एकीकडे रेमडेसीविरचा काळाबाजार तर दुसरीकडे आठशे नव्यान्नव रुपये दराने विकली इंजेक्शन




प्रकाश देसरडा यांचा केला सत्कार

शिरूर का.। कोरोना बाधितांना रेमडेसिवर इंजेक्शन लागत असो अथवा नसो, त्यांना ते अमृत आहे अस वाटत आहे. तर याच वेळी वीस ते पंचवीस हजार रुपयांना हे इंजेक्शन विकुन काळ्या बाजारात पैसा कमवण्याऱ्यांची संख्याही कमी राहिली नाही. त्यातच शिरूर कासार इथले रहिवासी प्रकाश देसरडा यांनी मात्र जिल्हा प्रशासनाला ही इंजेक्शन आठशे नव्यांनव रुपयात उपलब्ध करून दिले आहेत. त्यामुळे एकीकडे काळाबाजार होत असताना दुसरीकडे रुग्नसेवा म्हणून खरेदी केलेल्या दरात इंजेक्शन पुरविणारे प्रकाश देसरडा हे कौतुकास पात्र असल्याचे जन आंदोलनाचे विश्वस्त अँड. अजित देशमुख यांनी म्हटले आहे.

जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर गीते आणि अन्न आणि औषध प्रशासनाचे निरीक्षक डोईफोडे रेमडेसिविरच्या मागणी आणि विक्रीवर नियंत्रण ठेवू शकले नाहीत. किंबहुना त्यांची यंत्रणा भ्रष्ट कारभारात सहभागी झाल्याच्या शेकड्यावर बातम्या छापून आलेल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी उपजिल्हाधिकारी धरमकर यांचेकडे हे काम सोपावल्यानंतर देखील काळाबाजार संपला नाही. यातून कोट्यवधी रुपयांची माया विक्रेते व संबंधितांनी कमवल्याचे देखील वेगवेगळ्या वर्तमानपत्रातून छापुन आले आहे.

तर दुसरीकडे आरोग्य विभागाच्या एका अधिकार्‍याचे विनंतीवरून प्रकाश देसरडा यांनी आपल्या पुणे येथील मेडिकल स्टोअर मधून जिल्हा प्रशासनाला तब्बल सहाशे ऐंशी रेमडेसिविर इंजेक्शन आठशे नव्यान्नव रुपये दराने दिले आहेत. तर एकशे अठ्ठावन्न रेमडेसीविर इंजेक्शन अकराशे तेवीस रुपयांना दिली आहेत. अकराशे तेवीस रुपयांना विकलेल्या इंजेक्शन वरील एम.आर.पी. दोन हजार आठशे रुपये एवढी आहे.

देसरडा यांनी जर हे इंजेक्‍शन काळ्या बाजारात विकले असते तर त्यांना दोन कोटीच्या आसपास रक्कम मिळाली असती, असे काही लोकांनी सांगितले. मात्र कोरोणा बाधितांना लाभ व्हावा, या उद्देशाने त्यांनी जिल्हा प्रशासनाला हे इंजेक्शन अत्यंत माफक दरात घेतल्या किमतीत दिलेले आहेत. मात्र या मधला काळा बाजार देखील जिल्हा प्रशासन रोखू शकले की नाही ? हे समजायला मार्ग नाही.

प्रकाश देसरडा यांचे या कामामुळे जन आंदोलनाचे विश्वस्त अँड. अजित देशमुख यांनी एक पुस्तक भेट देऊन अभिनंदन केले. एकीकडे काळा बाजार वाढत असताना दुसरीकडे रुग्णसेवेची संधी म्हणून आपण जे काम केलेले आहे, ते कौतुकास पात्र असून अडचणीच्या काळात कोरोना बाधितांना आपण कमी किमतीत रेमडेसीविर इंजेक्शन उपलब्ध करून दिल्यामुळे याचा निश्चितच आपल्या आरोग्यावर चांगला परिणाम होईल आणि आपल्या हातून आणखी रुग्ण सेवा घडेल. आपल्या कामामुळे ज्या रुग्णास इंजेक्शन मिळून जीवदान मिळाले, त्यांचे आशीर्वाद देखील आपणास मिळतील, असे अँड. देशमुख यांनी यावेळी म्हटले.

त्याचबरोबर रेमडेसिविर इंजेक्शन बाबत काळाबाजार करणाऱ्या आणि त्यांच्या काळाबाजारावर कुठलीही कारवाई न करता, या अधिकाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकारी आणि लोक प्रतिनिधींना जनता माफ करणार नाही. कोरोनाचे संक्रमण वाढत असताना नियंत्रण व ठेवणाऱ्यांवर खरे तर ठोस कारवाई झाली पाहिजे होती. पण त्यांना वाचवणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने या लबाडांवर कारवाई होत नसल्याची खंत देखील देशमुख यांनी व्यक्त करून नियती अशा लोकांना माफ करत नसते, असेही म्हटले.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा