सावित्री एक क्रांतीज्योत…




सावित्री एक क्रांतीज्योत..
महाराष्ट्र ही संत महंतांची.. समाज सुधारकांची पवित्र भूमी आहे .अशा पावनभूमीमध्ये महिलांना गुलामगिरीतून मुक्त करून जीवन जगण्याचा मार्ग दाखवून, मानसन्मानाची जाणीव करून देण्यासाठी 3 जानेवारी 1831 रोजी महाराष्ट्रामधील सातारा जिल्ह्यातील नायगाव गावात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला .
बुद्धी विकसित झाल्याशिवाय व्यक्तीला योग्य अयोग्य कळणार नाही आणि योग्य अयोग्य कळल्याशिवाय माणूस कृतिशील होत नाही ही जाणीव मनी धरून मुलींसाठी पुण्यात 1848 मध्ये पहिली महिला शाळा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी काढली. सावित्रीबाईंनी महिलांसाठी विविध बंड पुकारले बालविवाहावर बंदी केली आणि अनिष्ट रूढी परंपरा, विधवांच्या अत्याचाराला लगाम लावून समाजातील कुप्रथा समूळ उखडून टाकून स्त्रियांना स्वत्वाची जाणीव करून दिली. तिचे हक्क ,कर्तव्य मानसन्मान आणि स्थान उंचावण्याचा यशस्वी प्रयत्न केला. त्याचबरोबर पती महात्मा ज्योतिबा फुले यांच्यासोबत विधवा, दलित, पीडित स्त्रिया आणि रंजल्या गांजलेल्या लोकांची सेवा करण्याचे व्रत अंगीकारले .त्यांच्या व्यथावेदनांच्या निराकारणाचा मार्ग म्हणून विद्येची कास धरली आणि नुसत जगण्यापेक्षा जाणिवेने जगणं कसं महत्त्वाचं असतं हे पटवून दिलं .
आज क्रांतीज्योती सावित्रीबाईंच्या जन्माला 174 वर्षे पूर्ण झाले आहेत ..खरंच आज सावित्रीबाईंनी जे स्त्रियांसाठी उल्लेखनीय कार्य केले आहे त्याचा जागर/ अवलोकन करण्याची वेळ आली आहे .आज स्त्री सर्व क्षेत्रात पारंगत असून उत्तुंग भरारी घेत आहे केवळ आदर्श गृहिणी नव्हे तर आदर्श समाज घडविण्यासाठी तारेवरची कसरत करत आकाशाला गवसणी घालण्याची क्षमता तिच्यामध्ये निर्माण झाली आहे आणि त्या सर्वांचे श्रेय आपल्या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका, समाजसेविका ,उत्तम कवयित्री घराघरात ज्ञानज्योत लावणाऱ्या.. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले .
विद्ये विना मती गेली ,
मतीविना नीती गेली,
नीतीविना गती गेली ,
गतीविना वित्त गेले,
वित्तविना शूद्र खचले
इतके अनर्थ एका अविद्याने केले असे अनर्थ टाळण्यासाठी त्याचबरोबर केवळ चूल आणि मूल एवढेच स्त्रियांचे विश्व ..क्षेत्र नसून त्यांना समाजात मानाचे स्थान मिळवण्यासाठी, त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण हा अविभाज्य घटक आहे आणि त्यामधुनच स्त्रियांना स्वावलंबी बनविणाऱ्या ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले’ यांना विनम्र अभिवादन!


सौ अश्विनी वासुदेवराव टेकाळे (जोशी )
चंपावती विद्यालय, बीड.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा