अतिवृष्टीग्रस्त विद्यार्थ्यांचे शैक्षणिक, परीक्षा शुल्क माफ




औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्यादृष्टीने मोठा निर्णय घेतला आहे. विद्यापीठ परिसरातील विभागात येणार्‍या अतिवृष्टीग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक फीस व परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय अधिसभा बैठकीत सदस्यांनी एकमताने घेतला आहे, अशी माहिती प्रा. राजेश करपे यांनी दिली. या निर्णयामुळे अतिवृष्टीग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने शुक्रवारी दि.8 ऑक्टोबर रोजी अधिसभा बैठकीचे आयोजन केले होते. ही बैठक कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीस प्रकुलगुरु डॉ. श्याम शिरसाठ, कुलसचिव डॉ.जयश्री सूर्यवंशी यांच्यासह अधिसभा सदस्य उपस्थित होते. मराठवाड्यावर आभाळ फाटल्याने शेतकर्‍यांची पिके पाण्याखाली गेली आहे. शेतकर्‍यांचा तोंडचा घास पावसाने हिरवला आहे. धडधड कोसळणार्‍या पावसाने मराठवाड्यातील शेतकर्‍यांना उद्धवस्थ केले आहे. त्यामुळे विद्यापीठात शिक्षण घेणार्‍या अतिवृष्टीग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आणि परीक्षा शुल्क माफ करण्याची मागणी अधिसभा सदस्यांनी केली होती. याचा विचार करून कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी विद्यापीठाअंतर्गत येणार्‍या भागातील अतिवृष्टीग्रस्त विद्यार्थ्यांचे शैक्षणक आणि परीक्षा शुल्क माफ करण्याच्या मागणीला या बैठकीत मंजूरी दिली, अशी माहिती प्रा. राजेश करपे यांनी दिली आहे. या निर्णयाची अंमलबजावणी तात्काळ केली जाणार आहे, असेही ते म्हणाले.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा