घरोघरी महालक्ष्मींचे थाटात पूजन, आज होणार विसर्जन




बीड : रविवार रोजी प्रतिष्ठापना झालेल्या महालक्ष्मींचे (ज्येष्ठा-कनिष्ठा) सोमवारी 16 भाज्यांसह पंचपक्वान्नांचा नैवेद्य दाखवून पूजन करण्यात आले. आज मंगळवार रोजी गौराईंचे विसर्जन करण्यात येणार आहे.
गणपती पाठोपाठ आगमन झालेल्या गौराईच्या स्वागतासाठी घरोघरी लगबग सुरु होती. रविवारी घरोघरी गौराईंचे वाजतगाजत आगमन झाले. तर सोमवारी सकाळी मंत्रोच्चारांच्या सानिध्यात गौराईंचे मनोभावे पूजन करण्यात आले. 16 दाळी, 16 साळी, आघाडा, दुर्वा, पडवळ वाहून पुष्पहार घालून गौराईंना पुजण्यात आले. यानंतर 16 भाज्यांच्या नैवेद्यासह पंचपक्वान्नांनी गौराईंना नैवैद्य दाखविण्यात येऊन पुरणाच्या दिव्यांनी आरती करण्यात आली. यावेळी गौराईसमोर गहू, तांदळाची आरास मांडण्यात आली होती. तर खेळ-खेळणी, फुलांनी मखर सजविण्यात आले होते. सायंकाळी घरोघरी महालक्ष्मी कथा वाचन करण्यात आली. दोन दिवस पाहुणचार घेतल्यानंतर आज तिसर्‍या दिवशी गौराई निरोप घेणार आहेत. दरम्यान, आज तिसर्‍या दिवशी शहरवासी दिवसभर एकमेकांच्या घरी महालक्ष्मी दर्शनासाठी जात असतात. महिलावर्ग हळदी-कुंकू आयोजित करतात. तर सायंकाळी अक्षता टाकून महालक्ष्मींचे विसर्जन करण्यात येते.
संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा