परदेशी जाणार्‍या विद्यार्थ्यांचे होणार लसीकरण
लातूर : उच्च शिक्षणासाठी भारतातून परदेशी जाणार्‍या विद्यार्थ्यांना लसीकरण अनिवार्य करण्यात आले आहे. अशा विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी मनपाच्या वतीने तात्काळ लसीकरण केंद्र कार्यान्वित करण्याच्या सूचना महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी प्रशासनास केल्या आहेत. त्यानुसार विशेष बाब म्हणून 10, 11 आणि 12 जून रोजी दयानंद महाविद्यालय येथे लसीकरण केले जाणार आहे. शिक्षणासाठी परदेशात जाणे हे विद्यार्थ्यांचे स्वप्न असते. नामवंत विद्यापीठात शिक्षण घेणे हा त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असतो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परदेशात जाणार्या विद्यार्थ्यांना लसीकरण करून घेणे अनिवार्य करण्यात आले आहे.

लातूर शहरातून अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी परदेशात जात असतात. शहरातील विद्यार्थ्यांचे लस न घेतल्यामुळे नुकसान होऊ नये या भूमिकेतून महानगरपालिकेने लसीकरण मोहीम राबविण्याचा निर्धार निर्णय घेतला आहे. अमेरिका, युरोप व अन्य काही देशात कोव्हिशिल्ड ही लस मान्यताप्राप्त आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांना तीच लस दिली जाणार आहे. पदवीपूर्व, पदव्युत्तर तसेच पीएचडी करण्यासाठी विदेशात जाणार्‍या विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे. महानगरपालिकेच्या वतीने गुरुवारी विशेष बाब म्हणून दयानंद महाविद्यालयात लसीकरण केले जाणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना विदेशात जावयाचे आहे अशांनी आधार कार्ड,पासपोर्ट, विदेशातील संबंधित विद्यापीठाकडून आलेले अनकंडिशनल ऑफर लेटर, व्हिसा प्रमाणपत्र अथवा त्यासाठी अर्ज केलेली कागदपत्रे तसेच आय 20 / डीएस 160 हा अर्ज लसीकरणासाठी सादर करणे
आवश्यक आहे. ज्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी विदेशात जावयाचे आहे अशा विद्यार्थ्यांनी ही कागदपत्रे सादर करून लसीकरण करून घ्यावे,असे आवाहन महापौर विक्रांत गोजमगुंडे व उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांनी केले आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा