मेटे साहेब, हजारो मराठा तरुण पोरांचं वाटोळं केल्यानंतरही तुमचा आत्मा अजून सुद्धा शांत झाला नाही का ?




 

सर्व सामान्य कार्यकर्त्यांनी पक्षांतर केलं तर किती मध्ये ठरलं? आणि तुम्ही समाज विकला तर ?

बीड।

मागील चार दिवसापूर्वी बीड शहरात झालेल्या पक्ष प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर विधान परिषदेचे आमदार विनायकराव मेटे साहेब यांनी कालच्या त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये शंका व प्रश्न उपस्थित केले होते. अमर नाईकवाडे, फारुक पटेल, गंगाधर घुमरे, बाबुशेठ लोढा व नितीन लोढा यांच्या शिवसेना पक्ष प्रवेशामुळे आता बीड शहरात आपली दाळ शिजते का नाही अशी भीती आमदार महोदयांना वाटू लागली आहे. वरील पाच नावांपैकी बाबूसेठ लोढा व नितीन लोढा यांनी मेटे साहेबांना पूर्वी मदत केलेली आहे. त्याचे फळ त्यांना काय मिळाले? मेटे साहेब तुमच्यासोबत तुमचे कार्यकर्ते जास्त काळ का राहात नाहीत याचा अगोदर विचार करा. एका क्षीरसागरांकडे दुखावलेला कार्यकर्ता दुसऱ्या क्षीरसागरांकडे जाण्याऐवजी तुमच्याकडे का येत नाही याचे अगोदर आत्मपरीक्षण करा. प्रत्येक वेळी तोडपाणी करून कार्यकर्त्यांचा बळी देणे आणि आपली पोळी भाजून घेणे आता जग जाहीर झाले आहे. समाजात तुमची विश्वासार्हता शून्य असल्यामुळेच कार्यकर्ता तुम्हाला पर्याय म्हणून पाहात नाही. नगरसेवक फारुख पटेल व अमर नाईकवाडे यांनी कोविड काळात शहरातील नागरिकांसाठी स्वतःला झोकून देऊन सेवा दिली. त्यांच्याप्रती बीड शहरवासीयांना आपलेपणाची भावना आहे. कुटुंबातील मुलगा, भाऊ, वडील असल्याप्रमाणे जिल्हा रुग्णालयात जाऊन रुग्णांची काळजी घेतली. विनाकारण त्यांच्यावर चिखलफेक करून स्वतःची उंची कमी करून घेऊ नका हा माझा फुकटचा सल्ला सामाजिक कार्यकर्ते सुखदेव गुंदेकर व सूरज जाधव यांनी दिला आहे.

1995 ला युती सरकारच्या काळात तुमचे सहकारी राहिलेले स्वर्गीय किसनराव वरखंडे यांचा राजकीय गेम करून मिळवलेली आमदारकी तुम्ही कशी मिळवलीत? आपल्या जिल्ह्याचे भूमिपुत्र तथा तत्कालीन उपमुख्यमंत्री गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या कृपेमुळे मिळालेली आमदारकी त्यांच्या पाठीत खंजीर खुपसावुन शरद पवार साहेबांच्या चरणी अर्पण करताना तुमचा राष्ट्रवादी पक्ष प्रवेश किती मध्ये ठरला होता? राष्ट्रवादीत राहून हुजरेगिरी केल्यानंतर अजित दादांबरोबर जवळीक साधलीत व दुसरी आमदारकी मिळवली. स्वपक्षातले ओबीसी नेतृत्व भुजबळ साहेब यांच्या विरोधात गरळ ओकण्यासाठी तुमचं किती मध्ये ठरलं होतं? आणि पुन्हा तडजोडी अंती लोकसभा निवडणुकीत त्याच भुजबळांच्या पुतण्याचा प्रचार करण्यासाठी म्हणजे समीर भुजबळ यांच्या प्रचारासाठी कितीची तोडपाणी झाली होती? याच लोकसभा निवडणुकीत जेव्हा मुंडे साहेब बीडमध्ये निवडणूक लढवत होते तेव्हा सुरुवातीला आपण त्यांना विरोध केलात व नंतर त्यांना निवडून आणण्याचे आवाहन देखील केले ते आवाहन करण्यासाठी तुमचं किती मध्ये ठरलं होतं? अजित दादांनी तिसऱ्यांदा आमदारकी देऊन सुद्धा तुमचं मन भरलं नाही, त्यामुळे तुम्ही माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे जाताना किती मध्ये ठरलं होतं?

वर झाला राज्याचा विषय आता मला सांगा बीडमध्ये पंचायत समिती ताब्यात घेताना जयदत्त अण्णा क्षीरसागर यांच्या सोबत किती मध्ये ठरलं होतं? नगर रोड सारख्या महागड्या भागात (जागेचे भाव गगनाला भिडलेले आहेत) शिवसंग्राम भवन कोणत्या बाबी केल्यानंतर मिळालं होतं? 2019 च्या विधानसभा निवडणुकीत निवडणूक न लढवण्याचा निर्णय किती मध्ये ठरला होता? मेटे साहेब ही यादी खूप मोठी आहे. तुमची पूर्ण हायात मराठ्यांच्या पोरांचे बळी देऊन सत्तापदे उपभोग घेण्यात गेलेली आहे. त्यामुळे सर्व सामान्य घरातून आलेल्या कार्यकर्त्यांनी पक्ष बदलले तर शंका उपस्थित करता आणि तुम्ही पक्ष बदलले तर क्रांती केली असा आव आणता. बस झालं हे तोडपाणीचं राजकारण. आम्हाला अजूनही बऱ्याच गोष्टींचा उल्लेख इथे करता आला असता परंतु राजकारणातील आपलं वय आणि अनुभव लक्षात घेता आम्ही ते टाळत आहोत. बीडच्या राजकारणात तरुण पोरांना मदत करता आली तर करा पण त्यांचे नुकसान करू नका एवढीच आपल्याकडून अपेक्षा बाळगतोत, असे पत्रक सामाजिक कार्यकर्ते सुखदेव गुंदेकर व सुरज जाधव यांनी प्रसिद्धीस दिले आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा