अहमदनगर ते आष्टी रेल्वेच्या शुभारंभास धनंजय मुंडेंनी दिल्या शुभेच्छा !




 

परळीच्या बाजूनेही अधिक वेगाने काम सुरू ठेवावे – धनंजय मुंडेंनी केली मागणी

स्व. गोपीनाथराव मुंडे, स्व. विलासराव देशमुख तसेच बीड रेल्वे कृती समितीचेही मानले आभार!

*महाविकास आघाडीने गत तीन वर्षात समप्रमाणात निधी दिल्याचीही करून दिली आठवण*

परळी (दि. 23) – सबंध बीड जिल्हा वासीयांच्या जिव्हाळ्याची व अनेक वर्षांची मागणी असलेल्या अहमदनगर-बीड-परळी या रेल्वे मार्गावर अहमदनगर ते आष्टी अशी डेमो रेल्वे आजपासून धावणार असून, याचा शासकीय उद्घाटन समारंभ आज पार पडतो आहे, या कार्यक्रमास माजी मंत्री आ.धनंजय मुंडे यांनीही शुभेच्छा दिल्या आहेत.

केंद्रात ज्येष्ठ नेते सुरेश प्रभू रेल्वे मंत्री असताना अहमदनगर बीड परळी या 261 किमी रेल्वे मार्गाचे काम नगर व परळी अशा दोनही बाजूंनी व समान वेगाने सुरू ठेवावे अशी मागणी आम्ही केली होती, त्यानुसार कामही सुरू झाले मात्र मधल्या काळात परळीच्या बाजूने सुरू असलेल्या कामाचा वेग मंदावला असून, या बाजूनेही अधिक वेगाने काम पूर्ण केले जावे, अशी अपेक्षा धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान 261 किमी अंतराच्या या एकूण प्रकल्पापैकी अहमदनगर ते आष्टी या 66 किमी अंतरावर आजपासून डेमो रेल्वे धावणार असून, बीड जिल्हा वासीयांच्या स्वप्नपूर्ती कडे हे एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे. यावेळी या रेल्वे मार्गाच्या उभारणीसाठी महत्वपूर्ण योगदान दिलेले स्व. गोपीनाथराव मुंडे, या प्रकल्पाला केंद्राच्या समप्रमाणात राज्याचा 50% हिस्सा देण्याचा निर्णय घेणारे तत्कालीन मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख, सुरुवातीच्या काळात केंद्र स्तरावर सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या तत्कालीन खासदार स्व. केशरकाकू क्षीरसागर, त्याचबरोबर रेल्वे साठी जनआंदोलन लढणारी बीड रेल्वे कृती समिती त्यातील सर्व सदस्य या सर्वांचेच यानिमित्त स्मरण होत असल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

धनंजय मुंडे यांनी याबाबत एक ट्विट केले असून, मागील तीन वर्षांच्या काळात महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना केंद्राच्या सम प्रमाणात 50% प्रमाणे महाविकास आघाडी सरकारने देखील या प्रकल्पास आवश्यक निधी उपलब्ध करून दिल्याची आठवण करून दिली आहे. मार्च 2022 अखेर पर्यंत केंद्राच्या आराखड्यात प्रस्तावित करण्यात आलेली 50% राज्य हिश्श्याची सर्व रक्कम या प्रकल्पास वितरित करण्यात आली होती.

जून 2022 मध्ये केंद्र सरकारने या प्रकल्पाचा दुसरा सुधारीत आराखडा तयार केला असता, महाविकास आघाडी सरकारने 50% च्या प्रमाणात ठरल्या सूत्राप्रमाणे निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय महाविकास आघाडीच्या अखेरच्या कॅबिनेट बैठकीत घेतला होता व तोच निर्णय आजही कायम असल्याचीही धनंजय मुंडे यांनी आठवण करून दिली आहे.

दरम्यान संपूर्ण अहमदनगर बीड परळी हा रेल्वे मार्ग जलद गतीने पूर्ण केला जावा, तसेच परळीच्या बाजूने या प्रकल्पाच्या कामाची गती अधिक वाढवावी, अशी मागणी या निमित्ताने धनंजय मुंडे यांनी केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे, केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड, हे यापुढील काळातही केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीने बीड जिल्हा वासीयांच्या या स्वप्नपूर्तीसाठी आवश्यक तो निधी देतील व गतीने कारवाई करतील अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा