बहुचर्चित घटस्फोट




कौटुंबिक कलह नवे नाहीत. प्रत्येक कुटुंबात कमी अधिक प्रमाणात असे कलह कधी ना कधी होतच असतात. घरातील सुख-समृद्धी आणि आनंदात मिठाचे खडे पडत असतात. चिंतनाची आणि चिंतेची बाब अशी की, समाज सुधारला, शिकून शहाणा झाला असे म्हणतानाच कौटुंबिक कलह वाढत चाललेले आहेत. एक खरेच की, कुटुंबात वाद-विवाद हवाच; पण तो सुविचारांना धरून हवा. कारण चांगल्या विचारांतूनच कौटुंबिक विकास साधता येतो, वैभव निर्माण करता येते. समाजात अशीही काही आदर्श उदाहरणे आहेत. ज्यांच्या कुटुंबात वाद होतो; पण तो वैचारिक असतो. जो विचार चांगला आहे, तो विचार कुटुंबातील कुणीही मांडला असला तरी तो  सर्वच सन्मानाने स्वीकारतात. त्यामुळेच कुटुंबात एकमेकांविषयी जिव्हाळा वाढतो. सुख, शांतीचा सुखद अनुभव येतो. ज्या घरात सुख-शांती नांदते, तेथे साक्षात लक्ष्मी वास करते! असाही एक सुविचार आहे. असो. मुद्दा हाच की, सहजीवनातून सुख, शांती, आनंदाचा अनुभव घ्यायचा असतो. कठीण प्रसंग आलाच तर त्यावर मात करून पती-पत्नीनेही संसार सुखाचा करायचा असतो. हीच भारतीय संस्कृतीची शिकवण खरी; पण या संस्कृतीला सुरुंग लावण्याचे चौफेर प्रयत्न होत आहेत. पाश्‍चात्य संस्कृतीचे अनुकरण केले जात आहेत. त्यामुळेच की काय, अलीकडे भारतीयांमध्येही घटस्फोटाचे प्रमाण वाढीस लागले आहे. भारतीयांच्या बहुचर्चित घटस्फोटामध्ये आता ‘बॉलिवूड’ अभिनेता आमीर खान आणि त्याची पत्नी किरण राव या जोडीचेही नाव घेतले जात आहे. ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या आमीर खान आणि  किरण राव विभक्त झाले आहेत. स्वत: आमीरनेच घटस्फोटाची ताजी माहिती दिली आहे. स्वाभाविकच त्यांच्या या निर्णयाने त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.
आमीर खान आणि किरण राव या दोघांचा 28 डिसेंबर 2005 रोजी विवाह झाला होता. आमीर खानने एका मुलाखतीत सांगितले होते की,‘किरण आणि त्याची भेट ‘लगान’च्या सेटवर झाली. तेव्हा ती सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत होती. दरम्यान अचानक एक दिवस मला किरणचा फोन आला. तिच्याशी बोलल्यानंतर मी इतका आनंदी झालो होतो की, आनंदाने उड्या मारायला लागलो. मी आतून किती आनंदी आहे ते जाणवत होतं. त्यानंतर आम्ही
एकमेकांना ‘डेट’ करायला सुरुवात केली. एक-दोन वर्ष आम्ही एकमेकांना ‘डेट’केले. या काळात आम्ही एकत्र राहतही होतो. त्यानंतर मला जाणवायला लागले की, तिच्याशिवाय मी माझ्या आयुष्याचा विचार करू शकत नाही. तिच्यातला सर्वात चांगला गुण म्हणजे ती एक सशक्त महिला आहे. यानंतर आम्ही नात्याला नाव देण्याचे ठरवले आणि आम्ही लग्न केले!’ त्यांच्या या लग्नाला आता जवळपास 15 वर्षे झाली. त्यांना एक  एक मुलगाही आहे, त्याचे नाव आझाद! या आझादला माता-पित्याची एकत्र माया मिळण्याची गरज असतानाच आमीर-किरण हे दोघे संसारिक जबाबदारीतून आझाद झाले! खरे तर, किरणशी आमीर खानचे हे दुसरे लग्न! या आधी 2002 मध्ये आमीर आणि अभिनेत्री रीना दत्त विवाहबंधनात अडकले होते. रीना आणि आमीरला आयला आणि जुनेद ही दोन मुले आहेत. 16 वर्षांनी आमीरने रीनाला घटस्फोट दिला होता. त्यानंतर आता  आमीरपासून किरणही दुरावली. ही वेळ का आली?  अर्थात आमीर आणि किरण यांच्या घटस्फोटाची घटना ही पहिलीच नाही. ‘बॉलिवूड’मध्ये याआधीही अशी अनेक प्रकरणे घडली आहेत. कपडे बदलावेत, तसे नटनट्यांनी जोडीदारांना बदलले आहे. ‘बॉलिवूड’
मध्ये घटस्फोटाची जणू संस्कृतीच रुजली आहे. या क्षेत्रातील घटस्फोटीतांची अनेक नावे सांगता येतील. पैकी अभिनेता कमल हासन यांचा घटस्फोट बराच गाजला होता. त्यांनी पहिल्यांदा गायिका वाणी गणपतीशी लग्न केले होते. त्यानंतर अभिनेत्री सारिकाशी लग्न केले; पण त्यांची सतत भांडणे होऊ लागल्यामुळे त्यांनी घटस्फोट घेतला. सतत प्रसिद्धीच्या झोतात असलेल्या संजय दत्तचे म्हणाल, तर मान्यता दत्त ही संजय दत्तची तिसरी पत्नी आहे. त्याने पहिली पत्नी ऋचा शर्माच्या निधनानंतर अभिनेत्री रिया पिल्लईशी लग्न केले होते; पण त्यांचा हा संसार फार काळ टिकला नाही. आघाडीची अभिनेत्री विद्या बालननेही चित्रपट निर्माता सिद्धार्थ रॉय कपूरशी तिसर्‍यांदा लग्न केले आहे. त्यापूर्वी तिने दोन वेळा घटस्फोट घेतला आहे. ‘बॉलिवूड’मधील बहुचर्चित घटस्फोटाची अशी ही यादी मोठीच आहे. असो; पण प्रश्‍न हाच की, हे लोक असे का वागतात? ज्यांच्या अभिनयाचे अनुकरण करून, आदर्श घेवून नवी पिढी घडत असते. तेच प्रत्यक्ष जीवनात नैतिकदृष्ट्या का घसरतात? नट-नट्यांच्या जीवनाबद्दल असे अनेक प्रश्‍न असू शकतात, त्या सार्‍या प्रश्‍नांची सकारात्मक उत्तरे मिळतीलच असे नाही. नट-नट्यांचे जगणे हे एक गूढच असते, असे म्हणतात ते खरेच आहे. आघाडीचा अभिनेता आमीर खान आणि निर्माती, पटकथा लेखक आणि दिग्दर्शक असलेल्या किरण राव यांनी परस्पर संमतीने घटस्फोट घेवून हेच गूढ वाढविले म्हणायचे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा