राज्य शासन पाठीशी असून जिल्हा प्रशासनाने कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणावी- उपमुख्यमंत्री अजित पवार




तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून तिचा सामना करण्यासाठी सर्व तयारी करा – आरोग्यमंत्री राजेश टोपे

बीड जिल्हा कोविड-19 व खरीप हंगामाचा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी घेतला आढावा; आरोग्यमंत्री राजेश टोपे, पालकमंत्री धनंजय मुंडे उपस्थित 

बीड । (दि. १८ )- राज्यात कोरोनाची दुसऱ्या लाट नियंत्रणात येत असतानाच मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील कोरोना रुग्ण वाढीचे प्रमाण काहीसे चिंताजनक दिसून आल्याने या जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी तातडीचा दौरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. कोरोना संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी राज्यशासन संपूर्ण ताकदीनिशी जिल्ह्याच्या पाठीशी असून जिल्हा प्रशासनाने आरोग्यासह सर्व यंत्रणांच्या सहाय्याने परिस्थिती नियंत्रणात आणावी, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

बीड जिल्हा आरोग्य विभागाने दोन्ही लाटेत युध्दास्तरावर काम केले, जिल्ह्याचा कॉन्टॅक्ट ट्रेसिंग रेट आजही विभागात अव्वल आहे; जिल्हा प्रशासनाने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका ओळखून त्या दृष्टीने तयारी करावी, असे प्रतिपादन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली बीड जिल्ह्यातील covid-19 विषाणू प्रादुर्भाव आढावा आणि जिल्हास्तरीय खरीप हंगाम आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, या बैठकीसाठी राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री राजेश टोपे, राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांसह जिल्ह्यातील प्रमुख लोकप्रतिनिधी व सर्व संबंधित विभागाचे अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती शिवकन्या शिरसाट, आ. प्रकाश दादा सोळंके, आ. संदीप क्षीरसागर, आ. बाळासाहेब आजबे यासह विधान परिषदेचे आ.सुरेश धस आ.सतीश चव्हाण, आ. विक्रम काळे, आ.संजय, दौंड जिल्हा परिषद उपाध्यक्ष बजरंग सोनवणे, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी रवींद्र जगताप, मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, जिल्हा पोलीस अधीक्षक आर राजा, कृषी विभागाचे विभागीय उपायुक्त अविनाश पाठक, आरोग्य उपसंचालक डॉ एकनाथ माले आदी उपस्थित होते.

यावेळी बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री श्री पवार म्हणाले कोरोना च्या दुसऱ्या लाटे नंतर मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत बीड मध्ये कोरोना बाधित रुग्णांचे आढळण्याचे प्रमाण जास्त आहे. कोरोना नियंत्रणासाठी राज्यशासन अनेक उपाय योजना करीत आहे. या प्रयत्नांना यश आले असून, औषधे आरोग्य सुविधा वाढविताना लसीकरण गतीने होण्याच्या दृष्टीने देखील सूचना दिलेल्या आहेत.

संपूर्ण राज्यासाठी तीन हजार मेट्रिक टन ऑक्सिजन साठा असावा यादृष्टीने उपाययोजना करताना शासनाने यासाठी सवलती दिल्या आहेत. मोठ्या खाजगी रुग्णालयांनी आपली ऑक्सिजनची यंत्रणा सुसज्ज करावी अशा सूचना दिलेल्या आहेत. कोरोना च्या दुसऱ्या लाटेमध्ये ऑक्सिजन अभावी रुग्णांचा झालेला मृत्यू ही दुर्दैवी बाब आहे, अशा घटना पुन्हा घडू नये यासाठी राज्य शासनाने तातडीने पावले उचलली असून जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात 14 केएल क्षमतेचा एक लिक्विड ऑक्सिजन टॅंक उपलब्ध करून लिक्विड ऑक्सिजन साठा सुरक्षित करावा तसेच यामुळे रिकामे झालेले सिलेंडर हे ग्रामीण भागात वापरावेत, असे मत ना. टोपे यांनी व्यक्त केले.

सचिवांना थेट दूरध्वनीवरून सूचना

ऍम्ब्युलन्स मागणीचा प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी तसेच म्यूकर मायक्रोसिस आजार वरील यंत्रणा उपलब्ध करून घेण्यातील अडचणी सोडविण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याचे आरोग्य आयुक्त श्री रामस्वामी यांच्याशी थेट दूरध्वनीवरून चर्चा करून सूचना दिल्या. यावेळी रुग्णवाहिका खरेदीसाठी तांत्रिक मान्यता अधिकार जिल्हा स्तरावर देण्याचा निर्णय आजच्या आज आरोग्य विभागाने करावा, असे निर्देश ना. पवार यांनी दिले.

माजलगाव येथे उपजिल्हा रुग्णालय मंजूर करण्यात यावे यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे शिफारस केली आहे असे उपमुख्यमंत्री श्री पवार म्हणाले.

जिल्ह्यातील पीक कर्ज वाटप साठी बँकांना 15 जुलै ही अंतिम मुदत

खरीप हंगामाच्या दृष्टीने यावेळी त्यांनी आढावा घेतला. बीड जिल्ह्यातील पिक विमा पॅटर्न ची शिफारस प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे करण्यात आली असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी सोयाबीन, कापूस ,तुर आदी बियाणांच्या उपलब्धतेबाबत माहिती त्यांनी घेतली. महाबीज कडून उपलब्ध होणारे बियाणे मर्यादित आहे, परंतु राज्य शासन इतर कंपन्यांचे बियाणे उपलब्ध व्हावेत यासाठी उपाय करीत आहे. खतांचे पुरेशी उपलब्धता करण्यात आली असून पिक कर्ज वाटपासाठी बँकांना 15 जुलै ही अंतिम मुदत देण्यात येत आहे असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेने पीक कर्ज वाटपाचा टक्का यावर्षी वाढवला असल्याबाबत ना. पवार यासह सर्वांनीच समाधान व्यक्त केले, तसेच इतर सर्व बँकांनी 15 जुलैच्या आत कर्ज वाटप करण्याचे ठरवून दिलेले उद्दिष्ट पूर्ण करावे व जिल्हाधिकारी यांनी दर आठवड्याला त्याचा आढावा घ्यावा अशा सूचना ना. पवार यांनी दिल्या.

याप्रसंगी त्यांनी विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था (सोसायटी) चे अनिष्ट तफावत बाबत प्रमाण, पिक विमा भरपाई, खते व बियाणे बाबतच्या अडचणी यांची माहिती घेतली.

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या संकटाचा सामना करण्यासाठी जिल्ह्यातील यंत्रणा सज्ज – पालकमंत्री धनंजय मुंडे

पालक मंत्री धनंजय मुंडे म्हणाले की कोरोना संसर्गाच्या महामारी मध्ये उद्भवलेल्या अभूतपूर्व संकटात उपमुख्यमंत्री श्री पवार आणि आरोग्य मंत्री श्री राजेश टोपे यांची बीड जिल्ह्याला फार मोठी मदत झाली आहे. त्यांचे जिल्ह्यातील सर्व जनतेच्या वतीने पालकमंत्री म्हणून मी आभार मानत आहे, कोविड संकटा बरोबरच जिल्ह्यातील ऊस तोड मजूर त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासनाने संत भगवानबाबा वसतिगृह योजनेला मंजुरी दिली आहे. उपमुख्यमंत्री श्री पवार यांच्या पुढाकारामुळे वीस निवासी वसतिगृह मंजूर झाली आहेत. ऊसतोड कामगारांच्या कल्याणासाठी गाळप होणाऱ्या उसा मागे प्रतिटन दहा रुपये निधी आकारला जाऊन तो महामंडळास दिला जाईल.

पालकमंत्री पुढे म्हणाले, खरीप हंगामातील पीक कर्ज वाटप व्यवस्थित होण्यासाठी अर्थमंत्री या नात्याने अजितदादांनी बँकांना आपले स्तरावरून आदेश द्यावेत. जुन्या व नवीन अशा पात्र असलेल्या प्रत्येक शेतकऱ्यांला पीक कर्ज मिळावे, याचे योग्य नियोजन व्हावे, असेही ना. मुंडे म्हणाले.

कोरोना संसर्गाची तिसरी लाट येणार आहे, या स्थितीसाठी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा व प्रशासन सुसज्ज करण्यात आले असून जर दुर्दैवाने तिसरी लाट आलीच तर या लाटेच्या संकटात देखील चांगले काम करून यशस्वी मुकाबला करू असे प्रतिपादन पालक मंत्री धनंजय मुंडे यांनी याप्रसंगी केले.

बीड जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी रेट नियंत्रणात आणण्यासाठी शास्त्रीय पद्धतीचा वापर व्हावा- आरोग्यमंत्री राजेश टोपे

आरोग्यमंत्री श्री टोपे म्हणाले, बीड जिल्ह्यातील मृत्युदर देखील चिंताजनक असून हॉस्पिटलमध्ये आणल्यानंतर बहात्तर तासाच्या आत मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक आहे . यामध्ये आजार अंगावर काढण्याची प्रवृत्ती दिसत आहे. कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणांनी तपासणी वाढविल्या पाहिजेत. तसेच तपासण्या करताना शास्त्रीय दृष्ट्या अधिकृत ठरविण्यात आलेले कॉन्टॅक्ट ट्रेसिंग ची पद्धत वापरली पाहिजे. यामुळे रुग्णांचे सहवासित, हाय-रिस्क, लो-रीस्क बाधित सापडण्यास मदत होईल आणि जिल्ह्याच्या पॉझिटिव्हिटी रेट बरोबरच मृत्यु दर नियंत्रणात आणण्यास उपयोग होईल यावर काटेकोरपणे अंमलबजावणी केली जावी.

त्याचबरोबर आजार अंगावर न काढता तपासणी व रुग्णालयात ऍडमिट होणेसाठी जिल्हा परिषद सर्कल स्तरावर नियोजन करून व्यापक जनजागृती करावी.

ते पुढे म्हणाले कोरोना रुग्णांचे बील अदायगीच्या व नियंत्रणाचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रत्येक खाजगी कोविड रुग्णालयात शासनाच्या वतीने ऑडिटरची नेमणूक केली आहे. येत्या एक ते दीड महिन्यात आरोग्य कर्मचाऱ्यांच्या भरतीचा प्रश्न मार्गी लावण्यात येईल यादृष्टीने हायकोर्टात देखील शासनाने सादर केले आहे.

काळी बुरशी च्या आजारासाठी राज्य शासनाने औषधे आणि इंजेक्शन्स मोठ्या प्रमाणात खरेदी करून उपलब्ध केली आहेत त्यामुळे कोणत्याही रुग्णास जास्त रक्कम देऊन उपचार घेण्याची गरज भासणार नाही. तसेच यासाठी तातडीची साडेसहा हजार कोटी रुपये तरतूद केली असून आवश्यक औषधे केंद्र सरकार करून खरेदी करण्याची राज्याची तयारी आहे. असे आरोग्यमंत्री डॉ राजेश टोपे म्हणाले.

विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी यावेळी प्रशासनाने कोरोना तिसऱ्या लाटेसाठी केलेल्या पूर्वतयारीबाबत सांगितले. बालकांना उपचाराच्या दृष्टीने बालरोग तज्ज्ञ आणि वैद्यकीय अधिकारी यांचे सेवा तालुकास्तरावर देखील उपलब्ध व्हाव्यात यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत .कोरोना रुग्णांच्या बिलांचे ऑडिटसाठी आणि आणि लसीकरण वेगात व्हावे देखील कार्यवाही केली जात असल्याचे विभागीय आयुक्त श्री. केंद्रेकर म्हणाले.

जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी कोरोना परिस्थितीबाबत सविस्तर आढावा सादर केला. बीड जिल्ह्यात प्रत्येक दहा लाख लोकसंख्येमागे एकूण २ लाख 18 हजार 558 तपासणी केली जात आहे. राज्याचा पॉझिटिव्हिटी रेट 16.43 टक्के असून बीड जिल्ह्याचा 15. 29 टक्के आहे.
तर मृत्यूदर राज्याचा 19.40 टक्के व बीड जिल्ह्याचा 26.50 टक्के आहे. जिल्ह्यातील लसीकरण शासनाच्या सुचनांनुसार दिव्यांग ज्येष्ठ नागरिक यासह सर्वांसाठी सुरू आहे.

लोकसंख्येच्या प्रमाणात जिल्ह्यास लसी उपलब्ध होतील असे नियोजन केले असल्याचे यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलताना म्हणाले.

यावेळी आमदार संदीप क्षीरसागर यांनी कोरोना काळात भरती करण्यात आलेल्या तात्पुरत्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या बाबतचा आणि ऑक्सिजन उपलब्धते बाबत प्रश्न मांडला.

आमदार श्री सोळंके यांनी मृत्यु दर वाढण्याची कारणे तपासली जावीत आणि त्यावर उपाय योजना केल्या जाव्यात असे मत व्यक्त केले.

आमदार श्री. आजबे यांनी शिरूर येथे ऑक्सीजन बेड असलेल्या रुग्ण याची व्यवस्था होणे गरजेचे आहे याची मागणी मांडली, आ. धस यांनी जिल्ह्यासाठी लसीकरणाचा वेग वाढणे ची गरज व्यक्त करताना लसींचा साठा इतर जिल्ह्यांच्या तुलनेत उपलब्ध करून द्यावा अशी मागणी मांडली याप्रसंगी आमदार सतीश चव्हाण, आ. संजय दौंड, आ. वसंत काळे यांनी देखील आपले मनोगत मांडले.

काळी बुरशी (म्यूकर मायक्रोसिस )या आजारावरील उपचारांसाठी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्हा नियोजन समितीतून 88 लक्ष रुपये तरतूद केली असून यातून काळी बुरशी वरील शस्त्रक्रियासाठी लागणारे मायक्रो -डी-ब्राईडर यंत्रणा खरेदी करण्यात येत आहे, असे अधिष्ठाता डॉ सुक्रे यांनी सांगितले. उपचारावरील सायनस एंडोस्कोपी मध्ये या यंत्रणेची विशेष गरज असून याची खरेदी परदेशातील उत्पादकता द्वारे करून ते आयात करण्यासाठी परवानगी देण्याबाबत उपमुख्यमंत्री श्री पवार यांनी मंत्रालयीन अधिकार्‍यांना दूरध्वनी वरून थेट सूचना केल्या.

बैठकीसाठी जिल्हा परिषदेचे सभापती जयसिंह सोळंके, सदस्य विजयसिंह पंडित, तसेच अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुरेश साबळे, स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.शिवाजी सुक्रे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय मुळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ आर बी पवार , माजी आ. सय्यद सलीम, पृथ्वीराज साठे, सुनील धांडे ,श्रीमती उषाताई दराडे यासह बँक ,सहकार, विभाग, कृषी ,आरोग्य ,महसूल ,जिल्हा परिषद आदी प्रमुख विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा