जो बालपणापासून भक्ती करतो तोच खरा बुद्धिवंत – उद्धव प्रभुजी शास्त्री




जो बालपणापासून भक्ती करतो तोच खरा बुद्धिवंत – उद्धव प्रभुजी शास्त्र

 सोमेश्वर मंदिर येथील भागवत कथेला खा. डॉ. प्रीतमताई मुंडे यांची उपस्थती 

बीड
भगवंताची आराधना ही वय झाल्यावर करून उपयोग नाही. जो बालपणापासून भगवंताची भक्ती करतो तोच खरा बुद्धिवंत आहे असे अमृततुल्य विचार उद्धव प्रभुजी भक्ती शास्त्री यांनी भक्त प्रल्हाद आणि हिरण्यकश्यप यांच्या कथेचा सार सांगताना व्यक्त केले.
बीड येथील जाज्वल्य आणि प्रसिद्ध असलेल्या श्री सोमेश्वर मंदिरात श्री सोमेश्वर मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष नवनाथ अण्णा शिराळे यांच्या आयोजनातून संगीतमय भागवत कथा सुरू आहे. या भागवत कथेचे चौथे पुष्प शनिवार दिनांक 5 ऑगस्ट रोजी वृंदावन येथील उद्धव प्रभुजी भक्ती शास्त्री यांनी गुंफले. आपल्या अमृततुल्य वाणीतून त्यांनी चौथे पुष्प गुंफताना हिरण्यकश्यप आणि भक्त प्रल्हाद यांच्यातील कथानक संगीतमय भागवत कथेतून उभे केले. ते म्हणाले, राजा हिरण्यकश्यप राक्षसाला आपला मुलगा प्रल्हाद याला पृथ्वीतलावरील सर्वात ताकतवर राक्षस करायचे होते. मात्र प्रल्हाद हा हरीचा भक्त होता. तो जन्मापासूनच आपल्या भगवंताच्या चरणी लीन असल्याने त्याच्यावर राक्षसी अनंत संस्कार करण्याचा प्रयत्न बाप हिरण्यकश्यप याने केला. मात्र त्यात त्याला यश आले नाही. जेव्हा भक्त प्रल्हाद हा आपल्या विचारावर राक्षसी स्वरूप घेत नाही त्याच्या मुखातून हरीचा जप थांबत नाही हे पाहून हरण्यकश्यप राजाने आपल्या मुलाचा वध करण्याचे आदेश दिले. भक्त प्रल्हादाला सर्व पद्धतीने जीवे मारण्याचे प्रयत्न झाले. हत्तीच्या पायाखाली दिले, भयंकर हिस्त्र प्राण्यांच्या समोर सोडले, विषारी साप अंगावर सोडले, उकळत्या तेलात टाकले, उंच कड्यावरून फेकून दिले, अग्नीमध्ये टाकले पण भक्त प्रल्हादांचा जीव गेला नाही. उलट भक्त प्रल्हाद याने यानंतर हिरण्यकश्याच्या राज्यात हरीचा जप आणि भजन उघडपणे सुरू केले. शेवटी राजा हरण्यकश्यपणे भक्त प्रल्हादाला विचारले तू विष्णूचा हरीचा इतके भजन करतो, जप करतो तुझा देव कशात आहे सांग मी त्याला मारून टाकतो.भक्त प्रल्हादाने सांगितले जिथे श्रद्धेने पहाल तिथे माझा भगवंत आहे. तेव्हा हरण्यकश्यपणे या खांबात तुझा देव आहे का ? असे विचारले.भक्त प्रल्हादाने हो म्हटले आणि राजा हरण्यकश्यपणे मोठ्या अहंकाराने खांबावर लाथ मारली. त्यातून साक्षात नरसिंह देव प्रगटले आणि त्यांनी ताकतीच्या अहंकारावर राक्षसी वृत्तीचे थैमान घालणाऱ्या राजा हरण्यकश्यपचा वध केला. अशाप्रकारे त्यांनी भक्त प्रल्हादाची भक्ती आणि राजा हरण्यकश्यपची राक्षसी प्रवृत्ती आपल्या अमृततुल्य वाणीतून व्यक्त करत त्यांनी आपल्या चौथ्या पुष्पाला विराम दिला. आरतीने कथेचा समारोप झाला. चौथ्या दिवशी कथेला भक्तांची भर पावसात देखील मोठ्या उत्साहात आणि उत्स्फूर्तपणे शेकडोच्या संख्येने उपस्थिती होती.

कथेचे श्रवण करण्यास भाजपा नेत्या खासदार डॉ. प्रीतमताई मुंडे यांची उपस्थिती

 रविवार दिनांक 6 ऑगस्ट रोजी दुपारी 3 ते 6 या वेळेत संगीतमय भागवत कथेतून भगवंताचे विविध अवतार यावर उद्धव प्रभुजी भक्ती शास्त्री आपल्या अमृततुल्य वाणीतून प्रवचन करणार आहेत. या कथेचे श्रवण करण्यासाठी बीड जिल्ह्याच्या लोकप्रिय खासदार डॉक्टर प्रीतमताई मुंडे यांची विशेष उपस्थिती राहणार असल्याचे कथेचे आयोजक भाजपा नेते नवनाथ अण्णा शिराळे यांनी सांगितले.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा