चेकपोस्टवरील पोलिसांच्या पँडॉलमध्येच घुसली भरधाव जीप




बदनापूर : कोरोना काळात सुरू असलेल्या नाकाबंदी व विनापास प्रवास करणार्‍या वाहनांची तपासणी करण्यासाठी औरंगाबाद-जालना सिमेवरील वरूडी येथील चेकपोस्टजवळ पोलिसांच्या तात्पुरत्या पँडॉलमध्येच सकाळी वाहनचालकाचे नियंत्रण सुटल्याने बोलेरो जीप घुसून तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले तर आरोग्य कर्मचारी बालंबाल बचावले.

प्रशासनाचे कोरोना ब्रेक द चेन या उपक्रमांतर्गत निर्बंध लागू केल्यानंतर औरंगाबाद व जालना जिल्ह्याची सीमा असलेल्या वरुडी फाट्याजवळ पोलीस चेक पोस्ट सुरू करण्यात आलेले आहे. या ठिकाणी वाहने थांबवून पोलीस येणार्‍या जाणार्‍यांकडे ई-पाससह इतर बाबींची तपासणी करतात. शनिवारी सकाळी 7 वाजता नेहमीप्रमाणे या चेक पोस्टवर पोलीस कर्मचारी गजानन जारवाल, चंद्रकांत लोखंडे, अमोल रगडे, आरोग्य कर्मचारी के. व्ही. मोरे हे कर्तव्यावर असतांना अचानक औरंगाबादकडून जालन्याकडे जाणारी बोलेरो (एमएच 42 एएक्स 1687)  चेकपोस्ट येथे असलेल्या पँडॉलमध्ये घुसल्याने पोलिस कर्मचारी गजानन जारवाल यांना जोराचा मार लागून ते जखमी झाले. त्यांचा हात फॅक्चर झाला असून गृहरक्षक दलाचे जवान चंद्रकांत लोखंडे, अमोल रगडे हे देखील जखमी झाले आहेत. तर आरोग्य कर्मचारी के. व्ही. मोरे हे बालंबाल बचावले.

दरम्यान, जखमींना तत्काळ येथीलच अलनूर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. या ठिकाणी पोलिस कर्मचारी गजानन जारवाल यांच्या हात फॅक्चर असल्यामुळे पुढील उपचारासाठी जालना येथे पाठवण्यात आले. दरम्यान, हे चारही कर्मचारी रात्रीपाळीत काम करत होते. सकाळी 8 वाजता त्यांची ड्युटी संपणार होती. त्यापूर्वीच ही दुर्दैवी घटना घडली. या चेकपोस्टवर लावलेल्या बॅरिकेटस रात्रीच्या अंधारात दिसत नाही. तसचे वाहनचालकाच्या हलगर्जीपणामुळे सदरील अपघात घडला असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, बोलेरो जीप चालक वाहन सोडून पळून गेला असून घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती बदनापूर ठाण्यातील पोलीस कर्मचारी चरणसिंग बमनावत यांनी दिली.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा