उगाच चिंता करून प्रश्न सांगा सुटेल हे ?




सोडून देऊ
उगाच चिंता करून
प्रश्न सांगा सुटेल का?
जाळणाऱ्या विचारांचे काहूर
आपोआप सांग मिटेल का
चिंता आतून जाळत असते. ती नुसती जाळत नाही तर वेळ, विचार, शरीर,नैसर्गिक भावभावना या सर्वांचीच हानी करत असते.उगाच हरवून बसतो त्याच त्या विचारात. नको म्हटलं तरी तेच वर्तुळ परत फिरत राहते भोवती. नको वाटतं मनाला. कोणीतरी भेटावं वाटतं समजावून घेणारं.नकोस चिंता करू मी आहे ना! असं म्हणणारं.पण अशी माणसं भेटणं फार कठीण असतं. कारण ज्याला त्याला आपलंच दुःख, त्रास, वेदना मोठया वाटत असतात. कारण काही मर्यादेपर्यंतच आपलं विश्व आपणच तयार केलेलं असतं. त्याच वलयातील परिस्थिती, व्यक्तीच आपण पाहत असतो. दुसऱ्याचा हात मदतीसाठी मागत असतो. त्यापेक्षा मनातील चिंता सोडून देऊ.समोर आलेल्या परिस्थितीचा हसतमुखाने सामना करू .
जीवन जगत असताना अनेकदा टेच लागत असते. ती कधी सावध करते तर कधी भळाभळा रक्त वाहते त्यातून. टेच मलाच का लागली ? मीच काय केले होते. याचं उत्तर जरी आपल्याकडे नसलं तरी का लागली हे स्वतःच्या आत मध्ये डोकावून पुढच्या वेळी मात्र सावधपणे पाऊल टाकता यायला हवं.
आपली तुलना इतरांशी करून काहीच उपयोग होत नाही.मी एवढा कष्ट करून मी इथेच राहिलो तो तेवढा मोठा झाला.
माझ्यापेक्षा ती दिसायला सुंदर, त्याचच सगळीकडे कौतुक होतं.
अश्या विचारांची मालिका सतत डोक्यामध्ये चालू असते त्यामुळे आहे त्या परिस्थितीचा आनंदही आपल्याला घेता येत नाही. सुखाचे क्षण हळुवार आपली जागा सोडतात. स्वतःच दुसऱ्याशी तुलना करून सुंदर क्षण मात्र हरवून बसतो. उगाच दुःखाचे भांडवल करत राहून काहीच कोणावर फरक पडत नाही.तेंव्हा इतरांशी तुलना करणे सोडून देऊ.
नको त्या मोहाच्या मागे लागून आपल्या जवळची माणसं आपण गमावून बसतो.त्यांच्या जवळ मन मोकळं करावं,की त्यांच्या मनात काय चाललंय ते जाणावं असं कधी वाटतच नाही.कुठे जातात ही आपल्याला सोडून असं स्वतःचच मत बनवून बसतो.आपल्याच धुंदीत आपलं जगणं असं काहीसं होऊन जातं. पण खरंच कठीण वेळ येते तेंव्हा आपल्याला त्यांची गरज वाटायला लागते.ती जवळ यावीत असं जरी वाटत असलं तरी ती खूप दूर गेलेली असतात.तेंव्हा योग्य वेळी सावध होऊ.त्यांनाही थोडं प्रेम देऊ, समजावून घेऊ स्वतःच्या मस्तीत जगणं सोडून देऊ.
खरंतर घेण्यासारखं बरंच काही असतं. सोडून देण्यासारखं थोडंच असतं. पण होतं मात्र उलटच.नको तेच धरून बसतो.तो किंवा ती मला असे वाईट का बोलली.त्याचा सन्मान केला माझा नाही. माझ्यात काय कमी आहे .यासाठी कित्येक तास, दिवस विचार मनात घोळवत असतो.नुसते घोकून भांडून तरी काहीच मिळत नाही. फक्त होतो मनस्ताप. आजूबाजूला असणारी माणसं, पुस्तकं, निसर्ग खूप काही शिकवतअसतो. सुंदर जगायचं कसं हे सोपं करून राहतो. पण आपण डोळसपणे पाहतच नाही. माझंच खरं म्हणत म्हणत आयुष्याची संध्याकाळ जवळ येते. चूका कळल्या तरी सुधारायला संधी मिळेल का हे सांगता येत नाही. पटलावर डाव नव्याने मांडावा म्हटलं तरी वेळ संपलेली असते. जीव तिथंच चडफडत,धडपडत राहतो. काहीच उपयोग होत नाही.
योग्य वेळी सावध होऊ. जीवनाचा वआनंद भरभरून घेऊ आणि देऊ.
घडीचा नाही भरवसा
तू आधी जाण रे
सोडून जायचे इथेच सारे
कशाला हवा मान रे

तुझं माझं करता करता
तू मात्र वेडा होशील
समोर वाढलेलं ताठही
दुसऱ्याच्या हाती देशील.

लेखिका-©रंजना सानप
मायणी (सातारा)

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा