मराठवाडा, विदर्भासह राज्यात अनेक भागांत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस




गुजरात, गोव्याच्या समुद्र किनाऱ्यासह रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगडच्या समुद्र किनाऱ्यावर तौत्के चक्रीवादळाचा मोठा परिणाम दिसून आला आहे.

Marathwada patra Team
गुजरात, गोव्याच्या समुद्र किनाऱ्यासह रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगडच्या समुद्र किनाऱ्यावर तौत्के चक्रीवादळाचा मोठा परिणाम दिसून आला आहे. सोसाट्याचा वारा, जोरदार पाऊस आणि समुद्र किनाऱ्यावर उंचच उंच लाटा असे चित्र दिसून आले. त्याचवेळी मराठवाडा, विदर्भासह राज्यात अनेक ठिकाणी या चक्रीवादळामुळे जोरदार पावसाला सुरुवात झाली. तर काही ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यामुळे झाडे पडण्याच्या मोठ्या घटना समोर आल्या. जळगाव जिल्ह्यात झाड अंगावर पडून दोन बहिणींचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

परभणी जिल्ह्यात वारा आणि पाऊस
तौत्के चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर परभणी जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून वादळी वारे पाहत आहे. आज ढगांच्या गडगडाटासह अनेक भागात पावसाने हजेरी लावली. सकाळपासूनच परभणीत ढगाळ वातावरण होते. दुपारी 3 च्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. दरम्यान, पावसामुळे हळद शेती आणि फळबागांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. तसेच काही भागात भुईमुगाची काढणी खोळंबली आहे.

औरंगाबादेत वादळीवाऱ्यासह जोरदार पाऊस
औरंगाबाद जिल्ह्यात दुपारपासून ढगाळ वातावरण आणि वादळी वारा सुटला. दुपारी अडीच वाजेच्या सुमारास औरंगाबाद शहरासह जिल्ह्यात जोरदार पाऊस बरसला. वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याची शक्यता आहे. येथे एक तासापेक्षा जास्त वेळ मुसळधार पाऊस झाल्याने वातावरणात गारवा पसरला आहे.

जळगावात बहिणींचा मृत्यू
तौत्के चक्रीवादळामुळे जळगाव जिल्ह्यात सोसाट्याचा वारा वाहू लागला. वादळामुळे झाड कोसळून दोन बहिणींचा मृत्यू झाल्याची घटना जळगाव जिल्ह्यात घडली आहे. जळगावच्या अंमळनेर तालुक्यातील अंचलवाडी गावात ही दुर्दैवी घटना घडली आहे. दुपारी 3 वाजेच्या सुमारास पाऊस आणि वादळामुळे चिंचेचे जुने झाड कोसळले. या झाडाखाली आल्याने दोन बहिणींचा मृत्यू झालाय.

वाशिममध्ये जिल्ह्यात रुग्णालयात पाणी
अचानक आलेल्याला पावसामुळे वाशिमच्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील 31 आणि 32 क्रमांकाच्या वार्डात पाणी घुसले. त्यामुळे रुग्ण आणि नातेवाईक मोठी तारांबळ झाली. जिल्हा सामान्य रुग्णालयातील स्वच्छतागृह आणि रिकाम्या परिसरातून पावसाचे पाणी शिरले. त्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची मोठी गैरसोय होत आहे. एका रुग्णाच्या नातेवाईकाने रुग्णालयात पाणी शिरल्याचा व्हिडीओ काढून तो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

नाशिकात ढगाळ वातावरण
तौत्के चक्रीवादळाचा परिणाम नाशिकमध्येही पाहायला मिळतो आहे. नाशिकमध्ये आज ढगाळ वातावरण आहे. शहरातील काही भागात पावसाच्या हलक्या सरीही कोसळल्या. शहरात वारा मात्र कमी आहे. त्यामुळे झाडे किंवा अन्य पडझडीच्या घटना दिसून आल्या नाहीत. दरम्यान, नाशिक जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

अकोला जिल्ह्यात पाऊस
तौत्के चक्रीवादळाचा परिणाम अकोला जिल्हातही पाहायला मिळाला. जिल्ह्यातील वाडेगाव येथे जोरदार पाऊस झाला. सलग 20 मिनिटांपेक्षा अधिक वेळ पाऊस कोसळत होता. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याचे पाहायला मिळाले.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा