कुस्तीपटू सुशील कुमारला अटक




नवी दिल्ली : छत्रसाल स्टेडियमवरील २३ वर्षीय सागर राणा हत्या आणि मारहाण प्रकरणातील आरोपी ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटू सुशील कुमारला दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी सुशील कुमारने दिल्लीतील न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी धाव घेतली होती. मात्र, न्यायालयाने जामीन फेटाळून लावला होता. या घटनेपासून सुशील कुमार फरार होता. सुशील आणि त्याच्या 9 साथीदारांचा दिल्ली पोलिसांकडून शोध सुरू होता. सुशीलला पकडण्यासाठी पोलिसांनी एक लाखाचे रोख इनामसुद्धा जाहीर केले होते. अखेर त्याला अटक करण्यात दिल्ली पोलिसांना यश आलेले आहे.

छत्रसाल स्टेडियमवर ४ मेच्या रात्री झालेल्या मारहाणीच्या घटनेत २३ वर्षीय कनिष्ठ राष्ट्रीय विजेता कुस्तीपटू सागर राणाची हत्या झाली होती. तर सोनू आणि अमित कुमार जखमी झाला होता. या प्रकरणी सुशील आणि त्याच्या नऊ साथीदारांचा दिल्ली पोलिसांकडून शोध सुरू होता. सुशील कुमारने अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते, मात्र हत्या, अपहरण आणि गुन्हेगारी कट अशा प्रकारचे आरोप सुशीलवर असल्यामुळे अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश जगदीश कुमार यांनी सुशीलचा जामीन नाकारला होता.

दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने ५ मेपासूनच सुशील कुमारच्या शोध सुरू केला होता. कारण मृत्यूची बातमी कळाल्यानंतरच सुशील कुमार घरातून फरार झाला होता, अशी माहिती पोलिसांनी यापूर्वी दिलेली होती. याप्रकरणी सुशील कुमारविरोधात काही सीसीटीव्ही फुटेजही सापडले होते. सुशील कुमारला अटक करण्यात आल्याची माहिती दिल्ली पोलीस विशेष सेलचे आयुक्त नीरज ठाकूर यांनी दिली आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा