प्रेम कवितांचा खजिना आहे “आत्मफुले” कवितासंग्रह




प्रेम कवितांचा खजिना आहे “आत्मफुले” कवितासंग्रह

“आत्मफुले” कवितासंग्रह
कवयित्री : सौ. राजश्री निरज बोहरा
डोंबिवली

परीक्षण – श्री राम नेमाडे (सुप्रसिद्ध साहित्यिक)

एका कार्यक्रमाचे निमंत्रण द्यायला आल्या असताना सौ. राजश्री यांनी मला त्यांचा ” आत्मफुले ” हा कवितासंग्रह भेटस्वरूप दिला व अपेक्षा व्यक्त केली की मी माझा अभिप्राय कळवावा. त्यांच्या आग्रहावरून मी त्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या ‘ ५ वे सावित्रीबाई फुले साहित्य संमेलन ‘ या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून हजेरी लावली. राजश्री ह्या पेशाने शिक्षिका असून पिण्डाने साहित्यिका आहेत.
” आत्मफुले ” कवितासंग्रह वाचायला घेतला तेव्हा त्याच्या मनोगतात त्यांनी लिहिलेलं ‘ काव्यलेखन ही खरोखरच एक प्रतिभा आहे ‘ हे वाक्य मला आवडलं. प्रतिभेला कल्पनेचे पंख फुटले की काव्य आपसूक झरू लागते. या कविता संग्रहाला योगिनी गाडे वाघमारे (सुप्रसिद्ध साहित्यिक) यांची सटिक प्रस्तावना लाभली आहे. कवयित्रीच्या काव्यलेखनासंदर्भात त्यांनी एक सुंदर विधान केले आहे – ‘ नवपरिणीत वधूने जसा शृंगाराचा साज चढवावा तसा कवयित्रीच्या शब्दकळांनी काव्यरचनेत तो चढविला आहे.’ ही कवयित्रीला मिळालेली प्रशस्ती म्हणावी लागेल.
” आत्मफुले ” कविता संग्रहात एकूण ६१ कवितांचा समावेश आहे. यात नातेसंबंध, निसर्ग, प्रेमभावना, सामाजिक जाण, प्रासंगिक प्रश्न अशा नानाविध विषयावर कविता लेखन केले आहे. कवितांची बहुसंख्य शीर्षके एकशब्दी आहेत. काही दोन शब्दी तर अत्यल्प तीनशब्दी व एखाद चार शब्दी. कवयित्री अध्यात्मवादी असल्याने ‘ आले तुझ्या चरणी ‘ या
गुरूभक्तीविषयक पहिल्याच कवितेत त्या म्हणतात—-
‘ _तूच पाठीराखा माझा तूच माझा भगवंत_
_तुझ्या पदरी झिजून जावा तुच्छ देह ही हा माझा ‘_
कविता संग्रहाचे शीर्षक संग्रहातील एखाद्या कवितेचे शीर्षक
म्हणून स्वीकारण्याचा बहुतेकांचा कल असतो. कवयित्रीने संग्रहातील दुसरी कविता–‘ आत्मफुले ‘ ला पसंती देऊन तेच शीर्षक पसंत केले असावे. त्या लिहितात—
‘ _स्वत्व माझे शोधताना मी मला नवखी कळे_
_ठाव घेता अंतरीचा जुळली ही आत्मफुले…’_
‘ भास्कर ‘ तिला तमाचा हर्ता, पालनकर्ता व जीवाचा त्राता
वाटतो.’ रजनीकांता ‘ या कवितेत ती म्हणते–‘
_तू अविरत असाच सोबत रहा_
_तेजस्वी शुभ्र चांदण्याची गरज आहे ‘ तर_
‘ शशिकांत ‘ या गीतात अलविर शब्दांत ती लिहिते–
‘ _तिमिरास हरे गगनास छेदूनी रात_
_रसिक हा प्रियकराचा नाथ ‘_
कवयित्रीचे ग्रहताऱ्यावल प्रेम यांतून स्पष्टपणे जाणवते.
‘ बाबा ‘ व ‘ आई ‘ ही सर्वात जवळची जिव्हाळ्याची नाती !
बाबा जगण्याची उमेद व लढण्याचे बळ देतात तर आई
‘ संकटातूनबाहेर पडण्यास शक्ती देते. ‘ आईपण ‘ हा अनुभव
प्रत्येक स्त्रीसाठी अनमोल उपहार आहे. मूल जन्माला आल्यावर आईला होणारा आनंद खरे तर शब्दांत मांणणे कठीण. हा क्षण टिपताताना कवयित्री लिहिते—
‘ _किलकिल्या डोळ्यांनी पाहिलेस तू मला_
_आईपण हे दाटून आले दुग्धधारेतून उरा_ ‘
,’ प्रीत ‘, ‘ प्रेमलता ‘ कवितांतून प्रेम उर्मी, स्पर्श, उन्माद आदींच्या स्मृती चाळविणाऱ्या कविता आहेत.
‘ घेशील का?’ हा प्रेयसीने प्रियकराला विचारलेला लडीवाळ
प्रश्न आहे. ती त्याच्याकडून कबूली मागताना विचारते–(
‘ _माझे मी पण हरवून गेले_
_तव प्रमाने बहरून आले_
_घेऊन हात हातात माझ्या_
_ओळख आपली देशील का? ‘_
‘ मला ही वाटतं ‘,’ आता मी ही होणारच ‘,’ कैफात ‘ ह्या कविता प्रेम रसात ओतप्रोत भिजल्या आहेत. प्रेम मिलनाचे अनूभव त्यांत साकारले आहेत.
‘ मदनाची बाधा ‘ प्रेयसीला प्रियकराने दिलेल्या उपहारातून, प्रियकराच्या स्पर्शातून, त्याच्या आलिंगनातून होत असते. तिचे सर्वांग मोहरून जाते.ती हा अनुभव हळुवारपणे सांगते–
‘ _केसात माळता गजरा तू असाच सायंकाळी_
_मदनाची बाधा मजला, होई त्या कातरवेळी_
‘ फुंकर ‘, ‘ अंतरीची प्रीत ‘ह्या कविताही वाचनीय आहेत. रसिकांनी त्या अवश्य वाचाव्यात.
‘ प्रतिबिंब ‘ या कवितेत कवयित्रीने प्रेमाचं प्रतिबिंब कोठे कोठे व कोणत्या रूपात उमटत हे सोदाहरण सांगण्याचा प्रयत्न केला आहे. ही एक सुंदर व कव्यगुणात्मक कविता आहे. पुढील कडव्यात प्रतिबिंब केले आहे…..
‘ _चांदण्याची भरली होती जत्रा_
_सतरंगांची मैफल सजलेली_
_सात – सुरांची आरास मी करता_
_गाण्यात तुझं प्रतिबिंब उमटलं ‘_

‘ कळत नकळत ‘ या कवितेत जीवनात जे काही भलेबुरे घडते ते कळत नकळतच घडत असते. पुढील ओळी बघा….
‘ _प्रांजळ आणि हळुवारपणे_
_जीवनात प्रेम घडते तेही कळत नकळत_ ||
‘ गुज ‘ कवितेत कान्हानेच तिच्या मनाला नाद लावला. त्याच्या लीला अगाध आहेत. तो मनकवडाही आहे…
‘ _दह्या-दुधाची रास फोडतो गोपिकांची हा छेड काढतो_
_गोप-सख्यासह रमून जातो खेळ खेळतो वृंदावनी ||_
‘ मिलनाची ओढ ‘,’ स्वप्नातल्या कळ्यांना ‘,’ कधी वाटते ‘,
‘ स्वाधीन ‘ ह्या कविताही कवयित्रीच्या मनातील खूप काही सांगून जातात.’ मन ‘ कवितेत मनाची डावाडोल अवस्था वर्णन करताना मन कधी कधी भीतीग्रस्त होते. ती म्हणते….
‘ _पण…भीती वाटते मनाला स्वप्नभंग होण्याची_
_वाळूत बांधलेलं घर लाटेसरशी विरण्याची ||_
‘ पोरका ‘ ही कविता अर्ध्यावाटेवर पतीला सोडून गेलेल्या पतीची भाव अवस्था सांगते व त्याला आलेले पोरकेपण
सूचित करते. तो म्हणतो.. _आज पोरका जाहलो_ !
‘ तू ‘,’ तुझी स्मृती..’,’प्रीती केली ‘कविता प्रेमकविताच आहेत.
‘ ओले दिवस ‘ कविता विरहामुळे झालेली अवस्था सांगते.
‘ _तुजविणा हे जीव सुने स्वप्नेही माझे ओले ओले_||
‘ कोंदण ‘मधील ह्या दोन ओळी खूप काही सांगून जातात….
‘ _कोंदणात जपलेली जखम अजून ओली_
_प्रीतीच्या विषाची तरी त्यात गोडी ||_
‘ हुंदके ‘ ही अंतर्वेदना व्यक्त करणारी मार्मिक कविता आहे.
‘ स्मृती ‘, ‘ दुःखाच्या वाटेने ‘ ह्या दोन कविता वाचनीय आहेत. मरणयातना ‘ ही कविता भौतिक जीवनाचे वास्तव्य
कथित करते. सामाजिक विवशता वाढली आहे. हे चित्र पहा..
‘ _विसरा आता माया-ममता कपट छळाने गाजली जनता_
_इमानाला आग लागली बैमानांची आली सत्ता._’
‘ मुकीभाषा ‘ सामाजिक आशयाची कविता आहे. ती म्हणते..
‘ _अवघे झाले जीर्ण-शीर्ण अन् सुन्न झाल्या दिशा_
_खूप सोसले आजवरी, आता झाली मुकी माझी भाषा_ ‘
‘ वेदना ‘ व ‘ तिमिराच्या अंती ‘ कवितांतून विरहाची दाहकता आणि विरहात अंती येणारी सुखाची रास हे अनुभव कथित केले आहेत. ह्या भावगीतसदृश गेय रचना आहेत.
‘ अजून किती काळ ‘ या कवितेत स्त्री जातीची अबला म्हणून
हेटाळणी होत आली आहे. कवयित्री तीव्र शब्दांत विचारते….
‘ _नव्या जगाचे सूर्य म्हणून जन्माला आलात_
_सूर्याच्या तेजाने पेटून अरे काय !_
_मायेलाच जाळू लागलात? ‘_
‘ एकट्याचे जीवन ‘ या कवितेत माणसाचे जगणे मरणे एकट्याचे असते, हे सांगितले आहे. येतो एकटा आणि जातोही एकटाच. नात्यागोत्याचा पसारा सारे क्षणिकच !
या संग्रहातील ‘ भंगलेल्या आरश्यात ‘ ही कविता ही हरवलेल्या माणुसकीच्या संदर्भात लाखमोलाची आहे. माणसाने भौतिक प्रगती केली खरी पण तो माणुसकीला पारखा झाला. त्या माणुसकीचा कवयित्री शोध घेते आहे.
‘ _वेशीवरती टांगली ही नीतिमत्ता साऱ्यांनीच_
_मोल जीवनाचे रुजवाया प्रेमबीज शोधते मी_ ||
‘ कहर ‘ कवितेत’ स्त्रीवर होणाऱ्या अन्यायाला संदर्भात….
‘ _नरभक्ष्यांच्या कातडीसाठी किती साहावा कहर हा आता.._
‘ यलगार ‘ कवितेत कवयित्रीने केलेला निर्धार विचार करायला भाग पाडतो. ती निर्धारपूर्वक लिहिते….
‘ _सुमनातूनी रुसूनी परिमळ हा वेगळाला_
_सुकलेल्या पाकळ्यांचे हे भस्म चोळते मी_
_भरलेल्या मैफिलीत या एकांत शोधते मी.._ ||
‘ स्वप्न ‘ही कविता कवयित्रीला स्वप्नांच्या नगरीत घेऊन जाते.
या स्वप्नांवर फक्त तिचाच अधिकार असतो.’ जीवन म्हणजे.. ‘
या कवितेत कवयित्रीने जीवनाच्या विविध अंगांचीओळख करून दिली आहे. जीवन म्हणजे काय असतं? तुम्हीच पहा..
‘ _जीवन म्हणजे ऋणानुबंध पुष्पातील मधुर सुगंध_
_इंद्दधनुचे सप्तरंग जीवन म्हणजे मुक्त अन् रम्य_ ||
‘ पुन्हा नव्याने ‘ ही कविता कवयित्रित झालेल्या वैचारिक बदलाची साक्ष पटविते. तिच्याच शब्दांत सांगायचे तर….
‘ _सोडून सारे बुरसटलेपण विचार अंतरीचे खोलते आहे_
_नव्या क्षितिजाच्या शोधून वाटा मुक्त हासणे शिकते आहे_ ||
भारत हा कृषिप्रधान देश आहे. शेतकऱ्याच्या कष्टावर देश जगतोय. बळीराजा या शब्दांत काहीतरी गफलत झालेली दिसते. हा शब्द पावसाला उद्देशून वापरला आहे की काय?
अर्थात हे कवयित्रीच सांगू शकेल. ‘ दे दान जराशी ‘ कवितेत
पावसा अभावी शिवाराची झालेली दैना, त्यात आग ओकणारा सूर्य. ‘ शिवारात देवा बरसात होऊ दे ‘ हेच मागणं!
” आत्मफुले ” संग्रहातील शेवटची कविता-‘ चाळीशीची रांग.’
चाळीशी आली की अर्धा डाव संपला असून अर्धा डाव शिल्लक राहिल्याची जाणीव होते. थकवा येतो, विश्रांती घ्यावी असा मोह होतो पण पुढील टप्पा गाठायचा असल्याने थांबून चालणार नाही, हाही संकेत मिळतो.ती स्वतःला म्हणते.
‘ _पुन्हा नव्या जोमाने उभे रहावे म्हणते_
_नव्याउमेदींना थोडं रिचार्ज करू म्हणते_ ‘
कवयित्री राजश्री यांचा ” आत्मफुले ” कविता संग्रह प्रेम कवितांचा खजिना आहे. तरूण-तरूणींना तो खूपखूप आवडेल. मोठ्याप्रमाणात त्याचे स्वागत होईल.. कवयित्रीने
सामाजिक जाणिवेच्या कविता लिहाव्यात. कोषातून थोडं बाहेर पडायला हवं. भाषा व कल्पकतेचे वरदान आहेच. पुढील लेखन प्रपंचासाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा. शुभंभवतु.

–प्रा.डाॅ.राम नेमाडे

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा