अतिहव्यासाचा ‘डर्टी पिक्चर’




अभिनेत्री शिल्पा शेट्टीने लग्न केले तेव्हा तिचा पती राज कुंद्रा हा एक उद्योगपती आहे एवढेच सर्वांना माहीत होते; पण तिच्या पतीचे उद्योग नेमके कोणते आहेत हे हळूहळू बाहेर येऊ लागले. यातील बहुतांश उद्योग म्हणजे झटपट श्रीमंतीसाठी केलेले ‘उलटे उद्योग’ असल्याचे समोर आले. दरवेळी कायद्यातील पळवाटा शोधून सुटणारा हा उद्योगपती आता पुन्हा चर्चेत आला आहे. अश्‍लील चित्रपटांमधून पैसा कमावण्याचा त्याचा नवा ‘उद्योग’ या निमित्तानं पुढे आला आहे. वयाच्या अठराव्या वर्षी शिक्षण सोडणारा हा माणूस पाहता-पाहता चार हजार कोटींचा मालक झाला. मोबाइल आणि त्यातील विविध अ‍ॅप हेच अनेक लोकांचे आयुष्य झाले आहे आणि अश्‍लील चित्रफिती पुरविणारे अ‍ॅप भरपूर पैसा मिळवून देईल, या खात्रीने सक्रिय असलेल्या रॅकेटमध्ये कुंद्राचा समावेश असल्याचा दावा करून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तत्पूर्वी त्याची रीतसर चौकशीही झाली. त्याच्याविरुद्ध फेब्रुवारीतच तक्रार करण्यात आली होती. त्यास पुष्टी देणारे पुरावे सापडल्यानंतर त्याला अटक केल्याचे सांगितले जाते. या रॅकेटमधल्या एकूण 11 जणांना अटक झाली आहे.
राज कुंद्रावर झालेला हा पहिलाच आरोप नाही. ‘उलटे उद्योग’ केल्याप्रकरणी अनेकदा त्याच्यावर आरोप झाले आहेत आणि कोर्टात हेलपाटेही मारावे लागले आहेत. गेल्या वर्षी मार्चमध्ये झालेल्या एका तक्रारीनुसार मढ येथील ग्रीन पार्क बंगल्यावर पोलिसांनी छापा टाकला होता. तिथे अश्‍लील चित्रपटांचे चित्रीकरण केले जाते, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावेळी पाच जणांना अटक करून एका मुलीची सुटका करण्यात आली होती. अभिनयाच्या क्षेत्रात ‘स्ट्रगल’ करणार्‍या दोन अभिनेत्री आणि दोन अभिनेत्यांचा अटक झालेल्यांत समावेश होता. याच प्रकरणात आता राज कुंद्रा याला अटक झाली आहे.
ऑक्टोबर 2019 मध्ये याच राज कुंद्राला अंडरवर्ल्डमधील इकबाल मिर्चीशी संबंध असल्याप्रकरणी समन्स बजावण्यात आले होते. मिर्चीबरोबर कुंद्राने करार केल्याचा संशय सक्तवसुली संचालनालयाला (ईडी) होता. बिटकॉइन घोटाळ्यातही ईडीने 2018 मध्ये राजला समन्स बजावले होते. हे प्रकरण मनी लाँड्रिंगशी संबंधित असून, मुख्य आरोपी अटकेत आहे. ‘गेट बिटकॉइन्स डॉट कॉम’ नावाची वेबसाइट स्थापन करण्यात आली होती आणि त्या वेबसाइटमुळे सुमारे 8 हजार लोकांचे दोन हजार कोटी रुपये बुडाले, अशी माहिती आहे. अशा अनेक प्रकरणांशी राज कुंद्राचा संबंध आला होता; परंतु त्याला अटक झाली नव्हती. त्यामुळे तो उघडपणे आणि उजळपणे वावरत होता. आता त्याला अटक झालेली असल्यामुळे आतापर्यंत त्याच्यावर करण्यात आलेले आरोप अगदीच निराधार नसणार, हे स्पष्ट होत आहे.
आयपीएलमध्ये मोठ्या प्रमाणावर सट्टेबाजी होत होती आणि त्यावेळीही राज कुंद्राचे नाव घेण्यात आले होते. आयपीएलच्या ‘राजस्थान रॉयल्स’ या संघाचा राज कुंद्रा हा सहमालक होता; परंतु या प्रकरणानंतर राज कुंद्रावर दोन वर्षांची बंदी घातली गेली. आपण सट्टेबाजी केल्याचे त्याने कबूल केल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने त्याची हकालपट्टी केली होती. याखेरीज पोकर लीगची स्थापना करून मॅच फिक्सिंग केल्याचा आणि ऑनलाइन शॉपिंगद्वारे फसवणूक केल्याच्या प्रकरणांतही त्याचे नाव घेतले गेले. एकंदरीत राज कुंद्राचे नाव नेहमी ‘दोन नंबर’च्या उद्योगांतच घेतले गेलेले दिसते. एखाद्या वेळी तपास यंत्रणेकडून नाव घेतले जाणे आणि इतक्या प्रकरणांमध्ये नाव घेतले जाणे यात निश्‍चितच फरक आहे. एवढ्या प्रकरणांमध्ये योगायोगाने एखाद्याचे नाव घेतले जाऊ शकत नाही. शिवाय, त्याच्याविषयी प्रचलित असणार्‍या आणखीही सुरस कहाण्या आहेत. दुबईच्या बुर्ज खलिफा इमारतीत त्याने शिल्पा शेट्टीला 50 कोटींचा फ्लॅट घेऊन दिल्याची हकीकत सर्वत्र चर्चेत होतीच. असे चोचले ‘ईझी मनी’च्या मागे लागल्याखेरीज पूर्ण करण्याइतका राज कुंद्राचा एकही ‘सरळ’ उद्योग चर्चेत नाही.
राज कुंद्राचे खरे नाव रिपुदमन कुंद्रा असे आहे. कामधंदा शोधण्यासाठी पंजाबातील बठिंडा येथून ब्रिटनमध्ये गेलेल्या सामान्य कुटुंबात त्याचा जन्म झाला. आज त्याचे नाव डझनभर कंपन्यांशी जोडले गेले आहे. या सर्व कंपन्यांचा व्यवसाय प्रामाणिकपणे चालतो, असे गृहित धरले तर प्रश्‍न असा निर्माण होतो की, अशा उद्योजकाला नियमबाह्य मानले गेलेले वेगवेगळे उद्योग का करावे लागतात? विशेषतः अश्‍लील चित्रपटांच्या अ‍ॅपच्या व्यवसायाशी अशा उद्योजकाचे नाव कसे जोडले जाते? पैशांची भूक एवढी जबरदस्त असते? पैशांसाठी भुकेल्या व्यक्तीला पैशांच्या ताकदीने अशी प्रकरणे दडपली जातील अशी शाश्‍वती वाटत असते. आपण काहीही खरेदी करू शकतो, अशी या व्यक्तींची भावना बनते. अश्‍लील चित्रपट तयार करून त्यांची विक्री करताना असेच काहीसे विचार राज कुंद्राच्या मनात असावेत. त्याचे बालपण तर गरिबीतच व्यतीत झाले. अठराव्या वर्षी शिक्षण सोडून छोटे-मोठे व्यवसाय करणे त्याला भाग पडले. थोडाफार पैसा मिळाल्यानंतर तो दुप्पट-चौपट करण्यासाठी त्याने दुबईला जाऊन हिर्‍यांचा व्यवसाय करून पाहिला; परंतु त्यात त्याला यश आले नाही. त्यानंतर नेपाळला जाऊन पश्मीना शाली खरेदी केल्या आणि लंडनमधील ब्रँडेड स्टोअर्सच्या माध्यमातून त्या विकण्याचा व्यवसाय केला. तिथूनच त्याचे नशीब उजळायला सुरुवात झाली. ब्रिटनच्या बड्या फॅशन हाउसेसना तो या शाली पुरवू लागला. त्याची व्यवसायातील वाटचाल सर्वांनाच थक्क करणारी होती.
2004 मध्ये सक्सेस नियतकालिकाने राज कुंद्राला 198 व्या क्रमांकाचा सर्वांत श्रीमंत ब्रिटिश आशियाई घोषित केले. आज ट्रेडिंग, कन्स्ट्रक्शन, रिअल इस्टेट, ऊर्जा, स्टील, शेअर ट्रेडिंग, माध्यमे, क्रीडा, सोने खरेदी-विक्री अशा असंख्य व्यवसायांत राज कुंद्राचा सहभाग आहे. लहानपण दारिद्य्रात व्यतीत करणार्‍या राज कुंद्राकडे आज बहुतांश
महागड्या गाड्या आहेत. पैसा मिळविल्यानंतर प्रसिद्धी मिळविण्याची इच्छा त्याच्यात जागृत झाली आणि शिल्पा शेट्टीशी लग्न केल्यावर ती पूर्ण झाली. तत्पूर्वी चित्रपट उद्योगातील कोणी त्याला ओळखतसुद्धा नव्हते. राज कुंद्रा आणि शिल्पा यांनी बॉलिवूडमध्येही अनेक चित्रपटांत पैसा गुंतवला. राज कुंद्रा स्वतःला स्वयंप्रेरित उद्योजक, गुंतवणूकदार, ग्रोथ एक्सपर्ट, इंटरनॅशनल डील मेकर आणि पब्लिक स्पीकर म्हणवून घेतो. एका बिझनेस नियतकालिकाच्या म्हणण्यानुसार जुहू बीचवरील त्याचा फ्लॅट 34 कोटींचा आहे. अशी प्रचंड संपत्ती हाती असूनसुद्धा राज कुंद्रा आज अटकेत का आहे? अश्‍लील  चित्रपटांची निर्मिती आणि विक्रीच्या धंद्याशी त्याचे नाव कसे जोडले गेले? असे प्रश्‍न पडणे स्वाभाविकच आहे. परंतु पैशांची चटक लागल्यानंतर तो मिळविण्यासाठीचा मार्ग पाहिला जात नाही, असे राज कुंद्राचे आधीचे काही कारनामे पाहून म्हणावेसे वाटते. स्वतःला उद्योजक मानणारा, आयपीएलच्या एका क्रिकेट टीमचा मालक असलेला माणूस सट्टेबाजीच्या प्रकरणात का अडकावा? त्याच्यावर क्रिकेट विश्‍वापासून दूर जाण्याची वेळ का यावी? अधिकाधिक पैसा मिळविण्याची नशाच राज कुंद्रासारख्या मंडळींना अशा आडमार्गाने नेत असेल.
राज कुंद्राचे नाव ‘हॉट शॉट्स’ नावाच्या अश्‍लील अ‍ॅपशी जोडले गेले आहे. ‘अ‍ॅप बेस्ड पॉर्नोग्राफी’ आंबटशौकिनांपर्यंत पोहोचविण्यासाठी या अ‍ॅपची निर्मिती करण्यात आली होती. ओटीटी प्लॅटफॉर्मच्या श्रेणीतच हे अ‍ॅप होते. लहान चित्रफिती आणि चित्रपट अ‍ॅपवर अपलोड केले जात असत. या चित्रफितींमध्ये अश्‍लीलता होती. ‘हॉट शॉट्स’ अ‍ॅपवर दाखविला जाणारा बहुतांश कंटेन्ट निःशुल्क होता. अर्थात हे अ‍ॅप पूर्णपणे फ्री नव्हते. विशिष्ट कंटेन्टसाठी पैशांची मागणी केली जात असे. फ्री कंटेन्टबरोबर यूजर्सना अनेक पॉपअप अ‍ॅड्स पाहावयास मिळत असत. या अ‍ॅपमधील व्हिडिओज्ची अनेक श्रेणींमध्ये विभागणी केली गेली होती. यात यूजर्सना व्हिडिओबरोबरच
मॉडेल्सची विवस्त्र छायाचित्रे उपलब्ध करून दिली जात असत. अ‍ॅप डिस्क्रिप्शननुसार यूजरला हॉट एचडी व्हिडिओ आणि शॉर्ट मूव्ही वेगवेगळ्या डिव्हाइसवर स्ट्रीम करण्याचा पर्याय दिला जात असे. यात लाइव्ह शो हेही एक फीचर होते. मॉडेल्सबरोबर याद्वारे चॅट करता येत असे. फ्री व्हर्जनमध्ये अनेक गॅलरीज, व्हिडिओज आणि इव्हेन्ट्स लॉक करण्यात आले होते. ते अनलॉक करण्यासाठी सबस्क्रिप्शन मागितली जात असे. अशा ‘डर्टी पिक्चर’ अ‍ॅपशी राज कुंद्राचे नाव जोडले गेले असून, श्रीमंती ‘सबकुछ’ नसते, हे त्याला अटकेनंतर तरी समजले असेल.
संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा