हे प्रभू वैद्यनाथा, शेतकऱ्यांवरील संकटे दूर कर – धनंजय मुंडे




 

श्रावण सोमवार निमित्त धनंजय मुंडे वैद्यनाथाचरणी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित प्रसाद वाटपाचा धनंजय मुंडेंच्या हस्ते शुभारंभ

नाथ प्रतिष्ठाण मार्फत वैद्यनाथ मंदिरात फुलांची विशेष सजावट, विद्युत रोषणाई व अखंड ओम नम: शिवायचा जाप

परळी वैद्यनाथ (दि. 21) – आज पवित्र श्रावण मासाचा प्रथम श्रावण सोमवार असून यानिमित्त प्रभू वैद्यनाथांचे दर्शन घेऊन मनोभावे पूजन केले. यावर्षी विशेष करून बीड जिल्ह्यात व मराठवाड्यात पाऊस काळ अत्यंत कमी असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे; अशावेळी श्रावण महिन्यात धो धो पाऊस पाडून शेतकरी बळीराजावर आलेली संकटे दूर करा, अशी प्रार्थना पंचम ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभु वैद्यनाथांच्या चरणी केली असल्याचे राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

आज श्रावण सोमवार निमित्त धनंजय मुंडे यांनी सकाळी प्रभू वैद्यनाथांचे दर्शन घेतले, त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

परळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी वैद्यनाथ मंदिर परिसरात प्रत्येक श्रावण सोमवारी साबुदाणा खिचडी व राजगिरा लाडू अशा प्रसाद वाटपाचे नियोजन करण्यात आले असून, या प्रसाद वाटपाचा आज धनंजय मुंडे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.

यावेळी वैद्यनाथ कारखन्याचे संचालक अजय मुंडे, ज्येष्ठ नेते वाल्मिक अण्णा कराड, रा.कॉ.चे तालुकाध्यक्ष वैजनाथराव सोळंके, शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी, बाजार समितीचे सभापती सूर्यभान नाना मुंडे, रामेश्वर महाराज कोकाटे, राजाभाऊ फड, अमित केंद्रे यांसह पदाधिकारी व भाविक उपस्थित होते.

*नाथ प्रतिष्ठाण तर्फे सजावट व रोषणाई*

प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी ना. धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतुन व ज्येष्ठ नेते वाल्मिक अण्णा कराड यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यनाथ मंदिराच्या गाभाऱ्यासह संपूर्ण मंदिरात सुमारे 21 प्रकारच्या फुलांनी अत्यंत आकर्षक सजावट करण्यात आली आहे. त्याचबरोबरीने मंदिरावर मनमोहक एल ई डी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे, त्यांच्या जोडीला 24 तास ओम नम: शिवाय चा जाप करणारी ध्वनी क्षेपक बसवण्यात आले असल्याची माहिती नाथ प्रतिष्ठाणचे सचिव नितीन मामा कुलकर्णी यांनी दिली आहे. या संपूर्ण सुशोभीकरणामुळे मंदिर व परिसरात अत्यंत भक्तिमय वातावरण निर्माण झालेले पाहायला मिळत आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा