भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री क्षेत्र गुगळादेवी देवस्थान




भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री क्षेत्र गुगळादेवी देवस्थान

बीड

तालुक्यातील श्री क्षेत्र गुगळादेवी देवस्थान बालाघाट डोंगररांगाच्या पूर्व-पश्चिम पसरलेल्या उत्तरेकडील शेवटच्या रांगेवर पूर्वाभिमुख असलेले एक अप्रतिम हेमाडपती मंदिर एका निवांत निसर्ग सौंदर्य लाभलेल्या भागात वसलेले आहे. बीड या जिल्ह्याच्या ठिकाणापासून अवघ्या 20 की.मी.अंतरावर असलेले हे मंदिर खरोखरच एक संशोधनाचा विषय आहे. ग्रामीण भागातील प्रेक्षणीय स्थळ नेहमीच विकासापासून वंचित असतात कारण त्यांना पाहिजे त्या प्रमाणात सोई सुविधा मिळत नसल्याने पर्यटक लाभलेला नसतो.
मुंबई-पुण्यापासून शेकडो मैलावर असणारी परंतु त्या त्या शहराला जोडली गेली असल्यामुळे तेथील स्थळाला विशेष महत्त्व प्राप्त झालेले असते. याउलट जिल्ह्यातील अनेक प्रेक्षणीय स्थळ गैरसोयीच्या अंधारात वर्षानुवर्ष पडून असतात. या स्थळांना पाहिजे त्या प्रमाणात न्याय मिळत नाही की तेथे साधी एसटी बसची सुविधा देखील उपलब्ध होत नाही.
बीड पिंपळनेर-नाथापूर-कुक्कडगाव-रंजेगाव-केसापुरी परभणी आदि गाड्याने ईट फाट्यावर उतरल्यानंतर अंदाजे दोन किलोमीटर पायी किंवा खाजगी प्रवासी वाहतुकीने गेल्यानंतर आपण मंदिराच्या पायथ्याशी पोहोचतो.
पुरातन पद्धतीच्या पायऱ्यांना नवीन विकसित करून बांधकाम असलेल्या सुमारे 100 पायऱ्या चढून गेल्यानंतर पूर्वाभिमुख दगडी दरवाजातून आत गेल्यावर उत्तराभिमुख भव्य 16 खांबी दगडी सभा मंडप असलेले मंदिर आहे. हे सर्व खांब अखंड दगडाचे एक एक अशी असून मंदिरालाही 16 कोण आहेत. सभा मंडपात प्रवेश करताच समोर विघ्नहर्ता गणेशाची मुष्कारुड मूर्ती दिसते. अशा प्रकारची उंदीरावर बसलेली गणेशाची मूर्ती याठिकाणी दिसते,बहुतेक ठिकाणी उंदीर हा समोर लहानशा आकारात असतो.
मंदिर प्रवेशानंतर प्रथम पहावयास मिळतो तो भव्य असा दगडी नगारखाना.देवीच्या गाभाऱ्यात प्रवेश प्रामुख्याने एका छोट्याशा दगडी प्रवेशद्वारातून नतमस्तक होऊन करावा लागतो. मातापुर (माहूर)चे हे ठाणे असल्यामुळे इतरत्र असणाऱ्या शेंदूर लावलेल्या भव्य-दिव्य मूर्ती सारखीच एका नक्षीदार तीन फुटी चौरस दगडी चौरंगावर विराजमान झालेली भव्य मूर्ती पाहावयास मिळते.
देवीचे दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर स्मरणात राहणारी बाब म्हणजे मंदिराचे दगडी बांधकाम व त्याची आकर्षक सजावट. पूर्व पश्चिम असा डोंगर उत्तरेकडील मजबूत चिरेबंदी भिंत.यामध्येच मंदिराची सुरक्षितता आहे.तटास दोन भक्कम बुरुज असून मधोमध दीपमाळ आहे जी देवीच्या समोरा समोर येते. पुरानामध्ये पुराण कथेनुसार याच दीपमाळेवर कापसाची दीप लावून गंगेकाठापर्यंतचा परतीचा प्रवास करत. मंदिराच्या पूर्वेस एक गाय वाडा आहे तो पडलेल्या अवस्थेत असून त्यामध्ये देवीच्या साधकांच्या समाधी आहे. त्यातील एक समाधी तर चमत्कारच दाखवून देते.त्या समाधी जवळ एक भले मोठे लिंबाचे झाड आहे.त्यातील जी एक फांदी त्या समाधीवर आहे त्या फांदीचा पाला गोड लागतो बाकी त्या सर्व झाडाच्या फांद्याचा पाला हा लिंबाच्या गुणधर्मा सारखा कडूच लागतो.त्यामुळे याला कोणी श्रद्धा म्हणा किंवा अंधश्रद्धा परंतु ते एक सत्यच आहे.
मंदिराच्या परिसरात तीन भुयारे असून त्याची लांबी व शेवट अध्यापपर्यंत कोणालाही समजू शकलेला नाही.पश्चिमेकडे नजर टाकल्यास दूरवर तलावाचे विहंगम निसर्ग सौंदर्य पहावयास मिळते.त्याबरोबरच मंदिराच्या उत्तरेकडील भागात लावलेली झाडे मंदिर परिसराची शोभा आणखीनच वाढवतात.
श्री क्षेत्र गुळादेवी देवस्थानचे नाव हे प्रामुख्याने पुरातन काळी त्या परिसरात गुगळाच्या विविध वेली मोठ्या प्रमाणात होत्या. ज्या वेलीला स्पर्श केल्यानंतर किंवा कुठल्याही आजाराला त्याचा रस लावल्यानंतर आजार बरा होत होता अशी आख्यायिका सांगितली जाते.त्यामुळे देवीचे नाव हे गुगळादेवी असे प्रचलित झाले.
पंचक्रोशीतील भाविक भक्ताचे गुगळादेवी देवस्थान हे श्रध्दास्थान आहे.देवीचे नित्याने साजरे करण्यात येणारे उत्सव हे साधारणतः चैत्र पौर्णिमेला यात्रा उत्सव व नवरात्र उत्सव आदि उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात.पंचक्रोशीतील भाविकांची या देवस्थानावर श्रद्धा असल्यामुळे नव वधू-वर देवीचे दर्शन घेऊनच आपल्या वैवाहिक जीवनाची सुरुवात करतात.
श्री क्षेत्र गुळादेवी या देवस्थानाला तीर्थक्षेत्र योजने अंतर्गत “क”वर्गीय दर्जा प्राप्त असून या योजनेअंतर्गत शौचालय बांधकाम, पाणीपुरवठा,संरक्षण भिंत,भक्तनिवास आदी कामे करण्यात आली. तर भाविकांच्या मदतीने सभामंडप आणी मंदिर परिसरातील फरशी काम केले आहे.
येथे येणाऱ्या भाविक भक्तांची गैरसोय ही जास्तीत जास्त करून खराब रस्त्यामुळे होताना पहावयास मिळते.प्रामुख्याने गाव तिथे रस्ता,वीज, पाणी आणि एसटी या शासनाच्या धोरणाची अंमलबजावणी झाली तर निश्चितच अशी प्रेक्षणीय स्थळ विकास पासून वंचित राहणार नाहीत.


लक्ष्मण नरनाळे ईट बीड
9422743777

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा