बीड जिल्ह्यातील 3 लाख 89 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर नमो किसान महासन्मानचे 2 हजार रुपये जमा




बीड जिल्ह्यातील 3 लाख 89 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर नमो किसान महासन्मानचे 2 हजार रुपये जमा

*स्व.पंडित अण्णांच्या पुण्यतिथी दिवशी हे कार्य घडले, हा दिवस अविस्मरणीय – धनंजय मुंडे*

*’धनंजय आप कैसे हो?’ – मोदींचा धनंजय मुंडेंशी संवाद*

शिर्डी (दि. 26) – शिर्डी येथे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत आज राज्य सरकारच्या कृषी विभागामार्फत सुरू करण्यात आलेल्या नमो किसान महासन्मान योजनेच्या पहिल्या हप्त्याचे वितरण एका क्लिकवर करण्यात आले. याव्दारे राज्यातील 85 लाख 60 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर पहिल्या हप्त्याचे 2 हजार रुपये जमा झाले असून बीड जिल्ह्यातील 3 लाख 89 हजार 527 शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी 2 प्रमाणे 77 कोटी 91 लाख रुपयांचा पहिला हप्ता जमा झाला आहे!

आज कृषी महर्षी स्व.पंडित अण्णा मुंडे यांची पुण्यतिथी; आजच्या दिवशी शेतकऱ्यांच्या आयुष्यात एका नवीन अर्थक्रांतीची सुरुवात करणाऱ्या या योजनेची सुरुवात पंतप्रधान मोदींच्या हस्ते व्हावी, राज्याचा कृषिमंत्री म्हणून राबवलेल्या विशेष मोहिमेतून या योजनांमध्ये 13 लाख 45 हजार शेतकऱ्यांची भर पडावी आणि आजच्याच दिवशी त्यांच्या खात्यात लाभाची रक्कम सुमारे 1712 कोटी रुपये जमा व्हावेत, हा दिवस माझ्यासाठी अविस्मरणीय आहे, असे विधान कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे.

दरम्यान कार्यक्रमाचा समारोप झाल्यानंतर निरोप घेताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धनंजय मुंडे यांच्याशी आवर्जून संवाद साधला, “आप कैसे हो धनंजय? मै चलता हुं, बहुत जलद दुबारा मिलेंगे” असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धनंजय मुंडे यांचा निरोप घेतला.

धनंजय मुंडे यांचे पिता स्व.पंडित अण्णा मुंडे हे अत्यंत शेतीनिष्ठ व आधुनिक शेतकरी म्हणून ओळखले जायचे. शेतीकडे पारंपरिक शेती म्हणून न पाहता व्यावसायिक शेती म्हणून उत्पन्न वर्धनाचा दृष्टिकोन त्यांनी रुजवला. “माणसाचा, वाहनांचा, पशूंचा विमा असू शकतो मग शेतकऱ्यांच्या पिकांचा विमा का असू शकत नाही?” असे विधान एका कार्यक्रमात स्व.पंडित अण्णा मुंडे यांनी स्व.अटल बिहारी वाजपेयी यांच्या समोर केले होते. त्यानंतर केंद्रात भाजपचे सरकार आल्यावर काही दिवसातच स्व.अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारने पीक विमा योजना अस्तित्वात आणली, यामुळे पंडित अण्णा मुंडे यांची ‘पीक विम्याचे जनक’ अशीही ओळख आहे.

आज त्यांची तिथीनुसार पुण्यतिथी, घरी आयोजित पुण्यतिथीचा कार्यक्रम पुढे ढकलून धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांना थेट लाभ देणाऱ्या या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचा निर्णय घेतला, त्याचे सार्थक झाल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

दरम्यान नमो किसान महासन्मान योजनेतून प्रत्येक वर्षी शेतकऱ्यांना 2 हजारांच्या तीन हप्त्यात 6 हजार रुपये आर्थिक लाभ डीबीटी द्वारे थेट देण्यात येणार असून, आज त्याचा पहिला हप्ता वितरित करण्यात आला. बीड जिल्ह्यातील 3 लाख 89 हजार 527 शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला आहे. यासाठी एकूण 77 कोटी 91 लाख रुपये इतका निधी डीबीटी द्वारे वितरित करण्यात आला. कार्यक्रमास राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यासह मंत्रांडळातील अन्य सदस्य, खासदार, आमदार आदींची उपस्थिती होती.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा