परळीत ना. मुंडेंच्या वतीने दिवाळी स्नेहमिलन व फराळाचा कार्यक्रम संपन्न




महाविकास आघाडी सरकार मजबूत; विरोधकांना सर्व प्रकारे तोंड द्यायला सक्षम – धनंजय मुंडे

मी स्व. पंडित अण्णा मुंडे यांचा मुलगा; दिलेला प्रत्येक शब्द पाळणारच – धनंजय मुंडे यांनी दिला परळीकरांना शब्द 

परळी । राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार अत्यंत मजबूत स्थितीत आहे. राज्याचे पूर्वी मुख्यमंत्री व मंत्री राहिलेले अनुभवी या सत्तेत सहभागी आहेत. त्यामुळे विरोधकांचे सर्व डाव परतवून लावण्याची ताकत महाविकास आघाडी मध्ये आहे. विरोधकांना सर्व प्रकारे तोंड द्यायला आम्ही सक्षम आहोत, असे मत राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले आहे.

ना. धनंजय मुंडे व मुंडे कुटुंबियांच्या वतीने परळी मतदारसंघातील नागरिक व कार्यकर्त्यांसाठी येथील हालगे गार्डन येथे दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी ना. मुंडे बोलत होते.

ना. मुंडे बोलण्यापूर्वी मनोगत व्यक्त केलेल्या आ. संजय दौंड यांच्या वक्तव्याचा संदर्भ देत, धनंजय मुंडे म्हणाले की, अनेकांना माझ्यात स्व.गोपीनाथराव मुंडे साहेब दिसतात, असे म्हणतात, अनेकांना स्व.पंडित अण्णा मुंडे यांच्या स्वभावाचीही माझ्यात झलक दिसते. माझ्यात त्यांच्यापैकी कोणाची झलक दिसते कि नाही, हे माहीत नाही, मात्र स्व. पंडित अण्णा मुंडे यांचा मुलगा म्हणून इथल्या मातीतील लोकांना व कार्यकर्त्यांना दिलेला प्रत्येक शब्द मी पूर्ण करणार आहे.

नगर पालिकेची निवडणूक लागली तर समोरच्याना उमेदवार मिळतील की नाही?

दरम्यान परळी नगर पालिका ही आपल्यासाठी केवळ एक सत्ता केंद्र नसून इथल्या लोकांचे जीवनमान उंचावण्याचे ते एक माध्यम आहे. मी माझी स्वतःची विधानसभेची निवडणूक जितकी गांभीर्याने लढलो, त्यापेक्षा नगर पालिकेची निवडणूक अधिक गांभीर्याने लढणार आहे. मात्र इथे महाविकास आघाडी म्हणून लढताना समोरच्या विरोधी पक्षाला प्रत्येक वॉर्डात उमेदवार व बूथ वर माणसे देण्याची सुद्धा पंचाईत आहे, असा खोचक टोला ना.धनंजय मुंडे यांनी विरोधकांना लगावला.

*विमाही येईल आणि उसाचे गाळपही होईल काळजी करू नका*

दरम्यान बीड जिल्ह्यात मागील काळात झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले त्याअनुषंगाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या विशेष पॅकेज मधून 502 कोटी मिळाले. तर सोयाबीनचा अग्रीम विम्यापोटी 151कोटी मिळाले. पण मागील वर्षीच्या प्रलंबित साडेतीन लाख शेतकऱ्यांनाही पिकविमा मंजूर होऊन मिळेल, असा विश्वास ना.मुंडे यांनी उपस्थितांना दिला.

दुसरीकडे वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या ऊस गाळपास मागील एफआरपी थकवल्यामुळे गाळप परवाना नाकारला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना आपला ऊस कुठे पाठवायचा हा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र अंबासाखर कारखाना या महिन्याच्या शेवटी पर्यंत सुरू करत असून, परळी मतदारसंघातील एकही शेतकऱ्यांचा ऊस शिल्लक राहू देणार नाही, असा ठाम विश्वास ना. मुंडेंनी व्यक्त केला.

दरम्यान मागील काळात कोविड मुळे व त्याअनुषंगाने लावण्यात आलेल्या निर्बंधांच्या काळात अनेक सण उत्सव नागरिकांना आपापल्या घरात बसून साजरे करावे लागले. पण यापुढे कोविड नसेल तर दिवाळी स्नेहमिलनाचा हा कार्यक्रम दर वर्षी आयोजित करू असेही धनंजय मुंडे म्हणाले. यावेळी त्यांनी उपस्थितांना दीपावली व भाऊबीजेच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी आ. संजय भाऊ दौंड, ज्येष्ठ नेते दत्ता आबा पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. व्यासपीठावर आ. संजय दौंड, सौ. राजश्रीताई धनंजय मुंडे, माजी आ. पृथ्वीराज साठे, दत्ता आबा पाटील, राजकिशोर मोदी, जि. प. गटनेते अजय मुंडे, न.प. गटनेते वाल्मिक अण्णा कराड, शिवसेना जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव, सावता परिषदेचे अध्यक्ष कल्याण काका आखाडे, रा.कॉ.चे परळी तालुकाध्यक्ष लक्ष्मण तात्या पौळ, अंबाजोगाई तालुकाध्यक्ष ताराचंद शिंदे, ज्येष्ठ नेते सोमनाथ अप्पा हालगे, वैद्यनाथ कारखान्याचे उपाध्यक्ष नामदेवराव आघाव, रा.कॉ. परळी शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी, चंदूलाल बियाणी, दीपक देशमुख , पं. स. सभापती बालाजी मुंडे, उपसभापती जानिमिया कुरेशी, मार्केट कमिटीचे सभापती ऍड. गोविंदराव फड, राजेश्वर चव्हाण, माऊली मुंडे, घोडके, मानवी हक्क अभियानाचे मिलिंद आव्हाड, मंजूर शेख, डॉ नरेंद्र काळे, विष्णुपंत सोळंके , शकिल कुरेशी, माणिकभाऊ फडयांसह सर्व नगरसेवक, पदाधिकारी व परळीकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर गोविंद महाराज केंद्रे यांनी सूत्रसंचालन केले.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा