फारुख पटेल व अमर नाईकवाडे यांनी आमरण उपोषणाचा इशारा देताच सा.बां.विभाग ताळ्यावर




फारुख पटेल व अमर नाईकवाडे यांनी आमरण उपोषणाचा इशारा देताच सा.बां.विभाग ताळ्यावर

सहा दिवसात सुरु करणार विकास कामे

बीड l  शहरातील प्रभाग 3 मधील विप्रनगर परिसरातील काकुंचा मळा व पद्मा पार्क भागातील सिमेंट काँक्रीट रस्ता कामाची सुरुवात येत्या पाच ते सहा दिवसात करण्यात येणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी मंगळवारी (दि.18) नगरसेवक अमर नाईकवाडे व फारुख पटेल यांना लेखी पत्राद्वारे कळवले आहे. 26 जानेवारी रोजीचे नियोजित उपोषण करू नये अशी विनंतीही कार्यकारी अभियंत्यांनी लेखी पत्राद्वारे केली आहे.
याबाबत जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांना दि.3 जानेवारी रोजी गटनेते फारुक पटेल व नगरसेवक अमर नाईकवाडे यांनी लेखी निवेदन दिले होते. त्यात नमुद केले होते की, बीड जिल्हा नियोजन समिती अंतर्गत त्या-त्या शहरातील लोकसंख्येच्या निकषाप्रमाणे प्रत्येक नगर परिषदेला निधी वितरित केला जातो. या निकषाप्रमाणे बीड नगर परिषदेसाठी सन 2020-21 अंतर्गत 6 कोटी 47 लक्ष 98 हजार 521 रुपये निधी एक वर्षापूर्वी वितरित करण्यात आला होता. त्या अनुषंगाने नगरसेवक अमर नाईकवाडे यांनी बीड नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये प्रभाग क्र. 3 मधील विप्रनगर परिसरातील काकूंचा मळा व पद्मा पार्क या भागातील अंतर्गत रस्त्यांची कामे मंजूर करून घेतली होती. श्रेयवादातून निधीची पळवापळवी करत सत्तेचा दुरुपयोग करून सदरील बीड नगर परिषदेचा निधी स्थानिक लोकप्रतिनिधींनी सार्वजनिक बांधकाम विभाग बीडकडे वर्ग केला. निधी वर्ग करण्याबाबत आमचा काहीही आक्षेप नाही,विकास कामे ही नगरपरिषद करो अथवा सार्वजनिक बांधकाम विभाग,मात्र बीड शहरात गुणवत्तेची कामे होणे महत्त्वाचे आहे. परंतु विकास कामे अडवणार्‍या प्रवृत्तींवर आमचा आक्षेप आहे.
सदरील बीड शहरात होणारी विकासकामे अडवण्याच्या उद्देशाने निविदा प्रक्रिया जवळपास आठ महिने लांबली. सार्वजनिक बांधकाम विभाग बीडकडून निविदा प्रक्रिया तात्काळ पूर्ण करण्यात यावी यासाठी नगरसेवक अमर नाईकवाडे व पालिकेचे गटनेते फारूक पटेल यांनी दि 6 सप्टेंबर 2021 रोजी उपोषण केले होते. त्यानंतर निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. सदरील प्रकरण उच्च न्यायालयात गेल्यामुळे पुन्हा प्रभाग 3 मधील कामे थांबवण्यात आली. दीड महिन्यांपूर्वी कोर्टाचा निकाल लागूनही स्थानिक लोकप्रतिनिधीच्या दबावामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग बीडने मी प्रतिनिधित्व करत असलेल्या बीड नगर परिषदेच्या प्रभाग 3 मधील विप्रनगर परिसरातील काकूंचा मळा व पद्मा पार्क येथील सिमेंट रस्ता व नाली काम सुरू केलेले नाही. सदरील कामे सुरू करण्यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार पाठपुरावा करून देखील जाणीवपूर्वक कामे सुरू केलेली नाहीत. त्यामुळे 25 जानेवारीपर्यंत सदरील कामाला सुरुवात न झाल्यास प्रजासत्ताक दिनी म्हणजेच 26 जानेवारी रोजी मी व पालिकेचे गटनेते फारुख पटेल जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार आहोत असा इशारा दिला होता. अखेर या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभाग ताळ्यावर आला. विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी 18 जानेवारी रोजी प्रभाग 3 मधील विप्रनगर परिसरातील काकुंचा मळा व पद्मा पार्क भागातील सिमेंट काँक्रीट रस्ता कामाची सुरुवात येत्या पाच ते सहा दिवसात करण्यात येणार असल्याचे लेखी पत्र देत 26 जानेवारीचे आंदोलन मागे घेण्याची विनंती केली आहे. त्यामुळे आता प्रभाग क्र.3 मधील कामे मार्गी लागण्याच्या हालचालींना वेग आला आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा