठी एकजुटीने सर्वांनी पुढे यावे, असे आवाहन केले. ह.भ.प. श्रीराम महाराज चोले यांनी देखील आपले मत व्यक्त केले. गावातील काही महिलांनी हे आपली भूमिका मांडली.

दारुमुळे गावकऱ्यांचे सामाजिक आणि आर्थिक नुकसान होते. कित्येक कुटुंब दारूमुळे उध्वस्त झाले आहेत. कुटुंबातील एक कर्ता मनुष्य दारू पिणार असेल, तर संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होते. त्यामुळे गावातील दारू आणि तत्सम अवैध धंदे बंद व्हायला हवेत, असे मत अनेकांनी व्यक्त करून आता बैठक आणि आंदोलनांमुळे निश्चितच सातत्य राहील. गावातील दारू व तत्सम अवैध धंदे रोखले जातील, अशी प्रबळ इच्छा या कार्यक्रमाच्या निमित्ताने गावकऱ्यांमध्ये निर्माण झाली.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रकाश जोगदंड, गोरख दराडे, बाबू पाटणकर, श्रीकांत करांडे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला. सर्व उपस्थितांचा सत्कार गावकऱ्यांनी केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्र संचालन गोरख करांडे यांनी केले.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा