रामगडावर गर्दीचा नव्हे तर भक्तीचा मेळावा- स्वामी योगीराज महाराज





श्री क्षेत्र रामगड येथे उत्साहात दसरा मेळावा साजरा
 दि.16  श्री क्षेत्र रामगड येथे गर्दीचा नव्हे तर भक्तीचा मेळावा आहे. या दसरा मेळाव्याला कधीही राजकीय स्वरूप येऊ देणार नाही. पुढार्‍यांसाठी नव्हे तर फक्त आणि फक्त रामभक्तांसाठीच हा दसरा मेळावा असणार असल्याचे श्री क्षेत्र रामगड संस्थानचे मठाधिपती हभप स्वामी योगीराज महाराज यांनी सांगितले. रामगड येथील आयोजित दसरा मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी आपट्याच्या झाडाची पूजा करून भाविकांनी एकमेकांना आपुलकीचे सोने दिले. यावेळी पंचक्रोशीतील राम भक्तांची मोठी उपस्थिती होती.
विजयादशमीनिमित्त मागील सहा वर्षांपासून बीड तालुक्यातील श्री क्षेत्र रामगड येथे दसरा मेळाव्याचे आयोजन केले जाते. याही वर्षी दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना हभप स्वामी योगीराज महाराज यांनी विजयादशमीचे महत्व सांगत कुविचार आणि सुविचार यामधील फरक संगितला. रावण हा खूप महान होता पण त्याचे विचार हे कुविचार होते. आणि रामाचे विचार हे सुविचार म्हणजे चांगले विचार होते. त्यामुळे आपलेही विचार चांगले असले पाहिजे. सुविचाराचा अंगीकार करून आपल्या चांगल्या जीवनाचा प्रारंभ करावा. आज रावणापेक्षाही वाईट वृत्तीचे लोक समाजात वावरत आहेत. अशा या रावणरुपी वृत्तीचा नायनाट होणे गरजेचे आहे. त्यामुळे चांगले वागा, निर्व्यसनी रहा, चांगले कर्म करा तरच जीवनात आनंद आहे, पैसा संपत्ती तर रावणाकडेही होती पण एका वाईट विचारामुळे, वाईट कृत्यामुळे सर्वकाही गमवावे लागले होते. रामगड येथे यापुढेही ही दसर्‍याची परंपरा अशीच कायम सुरू राहील. हा दसरा फक्त राम भक्तांचाच असेल, दसरा मेळाव्याला येणारा प्रत्येकजण रामभक्त म्हणून येईल, या मेळाव्याला कुठलेही राजकिय स्वरुप येऊ देणार नाही, असेही योगीराज महाराज यांनी सांगितले. यावेळी पंचक्रोशीतील भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अंबादास जाधव यांनी केले. तर सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन प्रा.संतोष डोंगरे यांनी मानले. या कार्यक्रमात वै.महंत लक्ष्मण महाराज यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने करण्यात आली.

नामलगाव फाटा ते रामगड दुचाकी रॅली

यावेळी पंचक्रोशितील युवकांनी नामलगाव फाटा ते श्री क्षेत्र रामगड अशी भव्य दुचाकी रॅली काढली होती.
हलकी पथकाच्या जल्लोषात ही रॅली गडावर पोहचली. हलकी पथकाने गडावर विविध प्रात्याक्षिके सादर करत उपस्थितांची मने जिंकली.
संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा