कठीण काळातले सक्षम पालकत्व हा जिल्हा कायम ध्यानात ठेवेल!




कठीण काळातले सक्षम पालकत्व हा जिल्हा कायम ध्यानात ठेवेल!

 धनंजय मुंडे वाढदिवस विशेष !

घरातल्या लहान लेकराला शेजाऱ्याच्या लेकरसोबत खेळायला जायची सुद्धा परवानगी नाही, ना आपण जाऊ देणार, ना समोरचा घरात येऊ देणार…! कोविडच्या अशा निर्दयी संकट काळात एकीकडे घरात बसून करमत नव्हतं, गरिबाला परवडत नव्हतं पण शेवटी जीवपुढं काही मोठंही नव्हतं; म्हणून घरात बसून राहण्याशिवाय पर्यायही नव्हता! अशी विचित्र अवस्था जगात कधी कुणी पाहिली नसावी… ती तुम्ही-आम्ही पाहिली आणि जगली सुद्धा. कोविडची चाहूल लागली आणि भारत देश अचानक लॉक डाऊन करण्यात आला. कोणालाही याचा पूर्वानुभव नव्हता, कसलंही नियोजन माहीत नव्हतं! बस जशी परिस्थिती येईल तसतसा निर्णय घेत जायचं, असंच एकंदरीत शासकीय निर्णयांमध्ये होणारे बदल बघून दिसून येत होतं. महाराष्ट्रात-बीड जिल्ह्यात देखील फार काही वेगळी परिस्थिती नव्हती. वेगळा होता तो इथला पालकमंत्री, अगदी नवखा आणि काहींच्या मते अनुभव नसलेला – धनंजय मुंडे!

राज्यात सत्तांतर होऊन अवघे दोनच महिने झाले होते आणि नव्या सरकारने पहिला-वहिला अर्थसंकल्प मांडला होता. राज्याच्या वाढप्याचे जिल्ह्याच्या पालकांशी अत्यंत जवळचे सख्य असल्याने अर्थातच जिल्ह्याच्या पदरात मोठी घोषणा झाली होती. मात्र ते अधिवेशन संपायच्या आतच कोरोनाचा सर्वत्र शिरकाव झाला आणि जगाला कुलूप लागले. आरोग्य ते अर्थकारण सर्वकाही ढासळलं आणि कोरोना विषाणूची भीती सर्वत्र वाऱ्यापेक्षा वेगाने पसरली.

याच काळात धनंजय मुंडे या नवख्या पालकांच्या नेतृत्वात तरुण व धाडसी निर्णय घेणारी अधिकारी मंडळी वर्ग एकच्या लाईनीत आणून मुंडेंनी बसवली होती. रेखावार, पोद्दार अगदी विरोधी पक्षाचे मानलें जाणारे व बदली अपेक्षीत असताना सुद्धा परिस्थितीमुळे थांबवलेले डॉ. थोरात अशी टीम धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली सज्ज होती.

सुरुवातीला कोरोना जिल्ह्याच्या वेशिवरच अडवणे हे पहिले आव्हान या टीमने इतक्या सुंदर पद्धतीने हाताळले की त्याची चर्चा अगदी विदेशात सुद्धा झाली. प्रत्येक घटनेवर मुंडेंचं अगदी बारकाईने लक्ष असायचं. अगदी सविस्तर सांगायचं म्हणल्यास, एका प्रशासकीय बैठकीत, सगळीकडे तटबंदी असताना, बाहेरून लोक बीड जिल्ह्यात कसे येतात, अशी चर्चा सुरू असताना धनंजय मुंडे यांनी गोदावरी नदी पात्रातून चालत येणाऱ्या लोकांचे फोटो थेट एसपीना दाखवले! यात गमतीचा भाग नाही, तर तेव्हा परिस्थितीच तशी होती. एप्रिल 2020 मध्ये बीड जिल्ह्यातील सुमारे दीड लाख ऊसतोड कामगार राज्यात व राज्याबाहेर अडकले होते, त्या सर्वांना एक मोठी रोडलिफ्ट करून आपापल्या घरी सुखरूप पोहोच करण्याच्या मिशनचे नेतृत्व मुंडे साहेबानी लीलया पार पाडले. एकही दुर्घटना किंवा एकही कोविड पेशंट त्यात आढळला नाही म्हणून याला त्या काळाचे सर्वात यशस्वी स्थलांतर असे नाव बहाल करण्यात आले व त्याची दखल थेट न्यूयॉर्क टाइम्स ने घेतली!

कडक कायदा करून त्याची चोख अंमलबजावणी केल्याने त्याकाळात छोटे मोठे बंड व विद्रोह देखील घडले, अनेक टीका देखील झाल्या पण हे सगळं सर्वसामान्य माणसाला नव्या विषाणू पासून दूर ठेवण्यासाठी केलं जात होतं म्हणून मोठ्या मनाने पालकांनी त्या टीकांचं देखील स्वागत केलं. आमच्यावर टीका करा पण आमच्या कामात आडवे येऊ नका, नव्या सूचना करा, त्यांचं स्वागत करू पण प्रशासनाचे पाय खेचू नका, असं आवाहन ते त्या काळच्या ‘बंडखोरांना’ रोज करत!

एकीकडे तीन-चार महिने कोविडचा आकडा शून्यावर ठेवण्यात यश येत होतं तर दुसरीकडे हातावर पोट असलेल्या गरीबांचे हाल पाहवत नव्हते, अशी अवस्था होत होती. धनंजय मुंडे सकाळी 7 पासून आपले फोन समोर मांडून बसत. एके दिवशी फिरत्या भाजीपाला विक्रीला अधिकाऱ्यांनी परवानगी नाकारली म्हणून वांगी-मिरच्या-मेथी अशी मोठी पोती घेऊन काही शेतकरी व छोटे व्यापारी भेटायला आले, मीही तिथंच होतो. ते म्हणाले भाऊ “आम्हाला हा भाजीपाला विकायला परवानगी नाही, आता काय करावं?” भाऊंची अडचण अशी की, याना परवानगी द्यायला लावली तर जिल्ह्यात सगळीकडे द्यावी लागेल, जे परवडणार नव्हतं, भाऊ क्षणभर थांबले अन म्हणले, “असं करा हा सगळा भाजीपाला इथंच राहू द्या, आणखी कोणाचा असला तर तोही आना!” कोणालाच कळेना काय चाललंय. एकाने विचारलं, “साहेब, काय करायचंय?” भाऊ म्हणाले, “यांना आपल्याकडून बाजार भावाप्रमाणे पैसे देऊन टाका आणि गावाकडे जाऊद्या आपापल्या!”

पुढे शेतकरी आपला भाजीपाला बंगल्यावर आणून देत, तो धनंजय मुंडे विकत घेत आणि कोविड स्वयंसेवकांमार्फत गरजू कुटुंबांना मोफत वाटत! आठ दिवसात तब्बल 16 लाख रुपयांचा भाजीपाला विकत घेऊन मोफत वाटला गेला. हातावर पोट असलेल्या कुटुंबांचा विचार करून एक- दोन – तीन करत तब्बल 70 हजार कुटुंबांना महिनाभर पुरेल इतका किराणा किट तयार करून वाटला गेला हे सत्र देखील तीन-चार महिने सुरू होतं. त्यांच्या नेतृत्वात माणुसकी, धीरोदात्तपणा हा वडिलोपार्जित – उपजतच आहे.

जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून पुढे आव्हान होतं ढासळलेली शासकीय आरोग्य यंत्रणा सज्ज करण्याचं! राज्य सरकारने आगामी अर्थकारण लक्षात घेऊन आरोग्य विभागावर हवा तेवढा निधी टप्प्याटप्प्याने खर्च करण्यास परवानगी दिली होती. हीच संधी समजून मुंडेंनी एक एक मोठे शासकीय रुग्णालय सुसज्ज करण्यास सुरुवात केली. परळीवरून निघालो तर बीड पर्यंत एकही गाडी किंवा माणूस रस्त्यावर दिसणार नाही, अशा काळात एका महिन्यात 8 वेळा बैठका, पाहणी, रुग्णालयांना भेटी देऊन धनु भाऊ आरोग्य सुविधा निर्माण करण्यात गुंतले. त्यांनी अंबाजोगाईचे स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व ग्रामीण रुग्णालय, बीडचे जिल्हा रुग्णालय अशा ठिकाणी कोविड बाधित रुग्णांना पूरक सोयी उभ्या केल्या, शेकडो कोटींचा निधी उपलब्ध करून देत पीपीई किट पासून ते व्हेंटिलेटर पर्यंत व्यवस्था केल्या. जिल्ह्यात एकदा कोरोनाचा शिरकाव झाला आणि वरचेवर संख्या वाढतच गेली. कसे लढायचे याची डॉक्टरांना सुद्धा माहिती नसायची, लक्षणे पाहून उपचार, नवे प्रयोग अशी सुरुवातीची परिस्थिती होती. संशोधनही सुरू होते पण त्यात फारसे यश हाती लागत नव्हते. कडक लॉकडाऊन आणि त्यात वाढती रुग्ण संख्या अशा परिस्थितीत हळू हळू हे संकट भीषण होत गेले.

बेड कमी पडू लागले की अंबाजोगाईच्या जवळ उभारलेल्या मनोरुग्णालयात एक मोठे कोविड सेंटर उभारले जाऊ शकते, अशी कल्पना मनात आणून वीजजोडणी सह 17 दिवसात तिथं 1 हजार बेडचे मराठवाड्यातील सर्वात मोठं कोविड सेंटर धनंजय मुंडेंनी उभं करून दाखवलं! कोविडच्या पुढच्या टप्प्यात जेव्हा ऑक्सिजन साठी धावपळ सुरू होती, ऑक्सिजन वाचून उपचार सुरू असलेले रुग्ण दगावतील, अशी भीती बळावत होती तेव्हा विविध कंपन्यांकडून रात्रभर जागून ऑक्सिजन घेऊन येणाऱ्या वाहनांचे ट्रॅकिंग करणाऱ्या पालकमंत्री साहेबांना एक कल्पना सुचली;थर्मल पावर स्टेशन मध्ये थर्मलच्या चिमण्यांना थंडावा व पाणी शुद्धीसाठी वापरला जाणारा ऑक्सिजन प्लांट विस्थापित करून त्यातून रुग्णांना पूरक शुद्ध ऑक्सिजन निर्माण केला जाऊ शकतो! काही अधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन, प्रत्यक्षात हे शक्य आहे का हे तपासून ही संकल्पना 15 दिवसात सत्यात उतरवून दाखवण्याची किमया धनंजय मुंडेच करू शकतात! ऊर्जा व आरोग्य विभागाने या अभिनव संकल्पनेचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्पातील बंद ऑक्सिजन प्लांट रुग्णालयात शिफ्ट करून ऑक्सिजन निर्मितीची ही संकल्पना इतरत्र ठिकाणीही राबवली!

जिल्ह्यात ऍम्ब्युलन्स हव्यात दहा पाच नको, एकदाच पन्नास खरेदी, पोलिसांना वाहने हवीत एकदाच 200 मोटर सायकली, 25 जीप खरेदी करू, असे सक्षम व धाडसी निर्णय घेण्याची किमया या कठीण काळात धनंजय मुंडे यांनी साधली.

खाजगी डॉक्टर शासकीय सेवेत वेळ देण्याचे टाळतात या तक्रारीबाबतच्या एका बैठकीत त्यांना बोलताना मी ऐकलं, ते डॉक्टरांना हात जोडून विनवणी करत होते, “हे बघा हा कठीण काळ आहे. अशा प्रकारच्या विषाणूशी आपण पहिल्यांदा लढतो आहोत, कसं लढायचं हे डॉक्टर म्हणून फक्त तुम्हाला माहित आहे; त्यासाठी काय आवश्यक आहे ते आम्ही उपलब्ध करून देऊ, पण ते सांगूही तुम्हीच शकता! त्यामुळे इथं तुमचे सगळे कौशल्य व तुमचा सगळा अनुभव वापरून एक एक प्राण वाचवण्यासाठी तुम्ही आपलं योगदान देणे गरजेचे आहे. कारण प्रत्येकाचा जीव माझ्यासाठी महत्त्वाचा आहे आणि या काळात तुम्ही जे काम केलं आहे, कोविड काळाचा इतिहास जेव्हा लिहिला जाईल, तेव्हा बीड जिल्ह्याचे तारणहार म्हणून त्या इतिहासात तुमच्या नावांची नोंद असेल!”

एके दिवशी नव्या ऍम्ब्युलन्सची सिव्हीलला पूजा करताना काही नर्स बहिणी हातात बुके घेऊन समोर आल्या, “भाऊ आम्हाला आपला सत्कार करायचाय व फोटो घ्यायचाय!” तर भाऊ म्हणाले, “ताई इथं जीव धोक्यात घालून लोकांचे प्राण वाचवण्याचे काम तुम्ही करता, माझा कसला सत्कार, मी तुमचा सत्कार करायला हवा….!”हे वाक्य व हा स्वभाव त्यांच्यातील जबाबदारीची इतरांनाही जाणीव करुन देत असे.

पहिली, दुसरी, तिसरी अशा कोरोनाचा लाटेवर लाटा येत गेल्या शेकड्यावर बैठका, 115 ठिकाणी रुग्णालय भेटी, स्वतः 9 ठिकाणी सुरू केले मोफत कोविड केअर सेंटर यासह दोन वेळा स्वतः ला कोविड विषाणूची बाधा हा धनंजय मुंडे यांचा दोन वर्षांचा कार्यकाळ अगदी अंगावर काटा आणणारा होता.

मुंडेंच्या कोरोना हेल्प सेंटर मधून स्वतः धनंजय मुंडे यांच्या सहित सुमारे 22 लोक रात्रंदिवस पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना फोन करून तब्येतीची विचारपूस करत, त्यांना बेड, औषधोपचार, रेमडिसिव्हीर इंजेक्शन, आवश्यकतेनुसार ऑक्सिजन व तत्सम सोयी मिळण्यासाठी 24 तास प्रयत्नशील होत्या. अगदी विरोधी पक्षातल्या सुद्धा अनेकांनी चौकशीचे फोन आल्याच्या, बेड मिळवून दिल्याच्या, फुकट रेमडिसिव्हीर इंजेक्शन दिल्याच्या अनेक गोष्टी सांगितल्या. जवळपास सर्वांनाच ते माहीत व अनुभवात देखील असेल.

धनंजय मुंडे यांचे प्रमुख व्यवस्थापक सरसेनापती वाल्मिक अण्णा कराड यांच्याकडून मोफत इंजेक्शन मिळालेले अनेकजण आजही आवर्जून सांगतात. काहीवेळा तर रुग्णालयांना कमी पडल्यास सुद्धा मुंडेंनी इंजेक्शन पुरवले! न सहन होऊन एक जण तर यांना इंजेक्शन मिळतात कुठून यावर तिळपापड करून घेत होता! त्यांच्या परळी मतदारसंघात तर दुसऱ्या लाटेत ऍडमिट रुग्णांना जेवणापासून सगळंच धनंजय मुंडेंनी पुरवले. एरव्ही पेंडॉल टाकून बूथ सांभाळणारे त्यांचे शिलेदार आता एक एक दवाखाना सांभाळू लागले. महिला व लहान मुलांसाठी स्वतंत्र मोफत कोविड केअर सेंटर सुद्धा धनंजय मुंडे यांनी सुरू केले होते.

सामुदायिक विवाह सोहळे घेऊन हजारो मुलींचे स्वखर्चातून कन्यादान केल्याचे धनंजय मुंडेंबद्दल अनेकांना माहीत आहे. कोविड काळात असा उपक्रम घेणे शक्य नव्हते म्हणून त्यांनी कोविड बाधित कुटुंबांतील विवाहांना आर्थिक मदत करण्याचे ठरवले, बघता बघता त्यांनी 385 कुटुंबातील मुलीच्या विवाहासाठी प्रत्येकी 10 हजारांची रोख मदत केली; यासाठी नुसता माणूस नाही तर त्याचं मनही मोठं असावं लागतं! ‘नेकीं कर दरिया मे डाल’ या त्यांच्या स्वभावामुळे या गोष्टींचा जास्त गाजावाजा नसायचा!

याच काळात जिल्ह्यातील शेतकरी, सामान्य कष्टकरी, ऊसतोड कामगार या सर्वांचा गाडा बंद पडू नये यासाठीही धनंजय मुंडे पालकमंत्री म्हणून योग्य ते निर्णय घेत गेले. शेतकऱ्यांची तूर-हरभरा खरेदी करण्याची शासकीय केंद्रे बंद होती, ती सुरू व्हावीत म्हणून केलेल्या प्रयत्नांना यश येत नव्हते म्हणून लॉकडाऊन काळात थेट भोकरदन गाठून संबंधित खात्याचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या घरी जाऊन त्यांना ती केंद्रे सुरू करायला लावली. बीड जिल्ह्यात बंद पडलेला पीकविमा याच काळात पुन्हा सुरू केला. शेकडो कोटींचा विमा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळाला, 2020 च्या एक सत्रातील ऑनलाइन-ऑफलाईन घोळात अडकलेला विमा मिळवण्यासाठीही मंत्री पद पणाला लावून प्रयत्न केले, तोही विषय अंतिम टप्प्यात व नव्या सरकारच्या दरबारात आहे, अपेक्षा आहे की तो आकडाही मिळून जाईल!

21 मध्ये अतिवृष्टी कोसळली, हाहाकार माजला, एकदा दोनदा नाही तर 16 वेळा चिखल तुडवत दौरा करून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांचे अश्रू पुसले. अतिवृष्टीच्या मदतीतून राज्यात सर्वाधिक मदत सुमारे सव्वा सातशे कोटी रुपये बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळाले.

न्यायालयांना इमारतीसाठी, उपजिल्हाधिकारी कार्यालय, अंबाजोगाईचे आरटीओ कार्यालय, जिल्हाधिकारी निवास, ग्रामपंचत बांधकामासाठी, ग्रामीण रस्त्यांसाठी अशा अनेक कामांना मुंडेंच्या याच काळात शेकडो कोटींचा निधी मिळाला. जिल्हा नियोजन, ग्रामविकास, नगरविकास तसेच मुंडेंकडील सामाजिक न्याय खात्याकडून शेकडो कोटींचा निधी जिल्ह्यात आला. अनेक कामे झाली, अनेक प्रगतीपथावर आहेत. जिल्ह्यात पुरुषोत्तमपुरी या भगवान पुरुषोत्तमच्या एकमेव पण दुर्लक्षित तीर्थस्थळाचा धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री फ्लॅगशिप योजनेत समावेश करून 56 कोटी मंजूर करून आणले व असे करणारे ते बीड जिल्ह्याचे एकमेव पालकमंत्री ठरले. प्रत्येक तालुक्याच्या क्रीडा संकुलांसाठी जागा उपलब्ध करून दिल्या, आगामी काळात ही संकुले उभी राहतील, अशी अपेक्षा ठेवायला हरकत नाही.

मराठवाड्याचे मुक्त झालेले 19 टीएमसी पाणी, नव्याने पाणी उपलब्धी मिळालेले 28 लघु व मध्यम प्रकल्प यांचीही या काळात मुंडेंनी वाट मोकळी केली. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून एका आर्थिक वर्षात 500 पेक्षा अधिक किलोमीटर रस्त्यांना निधी मिळण्याची देखील अप्रूप घटना पाहता आली. पर्यटन विभागाकडून बीड जिल्ह्यात कोट्यावधी निधी येऊ शकतो हेही आम्हाला धनंजय मुंडेंनी दाखवून दिलं. आम्हाला अगदी पहिल्यांदाच मंत्रिपद मिळालेले पालकमंत्री मिळालेत, असं कधी जाणवलंच नाही, कमी पडला तो फक्त कार्यकाळ!

धनंजय मुंडे हे एक व्यक्ती म्हणून किती धीरोदात्त, निर्भीड, निर्णयक्षम आहेत हे माहीतच होतं मात्र एका जिल्ह्याचे पालक म्हणून काम करताना कोविड सारख्या शत्रूशी फोन हात करताना त्यांना प्रथमच पाहिलं. कधी न पाहिलेला हा शत्रू, त्यात त्याच्याशी कसं लढायचं, हे कोणालाच माहीत नव्हतं, तितकं बळ देखील अंगात नव्हतं, पण अनुभवातुन आणि सक्षम निर्णय क्षमतेतून ही लढाई पार पडली. नुकसान झाले, आजूबाजूचे अनेक लोक आपण गमावले, पण कदाचित पालकमंत्री साहेबांमुळे कमी प्रमाणात नुकसान झाले, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. या काळात लोकाभिमुख निर्णयांची अडसर झालेले आप्तस्वकीय, विश्वाज्ञानी विरोधक अशा अनेकांचा त्यांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सामना केला, कोरोनाचाही दोनदा सामना केला, पण कधीच मागे वळून पाहिले नाही, मुळात तो त्यांचा स्वभावही नाही.

*”मी प्रत्येक वादळ पेलीन, माझा आत्मविश्वास आहे, माझ्या पायाशी जमीन अन पाठीशी आकाश आहे…”* असा स्वभाव घेऊन आव्हानांना लीलया पेलवणाऱ्या लाडक्या नेतृत्वास जन्मदिनामित्त हृदयपूर्वक शुभेच्छा!

© सुधीर सांगळे, बीड

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा