बंद झालेल्या श्री संत ज्ञानेश्वर इंग्लिश स्कूल मधील विद्यार्थ्यांचे इतर शाळेत समायोजन 




 

मनोज जाधव यांच्या लढ्याला यश

आरटीई अंतर्गत इतर शाळेत समायोजन करण्याची ही महराष्ट्रातील पहिली घटना 

 

बीड l  शहरातील शाहूनगर भागातील श्री संत ज्ञानेश्वर इंग्लिश स्कूल या शाळा व्यवस्थापनाने शाळा बंद करण्याचा निर्णय घेतल्याने या शाळेत आरटीई अंतर्गत मोफत प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांसमोर आपल्या मुलांच्या शैक्षणिक भवितव्याचा मोठा यक्ष प्रश्‍न निर्माण झाला होता. मात्र जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार साहेब यांच्या कर्तव्यदक्ष कामगिरीमुळे शिक्षण संचालक यांनी या विद्यार्थ्यांचे इतर शाळेत समायोजन करण्यासाठी हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे या शाळेतील आरटीई अंतर्गत प्रवेशित २७ विद्यार्थ्यांचे इतर शाळेत समायोजन करण्यात आले आहे. आरटीई अंतर्गत अशा प्रकारे इतर शाळेत समायोजन करण्याची ही महाराष्ट्रातील पहिलीच बाब आहे. या सर्व लढ्याला यश मिळण्याचे कारण पालकांची एकजूट असल्याचे मत शिवसंग्रामचे युवा नेते तथा आरटीई कार्यकर्ते मनोज जाधव यांनी दिली आहे.
श्री संत ज्ञानेश्वर इंग्लिश स्कूल या शाळा व्यवस्थापनाने शाळा बंद करण्याचा निर्णय घेतल्याने या शाळेत प्रवेशित विद्यार्थी व पालक यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागले. त्याचबरोबर या शाळेत आरटीई अंतर्गत मोफत प्रवेश मिळालेल्या ३० गोरगरीब विद्यार्थ्यांचे इतर शाळेत समायोजन करण्याची मागणी पालकांच्या वतीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभर यांच्या कडे करण्यात आली होती. या प्रकरणात गांभीर्यपूर्वक लक्ष घालत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी शिक्षण संचालक शिक्षण संचालनालय ,पुणे यांच्याशी पत्रव्यवहार करून या शाळेतील आरटीई अंतर्गत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांची इतर शाळेत समायोजन करावे यासंबंधीची मागणी केली होती. याला मान्यता मिळाली असून या गोरगरीब विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे. यात तीन पालकांनी इंग्रजी शाळांच्या या नाहक त्रासाला कंटाळून आपल्या पाल्याचे मराठी शाळेत प्रवेश घेतले तर उर्वरित २७ विद्यार्थ्यांचे त्यांच्या मागणी नुसार व सोई नुसार शाळा उपलब्ध करून त्यांचे प्रवेश निश्चित केले आहेत.

शाळा बंद केल्याने शिक्षण संचालकांनी ओढले ताशेरे 

शाळा बंद केल्याने आरटीई अंतर्गत प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांचे इतर शाळेत समायोजन करण्यासाठी शिक्षण संचालक यांना पत्रव्यवहार केल्यानंतर त्यांनी याला मान्यता देते वेळी शाळा व शिक्षण विभाग यांच्यावर चांगलेच ताशेरे ओढले यात त्यांनी म्हटले आहे. शाळा बंद पडल्याने फक्त ३० विद्यार्थ्यांबाबत शाळा बदलून मिळण्याबाबत कळविले आहे. परंतु इतर विद्यार्थ्यांचे काय ? तसेच सदर शाळेमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांचे जवळच्या इतर शाळांत समायोजन केल्याशिवाय आणि आपल्या अनुमतीने शाळा बंद करण्याचा प्रस्ताव संचालनालयास / शासनास प्राप्त झाल्याशिवाय शाळा बंद कशी केली ? शाळा बंद केल्याने इतर विद्यार्थ्यांचे समायोजन कशाप्रकारे केले ? तसेच शाळा बंद केल्याच्या तक्रारीवर शाळेवर काय कारवाई केली ? संबंधित अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे विद्यार्थी व पालक यांना झालेल्या नाहक मानसिक त्रासास कोण जबाबदार आहेत ? संबंधित शाळा व दोषी अधिकाऱ्यांवर काय कारवाई करण्यात आली ? या सर्व बाबींबाबत आपण तात्काळ खुलासा आपल्या स्वयंस्पष्ट अभिप्रायासह संचालनालयास सादर करावा. असे सांगितले आहे या वर शिक्षण विभागाने संबंधित बंद केलेल्या शाळा व्यवस्थापनाची सविस्तर चौकशी करण्यात आली असुन कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेल्या आहेत . त्यांच्यावर सविस्तर कार्यवाही करण्यात येत असून शाळा मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव स्वतंत्रपणे सादर करण्यात येत आहे असे कळवले आहे.

शाळा बंद झाल्या नंतर आरटीई अंतर्गत प्रवेशित विद्यार्थ्यांचे अश्या प्रकारे इतर शाळेत समायोजन करण्याची ही महाराष्ट्रातील पहिलीच घटना आहे. ही प्रक्रिया अतिशय किचकट आणि कठीण होती. परंतु पालकांच्या एकजुटी मुळे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार साहेब , विस्तार अधिकारी गौतम चोपडे, जिल्हा संगणक प्रोग्रामर सुरेंद्र रणदिवे आणि विशेष शिक्षक,गटशिक्षण कार्यालय, बीड विठ्ठल वाघ यांच्या अथक परिश्रमा मुळे हे शक्य झाले त्या बद्दल आरटीई कार्यकर्ते मनोज जाधव यांनी त्यांचे आभार व्यक्त केले आहेत.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा