रामभक्तांकडून लाखो रूपये उकळले !




नवी दिल्ली : अयोध्येतील राम मंदिरासाठी खरेदी करण्यात आलेल्या जमीन व्यवहारात भ्रष्टाचार झाला आहे, असा मुद्दा चर्चेत असतानाच आता बनावट वेबसाईट तयार करून देणगीच्या नावाखाली रामभक्तांकडून लाखो रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. राम जन्मभूमी ट्रस्ट अयोध्या अशा नावाने बेकायदेशीर वेबसाईट तयार करून पैसे उकळल्याप्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी पाच जणांना अटक केलेले आहे. 
राम जन्मभूमी ट्रस्ट अयोध्या या नावाने अवैधपणे वेबसाईट सुरू करून लोकांकडून देणगीच्या नावाखाली पैसे उकळणे सुरू असल्याची बाब निदर्शनास आल्यानंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी ही कारवाई केली होती. राम मंदिर उभारणीसाठी देणगी गोळा करणाऱ्यांना सोमवारी अटक करण्यात आलेली होती. नोएडा सायबर पोलीस ठाणे आणि लखनौ सायबर क्राईम मुख्यालयातील पथकांनी संयुक्तपणे ही कारवाई केली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आरोपींनी राम जन्मभूमी ट्रस्ट अयोध्या अशा नावाने वेबसाईट सुरू केलेली होती. ही वेबसाईट बेकायदेशीरपणे सुरू करण्यात आली होती. राम मंदिराच्या उभारणीसाठी आर्थिक स्वरुपात योगदान देऊ इच्छिणाऱ्यांसाठी बँकेचा खाते क्रमांक देण्यात आलेला होता. त्याचबरोबर इतरही माहिती होती, असे पोलिसांनी सांगितले आहे.

वेबसाईट बनवण्याचे कृत्ये बेकायदेशीर : आरोपींनी बोगस वेबसाईटच्या माध्यमातून आणि राम मंदिराच्या नावाखाली देणगीदारांकडून लाखो रुपये उकळले आहे. त्यांनी भाविकांचा विश्वासघातच केलेला नाही, तर बनावट वेबसाईट बनवण्याचे बेकायदेशीर कृत्यही केले आहे. या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्यांची ओळख पटवण्यात आली आहे. आशिष गुप्ता (वय २१), नवीन कुमार सिंग (वय २६), सुमित कुमार (वय २२), अमित झा (वय २४) आणि सुरज गुप्ता (वय २२) अशी आरोपींची नावे असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

 

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा