पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात होणार मोठे बदल, जाणून घ्या कोणाला मिळणार संधी…




पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात होणार मोठे बदल, जाणून घ्या कोणाला मिळणार संधी..

कानपूर : न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी भारताच्या संघात मोठे बदल होणार आहेत. कारण या सामन्यासाठी भारतीय संघात विराट कोहली, रोहित शर्मा, लोकेश राहुल आणि रिषभ पंतसारखे खेळाडू नसणार आहे. त्यामुळे भारताच्या या चार रीकाम्या जागांध्ये कोणाला संधी मिळणार, याची उत्सुकता सर्वांनाच आहे.
पहिल्या कसोटी सामन्यापूर्वीच लोकेश राहुल दुखापतग्रस्त झाला आणि सूर्यकुमार यादवचा संघात प्रवेश झाला. त्यामुळे आता राहुल नसल्यामुळे सलामीची जबाबदारी शुभमन गिल आणि मयांक अगरवाल यांच्यावर असणार आहे. हा पहिलाच सामना असल्यामुळे भारतीय संघ सलामीच्या जोडीत जास्त प्रयोग करणार नाही, असेच दिसत आहे. तिसऱ्या स्थानावर चेतेश्वर पुजारा येणार असल्याचे स्पष्ट आहे. विराट कोहली हा चौथ्या स्थानावर फलंदाजीला आला. या स्थानावर आता अजिंक्य रहाणे किंवा संघात पदार्पणाची संधी मिळणारा श्रेयस अय्यर येऊ शकतो. कारण कोणत्याही संघासाठी तिसरे आणि चौथे स्थान सर्वात महत्वाचे असते. त्यामुळे चौथ्या स्थानावर अजिंक्य येणार की श्रेयसला पाठवणार, याची उत्सुकता सर्वांनाच असेल. जर अजिंक्य चौथ्या स्थानावर आला तर संघाचा समतोल बिघडू शकतो, त्यामुळे कदाचिक श्रेयसला चौथ्या स्थानावर पाठवले जाऊ शकते. यावेळी संघात रिषभ पंत नसणार आहे, त्यामुळे संघात वृद्धिमान साहा आणि श्रीकर भरत हे दोन यष्टीरक्षक आहेत. जर भारतीय संघाला कोणतीही जोखीम पत्करायची नसेल तर ते यष्टीरक्षणाची जबाबदारी वृद्धिमान साहाला देतील, पण जर भविष्याच्या दृष्टीने संघाची बांधणी करायची असेल, तर भरतचा पर्याय भारतीय संघ निवडू शकतो. कारण साहा बऱ्याच महिन्यांपासून भारतीय संघातून बाहेर आहे. त्यामुळे भरतला पसंती देत भारतीय संघ न्यूझीलंडला एक धक्का देऊ शकतो. भारतामध्ये फिरकी गोलंदाजीला पोषक वातावरण असते. त्यामुळे पहिल्या कसोटीत तीन फिरकीपटूंचा समावेश निश्चित मानला जात आहे. त्यामुळे पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघात आर. अश्विन, रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांचे स्थान निश्चित समजले जात आहे. पहिल्या सामन्यात भारतीय संघ दोन वेगवान गोलंदाजांसह उतरू शकतो. यामध्ये सर्वात अनुभवी इशांत शर्माला संधी मिळेल, त्याचबरोबर त्याला यावेळी कोणाली साथ मिळेल याची उत्सुकता सर्वांना आहे. कारण संघात उमेश यादव आणि प्रसिध कृष्णन यांच्यामध्ये या जागेसाठी चांगलीच चुरस निर्माण झालेली आहे. अनुभवाच्या जोरावर उमेशला संधी मिळू शकते, पण युवा खेळाडूला संधी द्यायचा विचार भारतीय संघाने केला तर प्रसिध या जागेसाठी उत्तम दावेदार असेल.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा