साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या लेखणीचा लौकिक अजरामर राहील – ना. धनंजय मुंडे




 

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त ना. मुंडेंनी अभिवादन करत दिल्या शुभेच्छा, जयंती साधेपणाने साजरी करण्याचे आवाहन

बीड। साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या लेखणीने वंचित-शोषितांचा आवाज बनून इतिहास रचला, त्यांच्या या लेखणीचा, त्यांनी निर्मिलेल्या साहित्याचा नावलौकिक अजरामर राहील, असे राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला ना. धनंजय मुंडे यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतींना अभिवादन करत, अनुयायांना अण्णाभाऊंच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

मागील दीड वर्षांच्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्सव स्वरूपात आपल्याला साजरी करता आली नाही. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला काही प्रमाणात नियंत्रणात आणण्यात शासनाला यश मिळत असताना पुन्हा तिसऱ्या लाटेबद्दल संभाव्य भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे यावर्षी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साधेपणाने व कोरोना विषयक नियमांचे पालन करून साजरी करावी असे आवाहनही ना. धनंजय मुंडे यांनी केले आहे.

केंद्र सरकारकडून देण्यात येणारा भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार अण्णाभाऊ साठे यांना बहाल करण्यात यावा या मागणीच्या बाबत राज्य सरकार कडून केंद्राला सातत्याने पत्रव्यवहार व पाठपुरावा सुरूच आहे, तसेच साहित्यरत्न अण्णाभाऊ भारतरत्न घोषित होत नाहीत, तोपर्यंत हा पाठपुरावा सुरूच राहील, असेही यानिमित्ताने ना. मुंडे यांनी म्हटले आहे. तसेच त्यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करत शुभेच्छा दिल्या आहेत.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा