वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू प.पु.श्रीगुरु बंकटस्वामी महाराज यांची आज 77 वी पुण्यतिथी




विष्णुप्रियं विष्णुभक्तमं ज्ञानेश्वरीकृतश्रमं |

बंकटस्वामीनं भक्त्या सततं प्राणमाम्यहम ||१||
यस्य स्मरणमात्रेण मंदो$पि विबुधायते|
दंतं तं परमोदारं वंदे बंकटस्वामीनं ||२||

बंकटस्वामी हे थोर संत महाराष्ट्र मध्ये होऊन गेले , त्यांनी समाज सुधारण्यासाठी विचार्नेचे मंथन केले. श्री. स्वामी महाराजांचा जन्म मराठवाडा विभागांतील बीड जिल्ह्यांत शके 1799 मध्ये निनगुर गांवी बुंदेलखंडातून येथे वास्तव्यास आलेल्या राजपुत घराण्यांमध्ये झाला. श्री. स्वामी महाराजांचे जन्माबाबातही थोडे आश्चर्यच घडले ते असे की, “ द्वापालयुगी श्री शुकाचार्य मातेच्या गर्भात 12 वर्षे होते तद्वत् श्री. स्वामी महाराज सुद्धा कोणी 18 महिने म्हणतात” पण काहीही असो निसर्ग नियमापेक्षा कांही दिवस तरी जास्तच काल गर्भात राहिले एवढे मात्र निश्‍चितच. प्रसुतीसाठी व्याकुळ व चिंतातूर असणारी माता रन्नदेवी व पिताजी निहालसिंग यांनी सुखरूप व लवकर प्रसुती व्हावी म्हणून आले कुलदैवत “श्री व्यंकटेशाची” प्रार्थना केली आणि बालकाचा जन्म होताच श्री व्यंकटेशाचा प्रसाद म्हणून मुलाचे नांव व्यंकटेश ठेवले पण रजपूत घराण्यांचे परंपरेनुसार त्या नांवामध्ये सिंग हे लावून त्याला व्यंकटसिंग असे नांवाने ओळखले जावू लागले परंतु याही नांवाचा अपभ्रंश पुढें बंकटसिंग असा झाल्यामुळे लोक त्यांना बंकटसिंगच म्हणून लागले.
प्राचिन कालिन पद्धतीप्रमाणे पंतोजी ‘गोविंददासजी विद्यासागर’ यांचे शाळेत घातले, परंतु कयाधुपूत्र भक्तराज प्रल्हादाप्रमाणे तिथेही बंकटसिंगने आपल्या विद्यार्थी बांधवांना श्रीहरीचे भजनच शिकविले. अशी भगवत्भजन प्रीयता आणि घरची गरीबी असल्यामुळे त्यांना शिक्षण घेता आले नाही. कारण “दारिद्र हे गुणोत्कर्षाला प्रतिबंधकच” यामुळे त्यांना अनेक ठिकाणी नोकर्‍या कराव्या लागल्या, लोकांच्या शेळ्या-मेंढ्या, गुरे इ. चारावी लागली. पण म्हणतात ना! “आवड ही गुणोत्कर्षाची जननी असते.” म्हणून याच काळात ते मृदंगवादन व गायक कलाही शिकले, पोहणे, व्यायाम, घोडदौड इ. गुणाबरोबरच व्यवहार कुशलता, चातुर्य, प्रसंगावधान, हुशारी, उत्तम सचोटी व सत्वशील वृत्ती इ. हे गुणसुद्धा त्यांचे ठिकाण जन्मजात होते.
वारकरी पंथाची पताका उंचउंच चिरकाल फडकत रहावी म्हणून गुरुवर्य जोग म.नी.इ.स.1919 साली स्वतः 11 हजार रूपये देणगी देवून पवित्र इंद्रायणीच्या जलतुषाराने पावन व श्री ज्ञानचक्रवर्ती ज्ञानदेवांच्या समाधीमुळे अलंकृत झालेल्या आळंदी क्षेत्रांमध्ये वारकरी शिक्षण संस्थेची स्थापना केली आणि तेथे श्री.ह.भ.प. गु.मामासाहेब दांडेकर, श्री.लक्ष्मणबुवा इगतपुरीकर, श्री मारोतिबुवा गुरव व श्री.बं. स्वामी महाराज हे चार आधारस्तंभ नेमून दिले. शके 1841 इ.स.1920 साली गु.जोग महाराज ब्रह्मस्वरूपी लीन झाले. स्वामी प्रत्येक अधिकमासांत पंढरपुर, पैठण, नासिक इ.एकेका क्षेत्रांत महिनाभर फारच मोठा सप्ताह करून अन्नदान करीत. दररोज साधारण 8-9 हजार बाहेरगांवचे लोक टाळकरी व त्या गावांतील रोज एकेक गल्ली जेवणास रहात असे. शेवटीचे दिवशी संपूर्ण मुक्ताद्वार राही. त्यामुळे भरपूर अन्नदान होत असे. सर्व दिवसांच्या पंक्ती बहुतेक नेमलेल्याच असत. परंतु एकवेळ नाशिक येथील सप्ताहाचा शेवआचा दिवस कोणी न घेतल्यामुळे स्वामी चिंता करीत होते. येवढ्यांत एका शेटजीने नमस्कार करून लाडूच्या 5 ते 6 गाड्या व इतर मालाचय गाड्या आणल्या आहेत त्या उतरून घ्या अशी विनंती केली. गाड्या खाली लोक करू लागले पण शेटजी दिसेनात म्हणून हे शेटजी कोण परिचय दिला नाही, त्यामुळे शोधाशोध सुरु झाली पण पुन्हा शेटजी भेटलेच नाहीत. आज निश्‍चितच पांडूरंगाने या रूपाने माझे हे काम केलें त्याशिवाय करणार कोण असें जाणून श्री स्वामीचे डोळे अश्रुंनी भरून आले असे चमत्कार किती सांगावे? श्री.स्वामीनी आपले जीवन केवळ ईश्‍वरसेवेसाठी समर्पण केले होते हे शिष्य मठादि परिवार सोडून वेळोवेळी एकांतवासांत केलेल्या अनेक अनुष्ठानावरून सिद्ध होते.
धर्मप्रचार आणि संप्रदाय प्रचारार्थ स्वामी महाराज गावोगांव उन्हातान्हांत पायी फिरात, पण बरोबर घोडे-गाडी इ. अनेक साधने असूनही त्यांत बसत नसत. रात्री कीर्तनासाठी तीन-तीन तास उभे राहत. आषाढीचे वेळी काही दिवस देहूवरनू श्री. तु.म.चे पालखी सोहळ्यांबरोबर व नंतर दौंडकडून पंढरपुरला श्री स्वामी दिंडी आणीत व कार्तिक वारीला निनगुरहून कार्तिक शु.1 ते शुद्ध दशमी पर्यंत 15 दिवस पायी दिंडी आणीत. याही वेळी शेकडो गोड्या-घोडे इ. साधने बरोबर असूनही त्यांत न बसतां पायी भजन म्हणून चालत असत.
काळ सार्थक केला त्यांनी (जीवनपट)
इ.स.1877 जन्म निनगुर जि.बीड
इ.स.1889 श्रीगुरुभेट (वयाच्या बाराव्या वर्षी)
इ.स.1890 ते 1892 भंडारा डोंगरावर गाथा पाठांतर.
इ.स.1893 भामचंद्र डोंगरावर अनुष्ठान व उपासना.
इ.स.1894 ते 1896 वेदांत ग्रंथांचा अभ्यास.
इ.स.1897 ज्ञानेश्‍वरींची केवळ दुधावर राहून 108 पारायणे.
इ.स.1898 पासून मोठमोठे अखंड हरिनाम सप्ताह व जनजागृती.
इ.स.1920 वा.शि.संस्थेचे अध्यक्षपद व तिच्या उन्नतीसाठी सर्वतोपरी प्रयत्न.
इ.स.1927 सार्थ ज्ञानेश्‍वरी प्रकाशन व वारकरी संप्रदायाचा प्रसार.
इ.स.1944 या जनतेच्या व जनार्दनाच्या लाडक्या भगवद् भकताचे महानिर्वाण.

ईश्‍वराने प्रदान केलेल्या आपल्या 67 वर्षाच्या आयुष्याचे वै.स्वामी महाराजांनी अक्षरशः सोने केले, विठोबाचे दास होऊन हरिभजनाने जग धवळून काढले. तर कीर्तन प्रवचन सेवेने ठायी ठायी आत्मज्ञानीदीप प्रज्वलीत केले. दिंडी सप्तहादि उपक्रमाद्वारे वैष्णांची मांदियाळी मेळविली आणि लाखो लोकांन अन्नदान आणि ज्ञानदान करून महाराष्ट्र मानस सात्विक, सुपीक करण्याचे महत्वकार्य केले. स्वामींनी संघटन कौशल्याने संतधर्माचा झंझावाती प्रचार तर केलाच पण संत तत्वज्ञानाचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी महाराष्ट्रातील विविध जाती जमातीतून अनेक उत्तम आत्मे घडविले. स्वामींच्या तालमीत तावून सुलाखून निघालेल्या या शिष्यांनी आपले जिवीतही आपल्या गुरुसारखेच संतविचाराद्वारे समाज प्रबोधनासाठी वेचले. या लेखात वै.स्वामींची प्रभावह आणि त्यांच्या कर्तृत्वाची दखल घेण्याचा अल्पसा प्रयत्न करण्यात आला आहे.
1) वै.ह.भ.प.भगवानबाबा श्रीक्षेत्र भगवानगड
2)ह.भ.प. श्री.सुदाम देव महाराज श्री.बंकटस्वामी मठ-निनगुर
3)वै.ह.भ.प. वामनभाऊ महाराजः गहिनीनाथगड
4)ह.भ.प. एकनाथ महाराज पालसिंगन मठाधिपती बंकटस्वामी, पंढरपुर
5)पद्मश्री शंकर बापू आपेगावकर
6)वै.ह.भ.प. श्रीकृष्णदास लोहिया महाराज नगरकर
7)ह.भ.प. म्हातारबुवा शिंदे खणेपुरीकर -जि.जालना
8)वै. परमभागवत रामकृष्ण बुवा येडसीकर
9)वै. गणपतबुवा सातपुते -नेकनूर
10)वै.ह.भ.प. नारायणबुवा मोरगावकर
11)वै.ह.भ.प.माणिकबाबा शिंदे (मरसा)
12) वै.ह.भ.प. भागवत महाराज जगताप, निनगुर.
13)वै.ह.भ.प.गणपतबुवा सावरगावकर.
14) श्री.ह.भ.प.बाबुलाल पाडळीकर
15)श्री.ह.भ.प. नारायणगिरी महाराज सरला बेट
16)श्री.ह.भ.प.ज्ञानोबा बोधले येरमाळकर
17)वै.ह.भ.प. ज्ञानोबा माऊली सनगांवकर
18)कै.ह.भ.प. कानिङ्गीनाथ भाऊ जानोरीकर-नाशिक
19)कै.ह.भ.प.सोनोपंत खराडकर खराडी-गंगापुर
20)कै.ह.भ.प.रामचंद्र बुवा नागपुरकर
21)कै.ह.भ.प.शंकरबुवा गुरुजी-वैजापूर
22)कै.ह.भ.प.सुंदरबुवा शिंदे निनगुरकर
23)कै.ह.भ.प.जोतिबा डौरी-निनगुर
24)वै.ह.भ.प. ज्ञानोबा कासार निनगुरकर
25)वै.ह.भ.प.पंढरीनाथ बुवा पटेगावकर (कोपरगाव)
26)श्री.ह.भ.प. माधवबुवा सुकाळे-(पुणे)
27)श्री.ह.भ.प. बाबुराव डौरी-निनगुरकर.
28)श्री.विष्णूबुवा सातपुते निनगुरकर.
वै.बंकटस्वामी महाराजांच्या भक्ती प्रेमरसाच्या अलौकीक प्रभावातून निर्माण झालेली ही प्रभावळ अस्सल चंदनाची खोडं होती. महाराष्ट्रभूमी भक्तीगंधीत करण्यासाठी ही सर्व खोडं झिजली. आणि संत विचार प्रसारासाठी स्वार्थतयागपुर्णक झिवण्याचा मंत्र मागे ठेवून गेली. ती स्वामी महाराजांची शिष्यमंडळी आज ह्यातत आहेत ती देखील आयुष्याच्या अंतापर्यंत झिजणारे आहेत. संतासाठी आणि संत विचाराला मुर्तरूप देण्यासाठी! ( (जर एखादे नाव राहिले असेल तर अनावधानाने राहिलेेले आहे असे समजावे.)

*बीड जिल्ह्यातील निनगुर म्हणजेच आजचे नेकनूर या गावी सन १८७७ साली बंकटस्वामी महाराज यांचा रजपूत समाजातील एका सामान्य कुटुंबात जन्म झाला. लहान असताना त्यांनी गाई सांभाळल्या. इगतपुरी येथे लक्ष्मण वाणी यांच्या दुकानावर काही दिवस काम केले. तेथेच लक्ष्मण महाराज इगतपुरीकर यांची भेट झाली व ते हरी भजनात रमू लागले. एकदा वै. विष्णुबुवा जोग महाराज यांनी स्वामींचे भजन ऐकले. स्वामींचा आवाज व चाली अतिशय गोड होत्या. जोग महाराज यांनी स्वामींना आळंदीला येण्याचा आग्रह केला. स्वामींनीही लगेच होकार दिला व त्यांच्या सोबत आळंदीचा मार्ग धरला. आळंदीला येऊन त्यांनी भंडारा डोंगरावर व भामचंद्र डोंगरावर ज्ञानेश्वरी, भागवत, तुकाराम गाथा या ग्रंथांची पारायणे केली. त्याच वेळी वै. विष्णुबुवा जोग महाराज यांनी आळंदीत पहिली वारकरी शिक्षण संस्था स्थापन केली. मामासाहेब दांडेकर, लक्ष्मण महाराज इगतपुरीकर, मारुती म. गुरव व बंकट स्वामी महाराज हे सर्व लोक त्या संस्थेचे प्रमुख खांब होते. त्यांनी महाराष्ट्रभर भ्रमंती करून वारकरी संप्रदायाचे भरीव कार्य केले. बंकटस्वामींनी अनेक शिष्य घडविले त्यात संत वामनभाऊ महाराज, संत भगवान बाबा, श्रीकृष्ण महाराज लोहिया, माणिक बाबा, नारायण बाबा घोडके, बन्सी महाराज नेवासेकर, बाबूलाल महाराज पाडळीकर, रामकृष्णभाऊ येडशीकर, माधव महाराज सुकाळे(गुरुजी) यांच्यासह अनेक गुणवान कीर्तनकार घडविले.*

आज गुरुवर्य बंकट स्वामी महाराज यांची पुण्यतिथी

स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज
*२४/३/१९१७ ते ५/२/१९२०*

वारकरी संप्रदायात आळंदीपंढरीची काया वाचा मने जिव्हे सर्वस्वे उदार होऊन निस्सीम भक्तिने दरमहा पायी वारी खांद्यावर पताका घेऊन करणारे वारकरी हे सर्वश्रेष्ठ परमपूज्य मानले जातात व तो संप्रदायाचा मुख्य प्रवाह आहे. पायी वारी करणाऱ्या वारकऱ्याबरोबरच दुसरे आदरणीयस्थान फडकऱ्याचे आहे. पिढ्यानपिढ्या दिंडीने पंढरपूर व संतांच्या पवित्र क्षेत्री वारीस जाऊन दशमी ते पौर्णिमा किंवा अमावास्येला काला करून परत येणे ही फडकऱ्याची गेली सातशे वर्षांची पवित्र परंपरा आहे. वारकरी संप्रदायाच्या आचारधर्माची पताका पिढ्यानपिढ्या वहन करणारे दिंडी व फड चालविणारे वारकरी महाराज मंडळी म्हणजेच वैष्णव वारकरी म्हणून संप्रदायात अतिशय पूज्य आहेत. असे असूनही सर्वसामान्य समाजात संप्रदाय प्रचाराला मर्यादा पडत होत्या.

फडकऱ्याचे पद वंश परंपरेने आरक्षित होते.ही मर्यादा मान्य करून ज्या कुटुंबात संप्रदाय परंपरा आहे व ज्या कुटुंबात ती नाही अशाही कुटुंबातील सदाचार, संपन्न, अभ्यासू अन्य लोकांनाही वारकरी होऊन कीर्तनकार, प्रवचनकार, तत्वज्ञानी, विद्वान, धर्मनिष्ठ, आचारबद्ध होण्याची संधी मिळावी . संप्रदायाचा सर्वत्र समाजात, सर्वस्थरावर विस्तार व्हावा. कीर्तन, प्रवचन, भजन परंपरा वाढावी म्हणून स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज यांनी आपल्या शिष्यांच्या आग्रहावरून आपली सर्वसंगपरित्यागी वैराग्याऋत्ती बाजूला ठेऊन, सर्वसामान्यांच्या पारमार्थिक हितासाठी वारकरी शिक्षण संस्थेची श्रीक्षेत्रआळंदी येथे स्थापना केली. आज महाराष्ट्राच्या सर्व भागात परमार्थाची पूर्व परंपरा असलेले व नसलेले अनेक वारकरी संप्रदायात कीर्तनकार, प्रवचनकार, तत्वज्ञानी, विद्वान, भजनगायक, वादक तयार झालेले आहेत. याचे सर्वश्रेय स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांच्या चरणप्रसादास आहे. म्हणून अशा पवित्र चरणास साष्टांग दंडवत.

ह.भ.प.वै. बंकट स्वामी महाराज
१८/२/१९२० ते १२/५/१९४४

स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज यांच्या वैकुंठ गमना नंतर त्यांचे शिष्य ह.भ.प.वै. बंकट स्वामी महाराज हे वारकरी शिक्षण संस्थाच्या अध्यक्षपदी विराजमान झाले. त्यांनी अध्यक्ष म्हणून संस्थेचा कारभार १८ फेब्रुवारी १९२० ते १२ मे १९४४ पर्यंत म्हणजेच २४ वर्ष ३ महिने पाहिला. त्यांचाच दोन तपाच्या (२४ वर्षच्या) काळात वारकरी शिक्षण संस्था घासवाले धर्मशाळेतून संस्थेने विकत घेतलेल्या मालकीच्या जुन्या घरात सुरू झाली. ह.भ.प.वै. बंकट स्वामी महाराज यांनी संस्थेला स्थैर्य मिळावे म्हणून आर्थिक वर्गणी, दान मिळतील तेथे शेतजमिनी व घरे मिळवून संस्थेला स्थैर्य प्राप्त करून दिले. याचबरोबर महाराष्ट्रभर पायपीट करुन वारकरी परंपरेचे भजन कीर्तन, नामसप्ताह सुरु केले. सर्वसामान्य कुटुंबातील खेड्यापाड्यातील मुलांना आळंदी येथे आणून त्यांना वारकरी संस्काराने सुसंस्कृत करून अभ्यासू साधक उत्तम कीर्तनकार, प्रवचनकार, गायकवादक बनविले व आपल्या शिष्यांच्या माध्यमातून दुरावस्था झालेल्या मठ मंदिरांचा जीर्णोद्धार घडवून आणला आणि त्यांचे व्यावस्थापन व्यवस्थित चालावे म्हणून आपल्या योग्य शिष्यांची नेमणूक त्या ठिकाणी केली व महाराष्ट्राच्या परमार्थिक विश्वामध्ये नवचैतन्य निर्माण केले.

ज्या कुटुंबात, गावात किंवा समाजात वारकरी संस्कार नव्हते अशा ठिकाणी अतिशय कष्ट व सायासाने त्यांनी वारकरी सांप्रदाय रुझविला. वर्तमान कीर्तन पद्धती, प्रवचन पद्धती,भजन गायन पद्धती पुनर्स्थापित करण्याचे श्रेय ह.भ.प.वै. बंकट स्वामी महाराज यांनाच आहे. त्यांनी आपली मोठी शिष्य परंपरा महाराष्ट्रात निर्माण केली.आज त्या शिष्य परंपरेने संपूर्ण मराठी विश्व संप्रदायाच्या संस्काराने पुनीत केले आहे. शके 1166 वैशाख कृष्ण 1.इ.स.9मे 1944 या दिवशी सकाळी 8 वाजता सद्गुरु बंकट स्वामी महाराजांनी आपला देह भगवान पांडुरंगाच्या चरणी विलीन केला जगाचा निरोप घेतला . अशा ह.भ.प.वै. बंकट स्वामी महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम.* सद्गुरु स्वामी महाराजांना 77 वर्षे पूर्ण होत आहेत आजही तीच भक्ति नी परंपरा आळंदी पंढरी आणि नेकनूर मध्ये अव्यहत पणे सुरू आहे.
स्वामी नंतर वै.गुरुवर्य सुदामदेव महाराज त्या नंतर वै.गुरुवर्य रामहरी महाराज आणि आज श्री ह भ प महंत गुरूवर्य लक्ष्मण महाराज मेंगडे ही परंपरा चालवत आहेत सद्गुरु बंकट स्वामी महाराज यांच्या विचार वारसा आणि भक्ती परंपरा जोपासण्याचे बळ आणि प्रेरणा द्यावी ही ईश्वरचरणी प्रार्थना .
धरती ज्या हाती संत कृपावंत
पाळी पंढरी नाथा लळा त्यांचा !!
शेवटी संताचा सेवक होण्याचे भाग्य मला लाभले ! त्यांच्या चरणांवर नत मस्तक होवून त्यांच्या कार्यकर्तृत्वाला सादर शत श् : प्रणाम करून थांबतो. मज दास करी त्यांचा!
संत दासाच्या दासा चा !! तु.म !!
भागवताचार्य दिनेशानंद महाराज शास्त्री
श्रीगुरू बंकटस्वामी महाराज संस्थान निनगुर (नेकनूर) ता.जि.बीड
मो=9767009870/7391970333
आज बंकट स्वामी महाराज यांच्या पुण्यतथीनिमित्त लेख आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा