माझे दैवत…!




माझे दैवत…!

अत्यंत सामान्य कुटुंबातून, पांगरी सारख्या छोट्याशा गावातून आलेल्या या साध्या वाल्मिकला साहेब तुमच्यामुळे आज खरी ओळख मिळाली. तुमचा एक कार्यकर्ता म्हणून मी सदैव प्रामाणिक, एकनिष्ठ व कोणत्याही परिस्थितीत तुमच्या सोबत आहे, तुम्हीच माझे सर्वस्व आणि तुम्हीच माझे दैवत!

एकेकाळी दोन वेळचे पोट भरायची भ्रांत असलेला हा वाल्मिक कराड आज धनंजय मुंडे साहेबांच्या नेतृत्वात एकनिष्ठेने साहेबांसाठी लोकसेवेचे काम अविरत करतो आहे. पांगरी सारख्या छोट्याशा गावातून परळीत आलो, तेव्हा स्व. गोपीनाथराव मुंडे साहेबांनी व स्व. पंडित अण्णा मुंडे यांनी मला आसरा व आधार दिला, मला उभं केलं. पुढच्या पिढीत धनंजय मुंडे साहेबांनी मला त्यांच्या नेतृत्वात परळी करांची सेवा करण्याची संधी दिली. साहेबानी माझ्यावर जो विश्वास दाखवला, तो विश्वास आजही जपण्याचा मी प्रयत्न करतो आहे. लोकसेवेचे व्रत घेतलेले आमचे साहेब परळी मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्याचा ध्यास घेऊन दिवसरात्र काम करतात. त्यांचे काम, त्यांच्या स्वभावातील माणुसकी व लोकांप्रति आपुलकी पाहून माझ्या सारख्या कार्यकर्त्याला निश्चितच बळ मिळते.

साहेब मंत्री झाल्यानंतर अचानक कोरोना संसर्ग वाढला आणि जग ठप्प पडले, अशा परिस्थितीत लोकांना आधार देण्यासाठी आपले प्राण तळ हातावर घेऊन सामान्य माणसाची मदत करायला उतरलेले साहेब, मी माझ्या डोळ्याने पाहिले आहेत.

या काळात साहेबांच्या माध्यमातून आम्ही हजारो कुटुंबांना मदत केली, आजही करतो आहोत. बऱ्याच जणांना मी देताना, मी करताना दिसत असेल पण प्रत्यक्षात मी कुठेच नाही; जे काही करतो ते साहेबांचेच आहे. कोणालाही कोणत्याही प्रकारची मदत करतो म्हणजे हा वाल्मिक फक्त माध्यम आहे, प्रत्यक्षात हे सगळं साहेबांचंच आहे. साहेब आहेत म्हणून मी हे सगळं करू शकतो.

कोविडच्या अखेरच्या टप्प्यात आपण आपल्या जवळच्या अनेकांना गमावले, पण अनेकांचे प्राण वाचवण्यासाठी साहेबांनी दिलेली मदत उपयोगी पडली, हे सांगायला निश्चितच आनंद व अभिमान वाटतो. देव जाणे कुठून कुठून व कशी कशी आम्ही हजारो रेमडिसिव्हीर लोकांना मोफत वाटली, ती कुठून व कशी उपलब्ध झाली हे साहेबांनाच माहीत, मात्र अनेक गोरगरीब जनतेचे प्राण वाचविण्यात साहेबांच्या वतीने मी माध्यम झालो, याचा मला आनंद व अभिमान आहे.

खरंतर साहेबांच्या बाबतीत लिहायचं म्हणजे एक ग्रंथ तयार होईल, मात्र मी लिहिण्या-बोलण्यापेक्षा काम करण्यावर अधिक विश्वास ठेवणारा माणूस आहे व माझे नेते ‘नेकीं कर दरिया मे डाल’ या स्वभावाचे आहेत.

2019 सालच्या विधानसभा निवडणुकीत साहेबांचा जोरदार विजय झाला तिथे आम्ही साहेबांच्या वाट्याला आलेल्या संघर्षाचा एक टप्पा पूर्ण केला होता. पण साहेब यांच्या आयुष्यातला संघर्ष तिथेच थांबला नाही, म्हणूनच या जेव्हा इतिहास लिहिला जाईल त्यात साहेबांचे नाव संघर्ष योद्धा म्हणूनच लिहिले जाईल!

मागील 35 वर्षांच्या आमच्या सोबतीत साहेबानी केलेला प्रवास प्रचंड खडतर होता, पण ते कधीही डगमगले नाहीत. कित्येक आरोप झाले, भरल्या ताटावरून उठवण्यात आले, पण कधीही खचले नाहीत, श्री गणरायाच्या कृपेने संघर्षाच्या या प्रवासात कुठेही असत्याने साहेबांवर मात केली नाही.

मी कोविडच्या लॉकडाऊन काळात एकदा साहेबांना सहज म्हणालो साहेब छोटे व्यावसायिक नगर परिषदेच्या कर पावत्या भरू शकणार नाहीत, साहेब म्हणाले, “अरे अण्णा, आपण त्यांना उलट किराणा भरून द्या, पावत्या कसल्या घेता!” 70 हजार कुटुंबांना या काळात किराणा पुरवला, ते केवळ आणि केवळ साहेबांमुळेच शक्य झाले.

साहेबांना शहरात कुठे काय चाललंय, कधीच सांगायची गरज पडत नाही, आमच्या आधी साहेबांना सर्व काही माहीत असते, शहराच्या विकासात भर घालणारे भुयारी गटारांचे व अंतर्गत रस्त्यांचे काम सुरू असताना रस्त्यांच्या दर्जावर भर द्या, वेळेत पूर्ण करा, असा साहेबांचा आग्रह असायचा. आज नगर परिषदेवर प्रशासक असले तरी साधा मेसेज करून कुणी एखाद्या कामाची किंवा रस्त्यातील खड्ड्याची जरी तक्रार केली तरी साहेब त्याची लगेच दखल घेत साहेब तातडीने दुरुस्ती करायला सांगतात.

राजकारणात सत्ता येते आणि जाते परंतु माणूस कितीही मोठा झाला तरीही पाय मात्र जमिनीवरच ठेऊन आजही उभा आहे आणि कोणत्याही परिस्थितीत ज्याचे पाय जमिनीवर आहे त्या नेतृत्वाचे भवितव्य खूप उज्वल व कारकीर्द खूप प्रभावी व मोठी ठरते हा इतिहास आपल्या सर्वांना माहीत आहे.

मंत्री काळात साहेबानी शहरासाठी शेकडो कोटींची कामे आणली तशीच ग्रामीण भागातही पायाभूत सुविधांचा विकास करण्यावर भर दिला. शहर बायपास, अंबाजोगाई रस्ता, महावितरण सबस्टेशन, 11 साठवण तलाव अशी मोठी कामे मंजूर करून घेतली. त्यातली अनेक कामे आता पूर्णत्वाकडे वाटचाल करत आहेत. आता सरकार गेले म्हणून साहेबांचा हा अश्वमेध यज्ञ रोखला की काय असे अनेकांना वाटत असेंल, पण त्यांनाही माहीत आहे की साहेबांचा अजातशत्रू स्वभाव असल्याने त्यांचे कोणतेच काम कुणाचेही सरकार असले तरी अडत नाही!

गाव-खेड्यातल्या सामान्य वाल्मीकचा साहेब तुम्ही अण्णा केलात, आज जिल्ह्यात वावरताना आपल्या माध्यमातून लोकसेवा करताना, आपला कार्यकर्ता हा सर्वोच्च सन्मान माझा आहे, बाकी सगळं साहेब तुमचं कर्तृत्व आहे! अशा कर्तृत्ववान, परोपकारी देवमाणसाला या जन्मदिनी खूप खूप शुभेच्छा…!

– वाल्मिक (अण्णा) कराड, परळी वै.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा