गेवराई गोदाकाठच्या 32 गावांना पुराचा संभाव्य धोका.!




 

पुनर्वसनाचा निर्णय लालफितीतच ; तर 2006 ची पुनरावृत्ती, उपाययोजनाची आवश्यकता ।

तलवडा । दि. 29 (ओमराजे कांबीलकर)

गेवराई। तालुक्यातील 32 गावे हि गोदावरीच्या तीरावर वसलेली आहेत. नदीला मोठा पूर आल्यास या गावांना पाण्याचा वेढा पडून याठिकाणी परिस्थिती गंभीर होते. सन 2006 साली जायकवाडी धरणातून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडल्याने नदीला पूर येऊन हि गावे पाण्याखाली गेल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. यावेळी या गावांचा पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर आला होता. मात्र यानंतर दुष्काळी परिस्थितीराहिल्याने या निर्णयाचा शासनाला विसर पडलेला असून लोकप्रतिनिधींनी देखील याबाबत आवाज उठवलेला नसल्याने हा निर्णय शासन दरबारी लालफितीतच पडून आहे. तरी यावर्षी पावसाचा जलप्रकोप पाहता पश्चिम महाराष्ट्रातील पुरपरिस्थिती, नाशिक जिल्ह्यातील पावसाचा जोर व पुढील दोन तीन महिने पावसाळ्याचे असल्याने यावर्षी या गावांना देखील पुराचा संभाव्य धोका निर्माण होऊ शकतो, त्यादृष्टीने प्रशासनाने अगोदरच याठिकाणी उपाययोजना करणे आवश्यक आहे, नसता 2006 ची पुनरावृत्ती होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात मागील आठ-दहा दिवसांपूर्वी पावसाने थैमान घातले. परिणामी पुरपरिस्थितीने तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. काही ठिकाणी दरड कोसळून तर काही ठिकाणी पुरात जवळपास 100 हून अधिक लोकांचे जीव गेले आहेत. तर दुसरीकडे नाशिक जिल्ह्यात देखील पावसाचा जोर कायम आहे. यामुळे गोदावरी नदीवरील बहुतांश धरणात पाण्याची मोठ्या प्रमाणावर आवक आहे. तसेच याच नदीवरील सर्वात मोठे धारण असलेले पैठण येथील जायकवाडीत धरणात देखील पाण्याची आवक सुरु असून धरण जुलै महिन्यातच 40 टक्के आले आहे. गतवर्षीच्या तुलनेत हि सरासरी अधिक असून पावसाचे दोन-तीन महिने बाकी आहेत. पुढील दोन तीन महिण्यात पावसाचा जोर अधिक राहिल्यास गेवराई तालुक्यातून गेलेल्या गोदावरी नदीकाठी असलेल्या जवळपास 32 गावांना यावर्षी पूराचा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. सन 2006 साली गोदावरीला मोठ्या प्रमाणात पूर आल्याने हि गावे पाण्यात गेल्याने तेथील नागरिकांना सुरक्षीतस्थळी हलविण्यात आले होते. यानंतर या गावांचा पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर आला होता. मात्र यानंतर दुष्काळी परिस्थितीमध्ये हा पुनर्वसनाचा निर्णय लालफितीत अडकलेला आहे. मागील दोन वर्षात पाऊस सरासरीच्या तुलनेत अधिक पडत आहे. गतवर्षी जायकवाडी धरणातून तीन वेळा पाणी सोडण्यात आले होते, यावेळी गोदावरीला पूर आला होता. नशीब त्यावेळी धरण क्षेत्रात व तालुक्यात पावसाची उघडीप होती, नसता पुन्हा एकदा या गावांना फटका बसला असता. दरम्यान यावर्षीचा पश्चिम महाराष्ट्र तसेच नाशिक जिल्ह्यातील पावसाचा जोर पाहता धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सोडला जाऊ शकतो. याचवेळी जर पावसाने धरण क्षेत्रात जोर धरल्यास गेवराई तालुक्यातील 32 गावांना पुराचा संभाव्य धोका निर्माण होऊ शकतो. तरी सन 2006 ची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून प्रशासनाने अधिक सतर्कतेची खबरदारी घेणे गरजेचे आहे.

पुनर्वसनाचा निर्णय लालफितीत – 
सन २००५-०६ आणि २००६-०७ मध्ये नाशिक जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसाने जायकवाडी धरण तुडुंब भरले होते. त्यावेळी धरणातून गोदावरी नदीपात्रात साडेतीन लाख क्युसेक्स पाणी सोडण्यात आले होते. दरम्यान पाण्याचा विसर्ग मोठा असल्याने बीड जिल्ह्यात गेवराई, माजलगाव आणि परळी वैजनाथ या तालुक्यातील अनेक गावांना महापुराचा फटका बसला होता. शेतीचे आणि घरांचे मोठे नुकसान झाले होते. दरम्यान गोदावरी काठच्या गावांना नदीला मोठा पूर आल्यास झळ बसते, त्यामुळे या गावांचे तातडीने पुनर्वसन करण्यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने सन २००८ साली विभागीय आयुक्तांकडे प्रस्ताव तयार करून देखील पाठविला होता. यानंतर विभागीय आयुक्तांनी देखील सरकारकडे प्रस्ताव पाठवला होता, मात्र यानंतर सतत पडणारा दुष्काळ यामुळे तो अद्यापही रखडलेलाच आहे. मात्र गत दोन वर्षे तसेच यावर्षी पावसाचे सातत्य पाहिले तर संभाव्य धोका संभवतो. यामुळे या गावांचा पुनर्वसनाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर येण्याची शक्यता आहे. तरी या गावात पावसाळा आला की भितीचे वातावरण असते, त्यामुळे या गावांचा प्रश्न कायमचा मार्गी लागला पाहिजे.

या गावांना पुराचा धोका. –
गेवराई तालुक्यातून गेलेल्या गोदावरी तिरावरील ३२ गावांना पुर आल्यास पाण्याचा वेढा पडतो. यामध्ये राजापूर, आगरनांदुर, संगमजळगाव, हिंगणगाव, गोंदी खु., कटचिंचोली, पांगुळगाव, सुरळेगाव, पांचाळेश्वर, राक्षसभुवन, म्हाळसपिंपळगाव, सावळेश्वर, खामगाव, पंचलिंगेश्वर गंगावाडी(तलवाडा), काठोडा, नागझरी, राहेरी, बोरगावथडी, भोगलगाव, पांढरी, मिरगांव, तपेनिमगांव, ढालेगाव, श्रीपत अंतरवाला, गोपत पिंपळगाव, रामपुरी, मनुबाई जवळा, गुळज (भगवाननगर), पाथरवाला बु., गुंतेगाव, पाथरवाला खु., बोरगाव बु. या गावांचा समावेश आहे.

पावसामुळे उद्भवणाऱ्या नैसर्गीक आपत्तीपासून गेवराई तालुक्यातील नागरिक व पशुधनास वाचविण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. गेवराई तालुक्यातील गोदाकाठच्या गावात पुर परिस्थितीची संभावना लक्षात घेऊन खबरदारी म्हणून आगामी नैसर्गीक आपत्तीत पट्टीचे पोहणारे तसेच मदतकार्य करणाऱ्या व्यक्ती, संघटनांनी स्वतःची माहिती महसूल प्रशासनास देण्याचे आवाहन केले आहे.
सचिन खाडे
{तहसीलदार, गेवराई}

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा