मंत्रालय की मदिरालय ?




 

नशा करणार्‍यांना, दारु पिणार्‍यांना लाजलज्जा नसते, हे खरेच; पण मंत्रालयातील उपहारगृहातही दारूच्या बाटल्यांचा खच पडावा, हे मोठेच नवलाईचे आणि संतापाचे ठरते. सर्व नेत्यांसाठी तेेथे चोख सुरक्षा व्यवस्था तैनात असते. तपासणी केल्याशिवाय सर्वसामान्यांना मंत्रालयात सोडले जात नाही. अशा परिस्थितीतही इतक्या मोठ्या प्रमाणात दारूच्या बाटल्या तेथे आल्याच कशा, असा प्रश्न आहे. या प्रकरणी सरकारने चौकशीचा आदेश दिला आहे. सामान्य प्रशासन विभागाचे मंत्री दत्तात्रय भरणे यांनी येत्या 15 दिवसांत या प्रकरणाची चौकशी  पूर्ण करणार असल्याचे सांगितले आहे. तरीही त्यावर विरोधकांचे समाधान होईलच असे नाही. भाजपने या मुद्यावर राज्य सरकारचे कान उपटलेच आहेत. ‘कोरोना’च्या काळात टाळेबंदी करण्यात आली होती. राज्यात व्यवहार, अनेक कार्यालये, मंदिरे, धार्मिक स्थळे सर्व बंद केली असताना, मंत्रालयात मात्र मोठ्या प्रमाणात दारूच्या पार्ट्या सुरू आहेत, असा आरोप करताना हे मंत्रालय आहे की मदिरालय? असा प्रश्‍नही विरोधकांनी उपस्थित केला आहे. या प्रश्‍नाचे समर्पक उत्तर सरकारला द्यावे लागेल. हे प्रकरण खरोखरच गांभीर्याने घ्यावे असेच आहे. असो; पण एक खंत अशी की, सरकार स्वतःच दारूच्या धंद्यांना उत्तेजन देत आहे. परवाने वाटून महसूल गोळा करण्यात धन्यता मानत आले आहे. अशा स्थितीत मद्यपींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आज घराघरात दारू पोहोचली आहे.  लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वच वयोगटांत मद्यपींची संख्या वाढत आहे. यामागील वास्तव असे की, दारूच्या व्यवसायांपासून मिळणार्‍या महसुलावर पाणी सोडायला सरकार तयार नाही. केंद्र आणि राज्य सरकारे मद्यांच्या व्यवसायातून मिळणार्‍या महसुलातून अनेक कल्याणकारी योजना चालवितात. एक नवल म्हणजे त्यात रुग्णालयांचाही समावेश आहे. एका बाजूने दारु धंद्याला उत्तेजन देवून आजार वाढवतानाच दुसर्‍या बाजूने आरोग्य योजना राबवल्या जात आहेत.  दारूमुळे होत असलेल्या प्रचंड सामाजिक नुकसानीची माहिती असूनसुद्धा सरकार दारूवर बंदी आणत नाही. उलट त्याला प्रोत्साहन दिले जात आहे. उदात्तीकरण केले जात आहे.  स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशभरात दारूची विक्री 60 ते 80 पटींनी वाढली आहे. दारूच्या विक्रीमधून सरकारला मोठ्या प्रमाणावर महसूल प्राप्त होतो, हे खरेच; पण अशा प्रकारच्या कमाईमुळे आपली सामाजिक व्यवस्था छिन्नविच्छिन्न होत चालली आहे. तसेच कुटुंबेच्या कुटुंबे बरबाद होत चालली आहेत. आपण वेगाने विनाशाकडे वाटचाल करू लागलो आहोत. आपल्या समाजात नशा ही नेहमीच वाईट गोष्ट मानण्यात आली आहे आणि समाजाने ते स्वीकारलेही आहे. सर्वाधिक नशा दारूचीच केली जाते. अनेक प्रकारच्या वाईट गोष्टींचे मूळ या दारूमध्येच आहे. दारू प्यायल्यामुळे विवेकाने विचार करण्याची माणसाची शक्ती कमकुवत होते. तो आपले भलेबुरे, हित-अहित कशाचाच विचार करू शकत नाही. दारू सेवन केल्यामुळे माणसाच्या शरीर आणि बुद्धीबरोबरच आत्म्याचाही र्‍हास होतो; पण त्याचे भान ना सरकारला ना दारुचे व्यसन करणारांना. आजच्या काळात आधुनिकतेच्या शर्यतीत श्रीमंतांपासून गरिबांपर्यंत आणि लहान मुलांपासून वयस्कांपर्यंत अनेकजण या सवयीचे जणू गुलामच बनले आहेत. एका सर्वेक्षणानुसार, आपल्या देशात दारिद्रयरेषेच्या खाली असणार्‍या कुटुंबांमधील जवळजवळ 37 टक्के लोक नशापान करतात. ज्यांच्या घरात खायला भाकरी नाही, अशा व्यक्तींचाही त्यात समावेश आहे. ज्या कुटुंबांकडे घरदार आणि कपडेलत्तेही नाहीत आणि दोन वेळच्या जेवणाची भ्रांत आहे, अशा कुटुंबातील कर्त्या व्यक्ती मजुरी करून जे कमावून आणतो, ती रक्कम दारूत उडवतो. या लोकांना आपल्या कुटुंबीयांचीही चिंता नसते. घरात खायला काही नाही, कुटुंबीय भुकेने तडफडत असतील, हेही त्यांना उमजत नाही. अशा लोकांची संख्या वेगाने वाढत चालली आहे. आपण दुःख विसरण्यासाठी दारू जवळ करतो, असे यातील बहुतांश लोक सांगतात. त्यांचे कुटुंब जेव्हा उपाशीपोटी झोपल्याचे पाहायला मिळते, तेव्हा त्यांचा हा तर्क किती आधारहीन आहे, हे स्पष्ट होते. युवकांमध्ये नशा करण्याच्या वाढत्या सवयीमुळे शहरी आणि ग्रामीण भागांत गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसते. दारूबरोबरच नशेच्या औषधांचाही उपयोग केला जातो आणि अशा युवकांकडून गुन्हेगारी कृत्ये घडतात. हिंसा, बलात्कार, चोरी, आत्महत्या अशा अनेक गुन्ह्यांमागे नशा हे मोठे कारण असल्याचे पाहायला मिळते. दारू पिऊन गाडी चालविल्यामुळे होणारे अपघात, विवाहित पुरुषांकडून नशेत पत्नीला होणारी मारहाण या नित्याच्या घटना झाल्या आहेत. या एकूण पार्श्‍वभूमीवर दारूबंदीसाठी अनेकदा आंदोलने झाली आहेत; परंतु सामाजिक, राजकीय जाणिवेच्या अभावी ही आंदोलने यशस्वी झाली नाहीत. समाजाच्या हितासाठी सरकारला दारूमुळे मिळणार्‍या महसुलाचा मोह टाळावा लागेल, अशी सज्जनांची अपेक्षा असतानाच आता  मंत्रालयातील उपहारगृहात दारूच्या बाटल्यांचा खच पडल्याचे आढळून आले आहे. त्यामुळेच राज्यभरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी चौकशीतून पुढे काय माहिती समोर येते, हे पाहायचे; पण मंत्रालयात खरेच दारूच्या पार्ट्या होत असतील, तर कठीण आहे. सर्वसामान्य जनता विविध प्रश्‍नांनी गांजली असतानाच मंत्रालयाला मदिरालयाचे रुप येणे, हे एका अर्थाने लोकशाहीचेच वस्त्रहरण केल्यासारखे आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा