दिव्यांगाची गोरखगड थरार भ्रमंती; बीडचे दुर्गाप्रेमी कचरू चांभारे यांचा सहभाग




दै . मराठवाडा पत्र टीम

दि.06 ऑगस्ट 2021

भ्रमंती करताना

महाराष्ट्राला सह्याद्रीचे चिलखत लाभलेले आहे.बेलाग किल्ले,सरळसोट कडे,अभेद्य डोंगररांगा ,खोल द-यांनी सह्याद्री नटलेले आहे.गडकिल्ले भ्रमंती आकर्षण ट्रेकर्सना सतत खुणावत असते.राज्यातील काही दिव्यांग दुर्गप्रेमी युवक गेल्या सोळा वर्षापासून विविध गडकिल्ल्यांची भ्रमंती करत आहेत.शिवुर्जा प्रतिष्ठान पैठण यांच्याकडून वर्षभर विविध दुर्ग अभ्यास मोहिमांचे आयोजन केले जाते.शनिवार रविवार रोजी गोरखगड या भीमाशंकर अभयारण्यातील दुर्गम दुर्गाची साहसी ट्रेकिंग आयोजित करण्यात आली होती.

 


गोरखगड हा किल्ला मुरबाड तालुक्यात असून नाणेघाटाच्या परिसरात येतो.मुख्य रस्त्यापासून आतमध्ये पाच किमी अंतरावर असून हे सारे अंतर घनदाट जंगलाचे आहे.गोरखगड हा दुर्गम व कठीण श्रेणीतला किल्ला असून आकाशाकडे झेपावणारा सरळ सुळका आहे.त्याची उंची सुमारे एकवीससे फुट असून चढण्यासाठी कातळात कोरलेली खडी चढण आहे.
राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणच्या दिव्यांग बांधवांनी एकत्र येऊन ही चढाई यशस्वी केली.या मोहिमेत शिवुर्जा प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवाजी गाडे,जनार्दन पानमंद रायगड,मच्छिंद्र थोरात पुणे,दत्ता सालकर औरंगाबाद,मनिषा पाटील मुंबई,संध्या कर्जतकर ,भोयर उरणकर यांचा समावेश होता.बीड येथील प्राथमिक शिक्षक ,दुर्ग अभ्यासक तथा लेखक कचरू चांभारे हे सुद्धा दिव्यांग असून नियमितपणे गडकिल्ल्यांना ,ऐतिहासिक स्थळांना भेटी देत असतात.सदर गोरखगड मोहिमेत त्यांचाही सहभाग होता.
शनिवारी सायंकाळीच जंगली वाट कापत ,वाटेतील खोल द-या,दगडगोटे यांचा अडथळा पार करत सर्व दिव्यांग रात्री दहा वाजता गडावर पोहचले.गोरक्षनाथाने साधना केलेली मोठी गुफा गडावर त्या गुहेत सर्वांनी मुक्काम केला.सकाळी उठून संपूर्ण गडावर भ्रमंती केली.गडावर ठिकठिकाणी पाण्याची टाके आहेत .गडावरील उंच सुळक्यावर महादेवाचे मंदीर व सातकर्णी राजाच्या काळातील बांधकाम आहे.काळ्या कातळात कोरलेल्या पाय-या असून गड चढण्यास कठीण आहे.संपूर्ण गड पाहून छत्रपती शिवरायांच्या नावाचा गगनभेदी जल्लोष करून भटकंतीची सांगता केली.धडधाकट शरीर असणा-या माणसांनाही गोरखगड पाहून तिथं कापरं भरतं तिथं ही दिव्यांग व्यक्ती जाऊन आली आहेत.गडकिल्ले चढाई हे शारीरिक कसोटी असली तरी चढाईला साहसी मनाची जोड लागते.असं मत कचरू चांभारे यांनी व्यक्त केले.दिव्यांगांच्या धाडसाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात आले.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा