माहिती अधिकाऱ्याच्या प्रभावी वापरातून ग्राम विकासाची क्रांती होऊ शकते




माहिती अधिकाऱ्याच्या प्रभावी वापरातून ग्राम विकासाची क्रांती होऊ शकते- अँड. अजित देशमुख

कडा l  माहिती अधिकार हे अत्यंत प्रभावी शस्त्र आहे. या शस्त्राचा वापर झाला तर ग्राम विकासात क्रांती घडून येऊ शकते. गावात आलेल्या पैसा गावात खर्च करायचा असेल तर त्यासाठी पारदर्शकतेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ समाज सेवक मा. अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचे विश्वस्त अँड. अजित एम. देशमुख यांनी केले आहे.

धानोरा ता. आष्टी येथील जनता महाविद्यालयात “माहिती अधिकारातून व्यवस्था परिवर्तन” या विषयावर अँड. देशमुख मार्गदर्शन करत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव विजयकुमार बांदल हे होते. तर प्राचार्य के. डी. चव्हाण सर, जन आंदोलनाचे तालुकाध्यक्ष रणजीत चव्हाण, उप प्राचार्य गव्हाणे, तालुका सचिव प्राध्यापक अजित इथापे यांची प्रमुख उपस्थिती होती.

भ्रष्टाचाराने विकास कामाला गळती लागली आहे. आज प्रत्येक गावात वर्षाला वर्षाला कोट्यावधी रुपये येतात, मात्र याकडे जनतेचे लक्ष नसल्यामुळे भ्रष्टाचार वाढत आहे. याचा परिणाम सामान्य लोकांना भोगावा लागत असून जनतेच्या योजना हिरावून घेतल्या जात आहेत. त्यामुळे नागरिकां बरोबरच विद्यार्थ्यांनी दक्ष राहणे आवश्यक आहे, असे ही ते म्हणाले.

स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिले. मात्र त्यांच्या बलिदाना विषयी आज आत्मीयता राहिलेली नाही. समाजात स्वतःचे हक्क आणि कर्तव्य मिळावेत, यासाठी भांडण्याची जागरूकता देखील राहिलेली नाही. केवळ या बाबीचा गैरफायदा घेत भ्रष्टाचारी लोक देशातील पैसा लुटून खात आहेत. शासन आणि प्रशासन देखील त्यात संगणमताने सहभागी होत असल्याचे बरेच ठिकाणी दिसते. याला रोखण्यासाठी युवकांनी सक्रिय होण्याची आवश्यकता आहे.

अँड. देशमुख पुढे म्हणाले की, दिवसें दिवस वाढत असलेल्या भ्रष्टाचारावर माहिती अधिकारातून नियंत्रण राखता येऊ शकते. महत्त्वाच्या कामाची माहिती घेतली, तर मोठ-मोठे विकास कामे पारदर्शकतेने होतील. जनतेला कोणते काम कसे करायचे आहे ? याची माहिती झाल्यानंतर त्या कामावर नियंत्रण देखील ठेवता येईल. गावात येणारा कोट्यावधींचा पैसा गावातच खर्च झाला पाहिजे. कामे पारदर्शक झाली पाहिजे. यासाठी माहिती अधिकार प्रभावी शस्त्र म्हणून वापरले गेले पाहिजे, असे ही ते म्हणाले.

संस्थेचे सचिव बांदल सर, प्राचार्य चव्हाण सर यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक प्राध्यापक पवार यांनी केले तर आभार प्रदर्शन बापू कर्डीले यांनी केले. यावेळी महाविद्यालयाचे प्राध्यापक आणि सर्व कर्मचारी त्याच प्रमाणे विद्यार्थी आणि विद्यार्थिनींची मोठी उपस्थिती होती.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा