पत्रकार ज्ञानेश्‍वर पाबळे यांच्यावर हल्ला करणार्‍या वाळू माफियांना त्वरीत अटक करावी – एस.एम.देशमुख यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
जालना जिल्ह्यातील जाफराबादची ही घटना म्हणजे आपण बिहारचे की महाराष्ट्रातील ?
पत्रकार ज्ञानेश्‍वर पाबळे यांच्यावर हल्ला करणार्‍या वाळू माफियांना त्वरीत अटक करावी – एस.एम.देशमुख यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

बीड । धुळे- एखाद्या चित्रपटात शोभून दिसेल अशी घटना काल जालना जिल्ह्यातील जाफराबाद येथे घडली असून 15 ते 20 वाळू माफियांनी ज्ञानेश्‍वर पाबळे या पत्रकारावर लाठ्याकाठ्यांनी हल्ला करून जबर जखमी केले. या घटनेचा व्हीडीओ पाहिल्यावर आपण महाराष्ट्रात आहोत की बिहारमध्ये असा प्रश्‍न उपस्थित होत असून अवैध वाळू उपसा करणार्‍या वाळू माफियांवर त्वरीत कारवाई करावी व या घटनेची चौकशी करावी, हल्लेखोरांना त्वरीत अटक करावी अशी मागणी महाराष्ट्र पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे प्रमुख एस. एम. देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या निवेदनात केली आहे.
मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात एस.एम. देशमुख यांनी म्हटले आहे की, वाळू माफियांचा धुडगूस थांबावा यासाठी एक पत्रकार हिमतीने उभा राहतो, बेडरपणे त्यांच्या विरोधात बातम्या देतो, त्यातून वाळू माफियांचे हितसंबंध दुखावतात, मग ते एकत्र येतात आणि 18 ते 20 जणांची ही टोळी सकाळी-सकाळी पत्रकाराच्या कार्यालयावर हल्ला करते, त्यात पत्रकाराच्या डोक्याला जबर मार बसतो, तो मरता मरता वाचतो. एखाद्या चित्रपटात शोभून दिसेल अशी ही घटना घडली आहे जालना जिल्ह्यातील जाफराबाद येथील. या घटनेचे जे व्हीडीओ समोर आले आहेत ते आपण महाराष्ट्रात आहोत की बिहारमध्ये असा प्रश्‍न उपस्थित करणारे आहेत.
ज्ञानेश्‍वर पाबळे असं पत्रकाराचं नाव आहे. ते दैनिक ‘पुढारी’चं काम करतात. ‘पुढारी’मधून त्यांनी सातत्यानं वाळू माफियांच्या विरोधात बातम्या दिल्या आहेत. त्याचा राग मनात धरून अवैध वाळू उपसा करणार्‍या वाळू माफियांनी हातात लाठ्या, काठ्या घेऊन पत्रकारावर हल्ला चढविला. या हल्ल्यात ज्ञानेश्‍वर पाबळे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना औरंगाबाद येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जाफराबाद येथील सर्व पत्रकारांनी एकत्र येत तहसिलदारांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलं आहे.
वाळू माफियांच्या गुंडगिरीचा निषेध करीत महाराष्ट्र पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे प्रमुख एस.एम. देशमुख यांनी आपले निवेदनात पुढे म्हटले आहे की, मराठवाड्यात गावागावात वाळू माफियांनी धुडगूस घातला असून नद्यांचा मोठ्या प्रमाणात उपसा सुरू आहे. तालुका प्रशासन आणि जिल्हा प्रशासन वाळू माफियांना पाठीशी घालत असल्याने वाळू माफियांची दहशत मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पत्रकारांनी त्याविरोधात आवाज उठविला तर त्यांच्यावर सामुहिक हल्ले केले जात आहेत. असे निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा