जिल्हा पोलिस दलास सक्षम करण्यासाठी सर्वकाही देऊ, गुन्हेगारांना पोलिसांचा धाक वाटावा असे वातावरण निर्माण करा – धनंजय मुंडे




बीड जिल्हा पोलिस दलात 151 मोटारसायकल, 8 स्कॉर्पिओ, 2 डायल 112 व 2 टियूव्ही गाड्या दाखल; धनंजय मुंडेंच्या हस्ते लोकार्पण संपन्न

प्रत्येक पोलीस ठाण्यात असणार एक महिला बीट अंमलदार; पोलिसांच्या खास ‘ध्यासपर्व’ या पुस्तिकेचेही ना. मुंडेंच्या हस्ते प्रकाशन

बीड l  (दि. २२)  बीड जिल्हा पोलिस दलास जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आवश्यक वाहने उपलब्ध करून देण्यात आली आहेत, या व्यतिरिक्त पोलीस दलास सक्षम करण्यासाठी आवश्यक ते सर्वकाही संसाधने व आधुनिक उपकरणे उपलब्ध करून देऊ, जिल्हा पोलिस दलाने गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांमध्ये कायद्याचा धाक निर्माण व्हावा तसेच सर्वसामान्य लोकांना कायद्याचे राज्य आहे अशी जाणीव निर्माण व्हावी असे वातावरण निर्माण करावे, असे आवाहन बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी बीड जिल्हा पोलिस दलास केले आहे.

बीड जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्हा पोलिस दलास 151 मोटारसायकल, 8 स्कॉर्पिओ, डायल 112 पथकासाठी 2 बोलेरो, तसेच 2 टियूव्ही गाड्या असे एकूण 165 वाहने खरेदी केल्या असून, आज धनंजय मुंडे यांच्या हस्ते या गाड्यांचे एका दिमाखदार सोहळ्यात लोकार्पण करण्यात आले.

यावेळी पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांना बीड पोलिसांच्या वतीने मानवंदना देण्यात आली, तसेच सर्व वाहनांची रंगीत परेड करून त्याद्वारे मोटारसायकल उभा करून डायल 112 आकार साकारण्यात आला. यावेळी आ. संदीप क्षीरसागर, आ. संजय दौंड, मा.आ. सुनील धांडे, मा.आ.सय्यद सलीम, जिल्हा परिषद उपाध्यक्षबजरंग सोनवणे, राष्ट्रवादी युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, शिवसेना जिल्हा प्रमुख सचिन मुळूक, शिवसेना जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी तसेच बीड चे जिल्हाधिकारी रवींद्र जगताप, सीईओ अजित कुंभार, पोलिस अधीक्षक आर. राजा, तसेच सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी – कर्मचारी उपस्थित होते.

जिल्ह्यात प्रत्येक पोलीस ठाण्यांतर्गत 1 बीट अंमलदार या महिला असणार आहेत. अशाप्रकारची संधी बीड जिल्ह्यात पहिल्यांदाच देण्यात आली आहे. याशिवाय 6 पिंक मोबाईल पथके महिला सुरक्षेसाठी विशेष स्थापन करण्यात आली आहेत. जिल्ह्यातील गुन्हेगारीवर आळा घालण्यासह कोविड विषयक निर्बंधाचे पालन करण्यासाठी संपूर्ण पोलीस दल अविरतपणे कार्यरत आहे, याबद्दल ना. मुंडेंनी पोलिसांचे कौतुक करत उत्तम कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली.

जिल्हा पोलिस अधीक्षक आर. राजा यांनी आपल्या प्रास्ताविक कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार यांनी आभार मानले.

गेल्या एक अधिक वर्षाच्या काळात कोविड विषयक कामगिरी व पोलीस दलापुढील विविध आव्हाने या दरम्यान बीड पोलिसांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीचा लेखाजोखा मांडणारे ‘ध्यासपर्व’ या विशेष पुस्तकाची निर्मिती बीड जिल्हा पोलिसांनी केली असून, ना. धनंजय मुंडे यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा