आषाढी वारी, यंदाही न्यारीच !




राज्यात ‘कोरोना’चा कहर कमी होत आहे. मात्र, धोका अजूनही टळलेला नाही. या रोगाची लागण झालेले रुग्ण अजूनही आढळतच आहेत. मराठवाड्याचाच विचार करता कालच्या मंगळवारी दिवसभरात ‘कोरोना’चे 512 रुग्ण आढळून आले आहेत. तर, उपचारादरम्यान आणखी 38 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. याच पार्श्‍वभूमीवर शासन, प्रशासन, डॉक्टर्स, परिचारिका, पोलिस, सफाई कर्मचारी असे सारे ‘कोरोना’विरुद्ध लढा देत आहेत. बहुतेक लोकही दक्षता बाळगत आहेत. असे असताना यंदा आषाढी वारीचा सोहळा साजरा करायचा कसा, हा प्रश्‍न पुन्हा एकदा पुढे आला होता. त्यावर पुण्यातील कालच्या आढावा बैठकीत निर्णयही झाला. ‘कोरोना’ प्रादुर्भावाच्या
पार्श्वभूमीवर राज्य सरकारने केवळ 10 पालख्यांनाच वारी सोहळ्यात सहभागी होण्याची परवानगी दिली आहे. या दहा पालख्या पंरपरेप्रमाणे पायी जाणार नसून 20 बसेसच्या माध्यमातून पंढरपुरी पोहोचणार आहेत. प्रत्येक पालखीसाठी 40 वारकर्‍यांना परवानगी दिली आहे. त्याचबरोबर रिंगण आणि रथोत्सवासाठी 15 वारकर्‍यांना परवानगी देण्यात आली आहे.  शासकीय महापूजेचा कार्यक्रम गतवर्षीप्रमाणे सर्व निर्बंध पाळूनच करण्यात येणार आहेत. गतवर्षीप्रमाणेच यंदाही आषाढी यात्रेवर काही बंधने घातल्याने तमाम वारकर्‍यांचे मन खट्टू होणे स्वाभाविकच ठरते. कारण या वारकर्‍यांना आषाढीनिमित्त विठ्ठल-रखुमाईला डोळे भरून बघायचे असते; मनोभावे दर्शन घ्यायचे असते. वारकर्‍यांना एकमेकांची ख्याली-खुशाली विचारायची असते. विचारांची देवाणघेवाण, पीक-पाण्यावर चर्चा करतानाच राजकीय विषयालाही तोंडी लावायचे असते. आषाढी वारीत सगळेच ‘माऊली’ असतात. त्यामुळेच ते आपुलकीने, विश्‍वासाने एकमेकांशी बोलत असतात. माणुसकीने वागत असतात. अशी ही बहुआयामी आषाढी वारी गत वर्षीनंतर यंदाही एकमेकांच्या संगतीने साजरी करता येणार नाही, म्हणजे या सार्‍या
मंगलमांगल्यावर पाणी फेरण्यासारखेच. करणार काय, परिस्थितीच तशी निर्माण झाली आहे. पांडुरंगालाही भक्तांसाठी कोंडून घ्यावे लागले आहे. ‘कोरोना’चा संसर्ग जीवावर बेतणारा असल्याने प्रत्येक माणूस काळजी घेत आहे. त्यात वारकरी सुज्ञ, सारासार सद्विचाराने वागणारे. तारतम्य बाळगून वागण्याचा आणि निर्णय घेण्याचा, कुठल्याही गोष्टीचा हेका न करण्याचा संदेश
विठूमाऊलीनेच जणू त्यांना दिलेला असतो. आपल्याकडून दुसर्‍याला, समाजाला कुठलाही त्रास होणार नाही, अशी काळजी त्यामुळेच प्रत्येक वारकरी घेत असतो. दिंडीतच नव्हे, तर दैनंदिन जगण्यातूनही  त्यांच्याकडून त्याचाच प्रत्यय येतो. परस्पर मैत्रभाव वाढवून सर्वांचेच कल्याण साधावे, सुखी, समाधानी व्हावे, हीच तर भागवत धर्माची शिकवण आहे. अर्थातच आता ‘कोरोना’च्या काळोखातही याच धर्माचे पालन प्रत्येक वारकर्‍याकडून होईल. वारीला जाता आले नाही, याची हुरहूर मनात असतानाही तो आपल्या मनातील पांडुरंग जागा करील. तमाम संतांनी तेच केले. संत सावता माळ्यांनी तर, ‘कांदा-मुळा-भाजी…अवघी विठाई माझी..’असे सांगून आपल्या कामातच पांडुरंग पाहिला. खर्‍या भक्तांसाठी पांडुरंग धावून येतोच! त्याच्यांशी बोलतो! त्यांच्या कामात मदत करतो! संत जनाबाईला पांडुरंग जात्यावर दळू लागला. एकनाथाच्या घरी त्यानेच पाणी भरले. पांडुरंगाच्या भक्तांच्या भेटीचे, संतांच्या संगतीत राहण्याचे असे अनेक दाखले दिले जातात. काही कारणाने  भक्तांना पंढरपूरला येता आले नाही, तर स्वतः पांडुरंगच भक्तांच्या भेटीला जातो, हा श्रद्धाभाव असल्यानेच यंदा पुन्हा एकदा वारी हुकल्याची हुरहूर कुणीही बाळगण्याचे कारण नाही. ‘कोरोना’च्या कारणामुळे भाविकांची भेट होणार नसल्याने विठुराया पंढरपुरातूनच सार्‍या भक्तांवर प्रेमाचा वर्षाव करेल; तो पंढरीचा हरी ‘कोरोना‘च्या संकटाचा सामना करण्यासाठी सर्वांनाच सामर्थ्य देईल, असा श्रद्धाभाव आहेच. ‘कोरोना’चे संकट मोठेच आहे. त्यावर मात करता येईल. त्याचसाठीच लसीकरण मोहिमेला वेग देण्यात आला आहे. मात्र, लसीकरणाबाबत सावळा गोंधळ बघायला मिळत आहे. त्यात एक काळजीची बाब अशी की, देशात ‘कोरोना’तून मुक्त होणार्‍या रुग्णांना बुरशीचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. आतापर्यंत रुग्णांना काळी, पांढरी आणि पिवळ्या बुरशीचा संसर्ग झाल्याचे समोर आले होते. मात्र, आता ‘कोरोना’तून बरे झालेल्या रुग्णाला हिरव्या बुरशीची लागण झाल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. एकूणच धोका दुसर्‍या मार्गाने डोके वर काढतो आहे.  अशावेळी जनसामान्यांना विठूमाऊलीशिवाय दुसरा आधार तो कुठला? तेव्हा तुम्ही-आम्ही सर्वांनीच आषाढीची वारी हुकली म्हणून हळहळ व्यक्त न करता, घरी बसून त्या
विठूमाऊलीचे आतापासूनच नामस्मरण करायचे आहे; चिंतामुक्त व्हायचे आहे. चिंता पंढरपुरात
मानाच्या पालख्या पोहचण्याची होती; पण पांडुरंगाच्या कृपेने त्यावरही तोडगा निघाला. यंदाही सर्व मानाच्या पालख्या 20 बसेसच्या माध्यमातून पंढरपूरला पोहचतील. आषाढी एकादशीला मुहूर्तावर महापूजा झाल्यानंतर या पालख्या पुन्हा बसेसनेच परतीच्या
मार्गाला लागतील. एकूण काय तर वर्षानुवर्षांची परंपरा असलेल्या आषाढी वारीचे महत्त्व आणि माहात्म्य संकटाच्या काळातही जपण्याचा प्रयत्न होतो आहे. अशावेळी वारकर्‍यांनी आपल्या विठूमाऊलीचे दर्शन घराच्या दारावर आणि शेतावरच्या बांधावर घ्यायचे आहे. देव केवळ देवळातच नसतो, तर प्रत्येकाच्या मनातही असतो, हा भक्तीभाव जागवायचा आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा